पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पहिला मानव परग्रहावरून आला असेल का?

पिंड आणि ब्रह्मांड यांचे नाते काय आहे? त्यांची रचना इतकी सारखी कशी काय? विचार करण्याचे सामर्थ्य फक्त एकेका व्यक्तीलाच का असते; समूहाला का नसते? जडामध्येसुद्धा चैतन्य असते व चैतन्यालाही जडाचे स्वरूप धारण करावेच लागते. मग त्यातले आधी काय आले? जड आणि चैतन्य यांचे नाते काय आहे? व्यक्तीला जसे संवेदनापटल असते, तसे वैश्विक संवेदनापटल म्हणून काही प्रकार असतो का?'

 या व अशा अनेक गहन प्रश्नांवरील चर्चेची ही सोळा पाने म्हणजे केवळ सुरुवात आहे. पण हे लेखन जोशींनी पुढे केलेले नाही व त्यामुळे त्यातून त्यांना नेमके काय सांगायचे आहे हे कुतूहल शमत नाही.
 ३० मार्च १९६८ रोजी प्रशिक्षण संपवून जोशी भारतात परतले.

 हे सारे घडत असताना एकीकडे वैवाहिक जीवनाची वाटचालही चालूच होती. लग्नानंतरच लीलाताईंनी बीएचे द्वितीय वर्ष पूर्ण केले. मोठी मुलगी श्रेया जन्मली ७ एप्रिल १९६२ रोजी; म्हणजे लग्नानंतर लगेचच. मुंबई येथे. धाकट्या गौरीचा जन्म २३ नोव्हेंबर १९६३ रोजी झाला.
 जोशी म्हणत होते, "गौरीची जन्मतारीख माझ्या चांगली लक्षात आहे, कारण तेव्हाच अमेरिकेचे अध्यक्ष जॉन केनेडी ह्यांची डलास येथे हत्या झाल्याची बातमी मुंबईत आली होती. अर्थात प्रत्यक्ष हत्या अमेरिकन वेळेप्रमाणे २२ नोव्हेंबर रोजी झाली होती. शिवाय त्याच दिवशी भारतीय सेनेचे चार अधिकारी एका दुर्दैवी विमानअपघातात दगावले होते."
 जोशी पुढे सांगत होते, “गौरीचा आपल्या आईवर फार जीव होता; पण तिला झोपवताना मीच लागायचो. मी वेगवेगळ्या कविता तालासुरात म्हणायचो आणि त्या ऐकता ऐकता ती झोपी जायची."
 जोशींच्या कविताप्रेमाचे एक द्योतक म्हणजे मोठ्या मुलीचे श्रेया हे नाव 'जेथे ओढे वनराई, तेथे वृत्ती रमे माझी, कारण काही साक्ष तिथे, मज त्या श्रेयाची पटते' या केशवसुतांच्या ओळींवरून सुचले आहे. धाकट्या मुलीचे नाव 'गौरी' ठेवण्यापूर्वीही त्यांनी बरीच चर्चा केली होती असे त्यांच्या बोलण्यात आले होते, पण ते नेमके कसे सुचले, हे सांगायचे गप्पांच्या ओघात राहूनच गेले होते.

 इथे एक स्पष्ट करायला हवे. आपल्या वैवाहिक जीवनाविषयी, तसेच देशातील व विदेशातील नोकरीविषयी, जोशींनी फारसे काही लिहिलेले नाही. त्यामुळे त्यांच्या जीवनाची १९५८ ते १९६८ ही दहा वर्षे व नंतरची स्वित्झर्लंडमधली आठ वर्षे असा एकूण अठरा वर्षांचा प्रदीर्घ कालखंड हा काहीसा गुलदस्त्यात राहिल्यासारखा झाला आहे. ह्याविषयी त्यांना विचारले असताना सुरुवातीला ते मला म्हणाले,

५६अंगारवाटा... शोध शरद जोशींचा