पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/६८

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


दिवशी जे पाहिले, त्यावर त्यांचा विश्वासही बसेना. बर्नच्या एक लाख लोकवस्तीसाठी हजारो लोकांना पुरेसा असा अवाढव्य सुरक्षा निवारा जमिनीखाली १०० मीटर इतक्या खोलीवर एका प्रचंड बोगद्यात केला होता. एखादा अणुबॉम्ब ह्या बोगद्याच्या डोक्यावरच पडला तर गोष्ट वेगळी; अन्यथा हे आश्रयस्थान अगदी पक्के सुरक्षित राहिले असते. जमिनीच्या इतक्या खोलवरही हवा खेळती राहण्याची व्यवस्था होती. लोकांकरिता झोपण्याची व्यवस्था होती. कोणत्याही संकटकाळी जेमतेम तासाभराच्या सूचनेवरून ही सारी यंत्रणा मदतीसाठी उपलब्ध होऊ शकत होती. मोठे सुसज्ज हॉस्पिटल कायम चकचकीत अवस्थेत तयार असते. कोठे संकट आले, तर सगळी तयारी सुसज्जपणे वाट पाहते आहे.

 इथे लीला जोशी यांनी लिहिलेल्या एका विस्तृत लेखातील थोडा भाग उद्धृत करावासा वाटतो. स्वित्झर्लंडबद्दलची काही मार्मिक निरीक्षणे त्यांनी नोंदलेली आहेत. त्यांनी लिहिलेला व प्रकाशित झालेला हा एकमेव लेख आहे. आधी तो अंबाजोगाई येथून श्रीरंगनाना मोरे प्रसिद्ध करत असलेल्या 'भूमिसेवक' ह्या पाक्षिकात प्रसिद्ध झाला. पुढे तो अलिबागहून अरविंद वामन कुळकर्णी प्रसिद्ध करत असलेल्या 'राष्ट्रतेज' ह्या साप्ताहिकात पुनर्मुद्रित केला गेला. आणि त्यानंतर तो 'शेतकरी संघटक'च्या २१ ऑक्टोबर १९८३च्या अंकात पुनर्मुद्रित केला गेला. लीलाताईंच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांना श्रद्धांजली म्हणून. पण 'वारकरी' ह्या शेतकरी संघटनेच्या पहिल्या मुखपत्रात मात्र तो प्रकाशित झाला नव्हता; तसेच कुठल्या पुस्तकातही तो समाविष्ट झालेला नाही व त्यामुळे फारशा वाचकांपर्यंत पोचला नसावा. लेखात त्या लिहितात :

 ह्या देशाने जी सधनता प्राप्त करून घेतली त्यामागचे कारण काय? आम्ही स्वित्झर्लंडमध्ये असताना भारतातले एक उद्योगपती आमच्याकडे आले होते. भारतातील उच्चमध्यमवर्गीयाइतके असलेले तेथील सामान्य कामगारांचे राहणीमान पाहून ते म्हणाले – 'त्यांच्याकडे पैसा आहे ना, म्हणून ते एवढं वेतन देऊ शकतात.' हे अनुमान साफ चूक! त्यांनी पैसा निर्माण केला. साठ वर्षांपूर्वी शेतीप्रधान, पस्तीस वर्षांपूर्वीपर्यंत ग्रामोद्योग व शेती आणि आज एक औद्योगिक राष्ट्र अशी ह्या देशाची वाटचाल आहे.

 त्यांना स्वतःला स्वित्झर्लंडमध्ये गेल्यावर सर्वांत पहिली गोष्ट जाणवली, ती म्हणजे तेथील 'अन्नक्रांती'. सुपरमार्केटमध्ये खाण्यापिण्याच्या पदार्थांची लयलूट होती. नुसता दुग्धजन्य पदार्थांचा विभाग बघितला तरी माणूस थक्क होऊन जाई. असंख्य प्रकारचे चीज. विविध कंपन्यांचे, विविध स्वादांचे, चवींचे दही. चक्का, लोणी व त्यांपासून केलेले असंख्य पदार्थ. विशेष म्हणजे खाण्यापिण्याच्या बाबतीत कुठली असमानता नाही; तुम्ही गरीब असा वा श्रीमंत, सर्व लोक सर्व खाद्यपदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेऊ शकतात. असमानता चालू होते ती स्थावर व जंगम मालमत्ता आणि तशा बाबतीत. औद्योगिक मालाकडे पाहिले तरी तेच. कपडे, खेळणी यांपासून ते टीव्ही, फ्रीज, मोटार ह्या सर्व वस्तू सर्वांच्या आवाक्यात

६८अंगारवाटा... शोध शरद जोशींचा