पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/६०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 “Please sit down. Be comfortable. What drink can I offer you?" आपल्या कार्यालयात त्यांचे हस्तांदोलन करून स्वागत करताना असिस्टंट डायरेक्टर जनरलनी आपुलकीने विचारले आणि त्या पहिल्या प्रश्नातच आपण आता एका अगदी नव्या विश्वात प्रवेश केला आहे हे जोशींना जाणवले. भारतीय पोस्टखात्यातील दहा वर्षांच्या नोकरीत कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांचे असे मित्रत्वाच्या व बरोबरीच्या नात्याने स्वागत केले नव्हते.
 समोरासमोर असलेल्या कोचावर बसून दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. सुरुवातीला अनौपचारिक पण दोन-चार मिनिटांतच प्रत्यक्ष कामाच्या स्वरूपाविषयी.
 त्याच दिवशी जोशींनी कामाला सुरुवात केली. राहायला घर घेणे, मुलींसाठी शाळेत प्रवेश घेणे वगैरे सर्व सोपस्कारही थोड्याच दिवसांत पार पडले.
 इंटरनॅशनल ब्युरो (आयबी) हा युपीयुचा एक विभाग होता व ह्याच विभागात जोशींची नेमणूक झाली होती. त्यांचे अधिकृत पद होते 'थर्ड सेक्रेटरी'. आपण वापरतो त्या अर्थाने इथे सेक्रेटरी हा शब्द नाही. युपीयुतील अधिकाऱ्यांच्या एकूण सात श्रेणी होत्या - सुरुवातीची श्रेणी 'थर्ड सेक्रेटरी', मग 'सेकंड सेक्रेटरी', त्यानंतर 'सेक्रेटरी', त्यानंतर 'काउन्सेलर', त्यानंतर 'डायरेक्टर' व त्यानंतर 'असिस्टंट डायरेक्टर जनरल'. शेवटी मग अशा वेगवेगळ्या विभागांच्या असिस्टंट डायरेक्टर जनरल्समधून एकाची नेमणूक डायरेक्टर जनरल म्हणून होत असे. एकूण कर्मचाऱ्यांचा विचार केला तर अर्थातच स्विस नागरिक हे तिथे बहुसंख्य होते, पण अधिकारीवर्ग मात्र जगातल्या वेगवेगळ्या देशांतून आलेला असे.

 आल्प्स पर्वतरांगांच्या कुशीत वसलेला स्वित्झर्लंड हा छोटासा देश पृथ्वीतलावरील नंदनवन म्हणूनच जगभर ओळखला जातो. लांबवर पसरत गेलेल्या गगनस्पर्शी बर्फाच्छादित पर्वतरांगा, उंच उंच वृक्ष, हिरवीगार कुरणे, त्यात मनसोक्त चरणाऱ्या धष्टपुष्ट गायी, त्यांच्या गळ्यातील घंटांचा खुळावून टाकणारा मंजूळ नाद, निळेभोर आकाश, स्वच्छ गुळगुळीत रस्ते, प्रत्येक घरासमोर व गॅलरीत बहरलेली रंगीबेरंगी फुले. सगळे अगदी एखाद्या पिक्चर पोस्टकार्डाप्रमाणे!

 पण निसर्गसौंदर्यापलीकडेही ह्या देशात खूप काही आहे. दरडोई उत्पन्नामध्ये ह्या देशाचा क्रमांक सातत्याने जगात जवळजवळ पहिला असतो. ही संपत्तीदेखील हक्काने शोषण करायला उपलब्ध होईल अशी स्वतःची कुठलीही वसाहत नसताना. रोश वा नोव्हार्तिस यांसारख्या जगातील सर्वांत मोठ्या औषधकंपन्या इथल्याच. खते-रसायने बनवणाऱ्या सिन्जेन्टा वा सिबा, घड्याळे बनवणाऱ्या रोलेक्स वा फावर लुबा, कापडगिरण्यांना लागणारी यंत्रे बनवणारी सुलत्झर, एलेव्हेटर बनवणारी शिंडलर, सिमेंट बनवणारी होल्सिम, वीजनिर्मिती व पुरवठा करणारी एबीबी, कच्च्या मालाचा घाऊक व्यापार करणारी ग्लेनकोर, दुग्धपदार्थ वा चॉकलेट बनवणारी नेसले अशा अनेक आघाडीच्या बहराष्ट्रीय कंपन्या स्वीस आहेत. युबीएससारख्या इथल्या बँका आपल्या संपूर्ण सुरक्षित व्यवहारासाठी जगभर विश्वासार्ह म्हणून

६०अंगारवाटा... शोध शरद जोशींचा