पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ही सुरुवातीची आपत्तिग्रस्त परिस्थिती सोडली तर एरव्ही त्यांचे पुण्यातील वास्तव्य सुखकर होते. लग्नानंतरचे हे गुलाबी दिवस. जीपीओच्या निवांत परिसरातील ज्या बंगल्यात दोघांचे वास्तव्य होते, त्या बंगल्याच्या बागेतही २८ प्रकारचे गुलाब फुलले होते.

 पुण्यानंतर नोव्हेंबर १९६१ ते मार्च १९६५ ते मुंबईत होते. आधी सिनिअर सुपरिटेंडंट ऑफ पोस्टल सर्व्हिसेस, बाँबे वेस्ट म्हणून आणि मग सिनिअर सुपरिटेंडंट, बाँबे सॉर्टिंग डिव्हिजन म्हणून.

 मार्च १९६५ मध्ये बढती मिळून जोशींची दिल्लीला बदली झाली; असिस्टंट डायरेक्टर जनरल, पोस्ट अँड टेलिग्राफ डायरेक्टोरेट या पदावर. ही दोन्ही खाती तशी एकाच मंत्रालयात असत. इथे टेलेग्राफ खाते प्रथमच त्यांच्या हाताखाली आले. त्याकाळी बिनतारी संदेशवहन फार महत्त्वाचे मानले जाई. टेलेप्रिंटर, संगणक, सॅटेलाइट वगैरेच्या आधीचे हे दिवस. परदेशात टपाल व बिनतारी संदेशवहन ह्या क्षेत्रात जे जे अभ्यास केले जातात, त्यांचे संकलन करायचे, त्यातील काय काय आपल्या देशासाठी योग्य अस शकेल ह्याची छाननी करायची व त्य अनुषंगाने टिपणे करून वरिष्ठांकडे पाठवायची असे ह्या कामाचे स्वरूप होते.

 लाल बहादूर शास्त्री यांचे ताश्कंद येथील अकल्पित निधन याच काळातले. त्यानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. शपथविधीनंतरचा त्यांचा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम जोशींचे कार्यालय ज्या इमारतीत होते तिथे झाला. शास्त्रीजींच्या स्मरणार्थ काढलेल्या टपाल तिकिटाचे तेव्हा अनावरण झाले. त्यावेळी इंदिराजींना काहीसे जवळून पाहण्याची संधी मिळाली. पुढे जोशी यांनी लिहिले आहे.

इंदिराबाई माझ्या आदराचा विषय कधीच नव्हत्या. पैतृक वारशाने अंगावर आलेले प्रचंड जबाबदारीचे ओझे सावरण्याची आपली कुवत आहे किंवा नाही याबद्दल त्यांच्या मनात असलेली जबरदस्त शंका आणि त्यातून निघणारी असुरक्षिततेची भावना यांतून देशाला मोठा धोका संभवतो याची जाणीव त्यांच्या त्या वेळच्या भाषणातूनच झाली.

(अन्वयार्थ - २, पृष्ठ ५५)

ह्या कालखंडाविषयी बोलताना जोशी म्हणाले,

 "माझ्या सर्वांत जास्त स्मरणात राहिले आहेत ते म्हणजे श्री. भि. वेलणकर. त्यांच्यासारखा बॉस मला लाभला हे नशीबच म्हणायचं. ते डायरेक्टर, पोस्टल सर्व्हिसेस ह्या वरिष्ठ पदावर होते. देशातील प्रत्येक भागाला एक विशिष्ट पिनकोड द्यायचा खूप मोठा प्रकल्प त्या काळात पोस्टखात्याने राबवला. त्यासाठी प्रत्येक राज्याचं जिल्ह्यानुसार, तालुक्यानुसार वर्गीकरण करायचं होतं. सारखी नावं असलेली अनेक गावं देशात असतात. अशा प्रत्येक गावाला वेगळे वेगळे पिनकोड मिळतील ह्याची दक्षता घ्यायची होती. भावी काळात त्या परिसरात किती पोस्ट ऑफिसेस निघू शकतील, ह्याचाही ह्या प्रकल्पासाठी अंदाज बांधणं आवश्यक होतं. कारण जसा

५२अंगारवाटा... शोध शरद जोशींचा