पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "आपल्या भूतकाळाचा फारसा कधी कुठे उल्लेख करायचा नाही, असं मी भारतात परतल्यावर जाणीवपूर्वकच ठरवलं होतं. नव्यानेच जगायला आपण आता सुरुवात केली आहे, तेव्हा उगाच त्या जुन्या आयुष्याची आठवण तरी कशाला? नाहीतरी ऋषीचं कूळ आणि नदीचं मूळ पाहू नये असं आपल्याकडे म्हणतातच. मागे परतायचे सगळे दोर आपण कापूनच टाकले आहेत. तेव्हा यापुढे विचार करायचा तो फक्त भविष्याचाच. There is nothing sweeter than the smell of the burnt bridges (जाळून टाकलेल्या पुलांच्या वासापेक्षा अधिक मधुर काहीच नसतं) असं मी अनेकदा म्हणालो आहे व त्या विधानाचा आनंद मी आयुष्यभर उपभोगत आलो आहे!"
 "हे सगळं तसं ऐकायला छान वाटतं, पण तुमचं चरित्र लिहिताना एवढा मोठा कालखंड एखाद्या अंधाऱ्या बोगद्याप्रमाणे सोडून कसा द्यायचा? आयुष्यातील वेगवेगळे टप्पे एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा असेच उलगडत जातात ना? पूर्णतः कोऱ्या पाटीवरून अशी आपण कधीच सुरुवात करू शकत नाही; एकत्रितरीत्याच व्यक्ती समजून घेता येते," असे त्यावरचे माझे मत काहीशा विस्ताराने मी मांडले.
 त्यांना त्यात थोडेफार तथ्य जाणवले. बऱ्याच गोष्टी तशा विस्मरणात गेल्या होत्या, पण त्यानंतरच्या चार-पाच भेटीत त्यांनी ह्या कालखंडाबद्दल आठवेल तेवढी माहिती दिली आणि तिच्याच आधारे ह्या चरित्रातला संदर्भित भाग लिहिता आला.

 लौकिकदृष्ट्या सगळे काही उत्तम चाललेले असूनही कुठेतरी जोशी पोस्टातल्या नोकरीत खूप असमाधानी होते. 'आहे मनोहर तरी गमते उदास...' अशीच काहीशी त्यांची मनःस्थिती होती.
 व्यावसायिक पातळीवर विचार केला तर पोस्टातील व एकूणच सरकारी कार्यसंस्कृती त्यांनी दहा वर्षांत खूप जवळून बघितली. इथे मनुष्यबळ अतिरिक्त आहे, आपल्याला नोकरीवरून कोणीही काढून टाकू शकणार नाही याची त्यांना पूर्ण कल्पना आहे, परिवर्तनाची तीव्र आस इथे कोणालाच नाही व त्यामुळे तसे परिवर्तन भविष्यात घडून यायची काही शक्यताही नाही असे काहीसे त्यांचे मत बनले होते. १९९६ साली भारतातील पोस्ट कर्मचाऱ्यांचा एक देशव्यापी संप झाला होता. त्यावेळी त्यांनी शेतकरी संघटक'च्या अंकात (२१ डिसेंबर १९९६) लिहिले होते,

 आजच्या तुलनेत फक्त निम्मा नोकरवर्ग घेऊन आणि आजच्या तुलनेने त्यांना निम्मा पगार देऊन मी टपालखाते चालवायला घ्यायला तयार आहे. आज कोणत्याही महत्त्वाच्या शहरामध्ये पाच दिवसांच्या आत टपाल पोहोचत नाही, तेथे चोवीस तासांच्या आत बटवड्याची हमी द्यायला मी तयार आहे. पण असले आव्हान सरकारच्याही कानी पडत नाही आणि नोकरदारांनाही त्याची नोंद घेण्याची गरज वाटत नाही. नोकर मालक बनले, की मूळ धन्याची अवस्था अशीच होणार.

व्यावसायिक जगात५७