पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तर ऑलियान्स फ्रान्सेज् या फ्रेंच संस्थेमध्ये दिल्लीतही ती सोय होती, पण भारत सरकार तिचा उपयोग न करता स्वतःचेच धेडगुजरी प्रशिक्षण देत असे. त्यात सरकारचा पैसा व शिकणाऱ्यांचा वेळ अक्षरशः फुकट जात असे, पण कोणालाच त्याची काही पर्वा नव्हती. जेव्हा गरज पडेल, तेव्हा फ्रेंच दुभाषी मागवायची सरकारी सोय होतीच!

 नंतरचे चार महिने जोशींनी प्रत्यक्ष फ्रेंच पोस्टात अभ्यास करण्यासाठी घालवला. अभ्यासासाठी त्यांना पुढील चार क्षेत्रे दिली गेली होती :

  1. टपाल वर्गीकरणाचे यांत्रिकीकरण (Mechanization of sorting)
  2. पोस्ट ऑफिसातील खिडक्यांमधून होणाऱ्या कामाचे यांत्रिकीकरण (Mechanization of Window operations)
  3. टपालाची एका विभागातून दुसऱ्या विभागात देवाणघेवाण होते अशा कार्यालयांचे कामकाज (Working of exchange offices)
  4. संख्याशास्त्रीय सेवा. (Statistical services)

 फ्रेंच पोस्ट खात्यातील ह्या प्रशिक्षणात त्यांची अनेक वैशिष्ट्ये जोशींना जाणवली व भारतात परतल्यावर वरिष्ठांना दिलेल्या आपल्या ३२-पानी अहवालात त्यांनी ती नमूद केली आहेत. उदाहरणार्थ, फ्रान्सची लोकवस्ती भारताच्या एक दशांश असूनही त्यांचे सेवेचे जाळे भारतापेक्षा अधिक विस्तृत आहे. एकूण तीन लाख कर्मचारी तिथे नोकरी करतात. प्रत्येक फ्रेंच नागरिकाला दरवर्षी सरासरी २०० पत्रे पोचवली जातात. हा आकडा भारतापेक्षा खूपच अधिक आहे. फ्रेंच पोस्ट खात्याच्या स्वतःच्या मालकीच्या ५,५०० इमारती असून अतिरिक्त १३,६०० इमारती त्यांनी भाड्याने घेतलेल्या आहेत. टपाल वितरणासाठी सुमारे ३०,००० वाहने व २० विमाने वापरली जातात. सेवेचा दर्जा सतत उच्च राखला जातो. पॅरिस शहरात सकाळी दहा वाजता टाकलेले स्थानिक पत्र संध्याकाळी सहाच्या आत पोचले पाहिजे हे बंधन पाळले जाते. देशात इतरत्र जाणारे पत्र असेल, तर तेही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सहापर्यंत पोचवणे टपालखात्याला बंधनकारक आहे. एक कर्मचारी एका तासाला २४०० पत्रांचे वर्गीकरण (सॉर्टिंग) करतो. (भारतात हेच प्रमाण एका तासाला सुमारे १००० पत्रे आहे.)

 एके ठिकाणी जोशी नमूद करतात, "त्यांच्या वितरणातील कमालीचा नियमितपणा हा आश्चर्यकारक आहे. एखाद्या विशिष्ट इमारतीत पोस्टमनने जायची वेळ ही ठरलेली असते व ती नेहमीच पाळली जाते. मी पॅरिसमध्ये ज्या हॉटेलात राहत होतो तिथे रोज सकाळी बरोबर आठ वाजायला तीन मिनिटे असताना पोस्टमन प्रवेश करायचा व माझ्या तेथील संपूर्ण चार महिन्यांच्या वास्तव्यात त्याने यायची ही वेळ एकदाही चुकली नाही."

 त्यांनी पॅरिस सोडले त्याच्या पुढच्याच महिन्यात, एप्रिल १९६८ मध्ये, लोकांमधील धुमसत असलेल्या असंतोषाचा स्फोट झाला होता; ज्याला 'पॅरिस स्प्रिंग' म्हटले जाते. विद्यार्थी, कामगार आणि शेतकरी रस्त्यावर उतरले होते. आधीचे काही महिनेही सतत निदर्शने होतच होती. जोशी तिथे होते तो कालखंड त्यामुळे फ्रान्सच्या इतिहासात बराच धामधुमीचा

५४अंगारवाटा... शोध शरद जोशींचा