पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/७०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अशा उपायांतून काही वर्षांतच स्विस शेतकरी स्वयंपूर्ण झाले व त्यामुळे गेल्या दोन पिढ्या सरकारी खरेदीची आवश्यकता तेथे राहिलेली नाही. तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या हिताकडे सरकार डोळ्यांत तेल घालून पाहत असते. भाव खूप पडले व शेतकऱ्याचे नुकसान होईल असे वाटले, तर पुन्हा बाजारात उतरून स्वतः मालाची खरेदी करायचे व मागणी वाढवून भावही वाढवायचे सरकारचे धोरण कायम आहे.

 स्वित्झर्लंडमध्ये असताना तेथील एका मोठ्या सहकारी संस्थेचे जोशी सदस्य बनले होते. त्या निमित्ताने तेथील सहकारी संस्था कशा काम करतात हे त्यांना नीट बघता आले. त्या संस्थेची किरकोळ विक्री करणाऱ्या शेकडो दुकानांची साखळी होती. शेतकऱ्याकडून थेट माल विकत घ्यायचा व ग्राहकाला या साखळीमार्फत विकायचा. अशा अनेक संस्था तिथे आहेत. यांतून शेतकऱ्याचीही सोय व्हायची व ग्राहकाचीही. शिवाय त्या सहकारी संस्थेलाही नफा व्हायचा व एक भागधारक या नात्याने लाभांशाच्या स्वरूपात तो जोशींनाही मिळायचा. अनेक वर्षांनी भारतात आल्यावर 'शिवार अॅग्रो' नावाने अशीच एक साखळी उभारायचा जोशींनी प्रयत्न केला होता; पण तो यशस्वी झाला नाही. त्याबद्दल पंधराव्या प्रकरणात येणारच आहे.

 चाकण परिसरात जेव्हा जोशींनी स्वतःच्या शेतीला प्रारंभ केला, तेव्हा त्यांच्या लक्षात आले, की तिथे भुईमुगाचे पीक भरपूर यायचे; पण त्याला भाव मात्र अगदी कमी मिळायचा. भुईमुगाचा दर्जाही खूप कमी होता व तो सुधारण्याचा फारसा प्रयत्नही कोणी करत नव्हते. जे काही पीक निघेल, ते तेथील तेलाच्या घाणी अगदी स्वस्त दरात विकत घेत व त्याचे तेल काढून ते भरपूर भावाने विकून स्वतः गब्बर होत. उरणारी पेंडदेखील चांगल्या किमतीला जाई. त्याऐवजी शेतकऱ्यांनी शेंगदाण्यापासून स्वतःच तेल काढले किंवा लोणी, खारवलेले दाणे, तळलेले दाणे वा इतर स्नॅक फूड तयार केले, तर त्यात खूप फायदा होता. पण तसा प्रक्रियाउद्योग त्या परिसरात उभारणे बरीच पाहणी करूनही जोशींना जमण्यातले दिसेना.
 दुसरा पर्याय होता, निर्यातीचा. परदेशातही शेंगदाण्याला भरपूर मागणी होती हे जोशींना ठाऊक होते. स्विस मार्केटमध्ये जोशींनी आपल्या ओळखीत एके ठिकाणी चौकशी केली. हा माणूस मदत मागत नाहीये, तर व्यापाराबद्दल बोलतो आहे, हे लक्षात आल्यावर त्यांनीही मनापासून बोलणी करून सहकार्य दिले. त्यांची वार्षिक मागणी तब्बल तीनशे टनांची होती! पण त्यात एक अडचण होती; जगभरच्या भुईमुगाच्या शेतीचा त्यांनी अभ्यास केला होता व चाकण परिसरात होणाऱ्या शेंगदाण्यात अफ्लाटॉक्सिन (Aflatoxin) नावाचा एक विषारी पदार्थ खूप असतो हे त्यांच्या लक्षात आले होते.

 खरे तर, हे अफ्लाटॉक्सिन सर्वच शेंगदाण्यांत असते; ज्याला आपण खवटपणा म्हणतो, तो ह्याच अफ्लाटॉक्सिनमुळे येतो. पण भारतातील त्याचे प्रमाण आंतरराष्ट्रीय मानकापेक्षा पाच ते दहा पट अधिक असते. या विषामुळे यकृताचा व पोटाचा कॅन्सर होतो असे सिद्ध झाले आहे. आपल्या शरीराला कदाचित अशा जंतूंची व विषाची सवय झाली असल्याने आपल्या

७०अंगारवाटा... शोध शरद जोशींचा