पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एकदा स्पर्धापरीक्षा देण्याचा स्वतःचा आधीचा विचार त्यांनी का अमलात आणला नाही? आईवडलांवर आणखी वर्षभर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या पायावर शक्य तितक्या लौकर उभे राहणे त्यांना व्यक्तिशः प्राधान्याचे वाटत होते का?

 आणखी एक प्रश्न म्हणजे. सरकारी नोकरीत जाण्याऐवजी इंग्लंड-अमेरिकेत जाऊन पीएच.डी. केली असती, तर ते भविष्यात अधिक श्रेयस्कर ठरले असते का? जगदीश भगवतीप्रमाणे? नाही म्हटले तरी, परदेशी विद्यापीठातल्या डॉक्टरेटला भारतीय विद्वानांच्या वर्तुळात कायम सर्वोच्च स्थान होते; जोशींना तर कुठलीच डॉक्टरेट नव्हती. आणि एकदा ते परदेशी उच्चशिक्षण घेतले, तोच प्रबंध इंग्रजी पुस्तकाच्या रूपात प्रसिद्ध केला, की मग आयुष्यभरासाठी तो एक मानबिंदू ठरला असता; व्यावसायिक प्रगतीचे अनेक दरवाजे त्यामुळे उघडले गेले असते. कदाचित भगवतीप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताही मिळाली असती. त्यात त्यांना अधिक सार्थकता वाटली असती का?

 यावर आमची फक्त एकदाच चर्चा होऊ शकली. त्यावेळी जोशी म्हणाले होते,

 "तसं झालं असतं. तर पढे बर्नमधल्या नोकरीत मला जे अनुभवता आलं. त्याला मी मुकलो असतो. शेतीतही पडलो नसतो आणि हा सगळा आंदोलनाचा अविस्मरणीय अनुभवही मिळाला नसता. जर-तरचा विचार आपण आज करू शकतो, पण त्यावेळी जे काही घडायचं होतं ते घडून गेलं. कोठल्या अपघाताने कोणाच्या आयुष्याला कसं वळण लागेल, हे कोणालाही सांगता येणं शक्य नाही. 'माझ्या टर्मसवरच मी जगेन,' असा माझा कायम आग्रह असायचा व तसं जगायचा मी आयुष्यभर प्रयत्नही केला; पण नियती म्हणूनही काही प्रकार आहे हे मला आज पटतं. ज्यावर माझं काहीच कंट्रोल नव्हतं, अशाही काही गोष्टी माझ्या आयुष्यात घडत गेल्या."

 आपल्या पोस्टातील नोकरीबद्दल जोशी सांगतात.

 "पोस्टखात्यातील जागा खरं तर मला स्वीकारायची नव्हती. पण मला तिथे नोकरी मिळाली ह्याचा माझ्या वडलांना इतका आनंद झाला, की विचारायची सोय नाही. साध्या कारकुनापासून सुरुवात करून ते इतक्या वर्षांनी सुपरिंटेंडंट ह्या पदावर पोचले होते व आता नुकताच नोकरीला लागणारा त्यांचा मुलगा एकदम त्याच पदावर रुजू होणार होता. त्यांना होणारा तो आनंद बघून मग शेवटी मी पोस्टखात्यातील पद स्वीकारायचं ठरवलं."

 जोशी यांच्या ज्येष्ठ भगिनी नमाताई यांनीही साधारण अशीच आठवण प्रस्तुत लेखकाला सांगितली आहे. त्या म्हणाल्या,

 "शरद रुजू झाला, त्याच कचेरीत माझ्या वडलांचे मराठे नावाचे एक मित्र काम करत होते. त्यांनी लगेच वडलांना फोन करून 'तुमचा मुलगा आता ह्या खुर्चीत बसतो आहे ही बातमी कौतुकाने सांगितली. वडलांना अत्यानंद झाला. घरी आल्या आल्या त्यांनी ही बातमी आम्हाला दिली. आम्हा सगळ्यांनाच त्यावेळी शरदचा खूप अभिमान वाटला." ही घटना ऑगस्ट १९५८मधली.

५०अंगारवाटा... शोध शरद जोशींचा