पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उरलेला सगळा दिवस अभ्यासासाठी मिळाला असता आणि शिवाय, ऐन परीक्षेच्या वेळची ही सगळी धावपळ टळली असती, पेपर्स उत्तम गेले असते; उगाचच आपण भणगेंच्या विनंतीला बळी पडलो असे त्यांना वाटू लागले. शेवटी त्यांनी ठरवले, की भणगे यांच्या स्नेहापोटी एक वर्ष गेले असे समजायचे, परीक्षा संपल्या, की ही नोकरी सोडायची, पूर्ण वेळ झट्न अभ्यास करायचा आणि पुढच्या वर्षी पुन्हा ही स्पर्धापरीक्षा द्यायची.

 पण प्रत्यक्षात तसे घडायचे नव्हते. जोशींना अगदी कमी गुण मिळाले असले, तरी ते उत्तीर्ण झाले असल्याने नियमानुसार त्यांना तोंडी परीक्षेचे आमंत्रण आले. तोंडी परीक्षेत त्यांना घवघवीत यश मिळाले, पहिल्या तिघांत क्रमांक लागला. शासकीय सेवेत निवड करताना तोंडी व लेखी अशा दोन्ही परीक्षांतील गुणांचा एकत्रित विचार केला जातो. सर्वसामान्यतः प्राधान्याने निवडले जाणारे इंडियन अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस (IAS), इंडियन पोलीस सर्व्हिस (IPS) अथवा इंडियन फॉरिन सर्व्हिस (IFS) हे तीन पर्याय त्यांना उपलब्ध होऊ शकले नाहीत. (IAS झालेले हा त्यांचा खुपदा करून दिला गेलेला परिचय तितकासा बरोबर नव्हता; पण त्या काळी या आयोगाच्या परीक्षेला 'आयएसची परीक्षा' असेच म्हटले जाई.) त्यांना उपलब्ध झालेल्या पर्यायांमधील ऑडिट अँड अकाउंट्स ही त्यांची पहिली पसंती होती; पण ते क्षेत्रही त्यांना मिळाले नाही. तोंडी परीक्षेत ज्याचा पहिला क्रमांक आला होता, त्याला ती जागा मिळाली. शेवटी इंडियन पोस्टल सर्व्हिसमधली (IPOS) जागा जोशींना स्वीकारावी लागली.

 दरम्यान आणखी एक शक्यता निर्माण झाली होती. पुण्यातील सुप्रसिद्ध गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेमध्ये त्यांना संशोधन करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळत होती. तो पर्याय तसा मोहात पाडणारा होता. अर्थशास्त्राशी संबंधित काही संशोधन करणे त्यांच्या वृत्तीला भावणारे होते. पण त्याबद्दल अधिक चर्चा करताना संस्थाप्रमुख डॉक्टर धनंजयराव गाडगीळ त्यांना म्हणाले, "इथे असं संशोधन करून शेवटी तुम्ही एक प्राध्यापकच बनणार. पण प्राध्यापकापेक्षा उच्च सनदी नोकरीचं महत्त्व अधिक आहे. प्रत्यक्ष धोरणं आखणं, त्यांची अंमलबजावणी करणं हे सारं शेवटी सनदी नोकरांच्याच हातात असतं. शासन हे परिवर्तन घडवून आणण्याचं खूप प्रभावी माध्यम आहे. तुम्ही सनदी नोकर बनून त्या प्रत्यक्ष परिवर्तनात सहभागी व्हा." गाडगीळांचा सल्ला जोशींना पटला; किंवा कदाचित असेही असेल की जोशींना स्वतःलाही विचारान्ती हेच करावेसे वाटले असेल.

 मागे वळून बघताना या संदर्भात काही प्रश्न मनात येतात.

 कॉलेजात शिकवण्यासाठी कोल्हापूरला गेल्याचा पश्चात्ताप होतो, असे जोशी यांनी लिहिले आहे; पण त्या पश्चात्तापाचे नेमके कारण त्यांनी स्पष्ट केलेले नाही. तिथे राहून मुंबईतल्या स्पर्धापरीक्षा दिल्यामुळे अभ्यास नीट झाला नाही एवढे ते लिहितात, पण त्यामुळे आयएएसला आपली निवड झाली नाही, ही त्यांची नेमकी खंत होती का? पोस्टल सर्व्हिससारख्या तुलनेने दुय्यम पर्यायाऐवजी आयएएसमध्ये किंवा आयएफएसमध्ये नोकरी करणे त्यांना अधिक अर्थपूर्ण वाटले असते का? पोस्टाचा पर्याय नाकारून पुढच्या वर्षी पुन्हा

व्यावसायिक जगात४९