पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/७२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मला जाणवलं. शक्य असतं, तर त्याच दिवशी विमान पकडून त्या परत बर्नला गेल्या असत्या."

 १९७० साली त्या दौऱ्यावर असताना स्वित्झर्लंडची व भारताची जोशी यांच्या मनात सतत तुलना होत असे, कुटुंबीयांशीदेखील सतत ह्या विषयावर चर्चा होत असे. भारतात परतावे हे जोशींच्या मनात अधिक असे, पत्नी व मुलींचा मात्र त्याला प्रथमपासूनच कडवा विरोध होता. शेवटी सहकुटंब जेव्हा ते बर्नला परतले, तेव्हा यापुढे स्वित्झर्लंडमध्येच राहायचा निर्णय त्यांनी काहीशा नाइलाजाने घेतला.
 बघता बघता आणखी दोन वर्षे गेली. मुली तेथील फ्रेंच शाळेत रमल्या होत्या, नोकरी उत्तम होती, स्वतःचे घर झाले होते; कमी असे काही नव्हतेच. पण तरीही पुन्हा एकदा मनात असमाधान खदखदू लागले.

 ह्या असमाधानामागे काय कारणे होती? त्यांच्या निकटच्या सहकाऱ्यांना त्यांच्या वागण्यात तसे काही जाणवत होते का? ह्याबद्दलची आपली निरीक्षणे मांडताना टोनी म्हणाले -
 "असं नेमकं काही सांगणं अवघड आहे, कारण दुसऱ्याच्या मनात काय चाललं आहे ह्याची कल्पना बाहेरून बघणाऱ्याला कशी येणार? पण एक-दोन गोष्टींचा उल्लेख करायला हरकत नाही.
 “एक म्हणजे, आपल्या नोकरीत शरदची स्थिती काहीशी साचलेल्या पाण्यासारखी झाली होती. आपल्याला प्रमोशन मिळायला हवं, आपली नक्कीच ती पात्रता आहे असं त्याला सतत वाटत होतं आणि ते प्रमोशन काही त्याला मिळत नव्हतं. ह्यावरून एकदा तो माझ्यावरही चिडला होता. आम्ही ऑफिसमधून घरी परतत होतो. ह्यावेळी गाडी त्याची होती. मी शेजारी बसलो होतो. गाडी चालवताना नेहमीप्रमाणे तो गप्पा मारत नव्हता. काहीसा घुश्श्यातच दिसत होता. मी त्याबद्दल काहीतरी बोललो. त्यासरशी माझ्याकडे कटाक्ष टाकत तो म्हणाला, 'लोकांनी तुझ्या घरावर दगड मारायला नको असतील, तर तूही दुसऱ्यांच्या घरावर दगड मारणं थांबव.' नंतरच्या बोलण्यात उलगडलं, की त्याला प्रमोशन मिळू नये म्हणून, मी त्याच्या बॉसपाशी काही कागाळ्या केल्या होत्या, असं त्याला वाटत होतं. हे सगळं त्याच्या मनात कोणी भरवलं होतं कोण जाणे, पण ते अर्थातच खोटं होतं. नंतर मी खुलासा केल्यावर मात्र त्याला तो पटला आणि आमच्यातला तो दुरावा दूर झाला.

 "आपल्याला अपेक्षित ते प्रमोशन मिळत नाही ह्याबद्दलचा शरदचा राग वाढायला आणखी एक कारण घडलं. आमचे डायरेक्टर जनरल त्यावेळी एक इजिप्शियन मुस्लिम गृहस्थ होते व जोशींना डावलून त्यांनी काँगो देशातील दुसऱ्या एका मुस्लिम कर्मचाऱ्याला ते प्रमोशन दिलं. त्यामुळे चिडलेला शरद मला म्हणाला, 'आपल्या या इंटरनॅशनल ब्यूरोत आता कामातल्या हुशारीला काहीच स्थान उरलेलं नाही. पूर्वी बढती देताना ती व्यक्ती कुठल्या

७२अंगारवाटा... शोध शरद जोशींचा