पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४८

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 जसजसे दिवस जात गेले, तसतसा जोशींचा या ग्रामीण विद्यार्थ्यांकडे पाहायचा दृष्टिकोन बदलत गेला. 'पिढ्यान्पिढ्यांची गरिबी आणि निरक्षरता यांनी त्यांना सर्वार्थाने खच्ची केले होते.' किंवा 'शेतकऱ्यांच्या पोरांना शहरातील परीक्षा द्यायला सांगणं म्हणजे हत्तीला दोरीवरच्या उड्या मारायला सांगणं आहे.' यांसारख्या उपरोक्त वाक्यांवरून त्यांची प्रगल्भ झालेली जाण स्पष्ट होते.

 त्यांच्या अध्यापनावरही त्यांच्या या बदललेल्या दृष्टिकोनाचा परिणाम होत गेला. आपण जे शिकवतो आहोत, ते विद्यार्थ्यांना नीट समजेल अशा प्रकारे ते शिकवू लागले. अध्यापनाचा हा अनुभव पुढे त्यांच्या खूप उपयोगी पडणारा होता. क्लिष्ट अशी अर्थशास्त्रीय तत्त्वे ते सर्वसामान्य शेतकऱ्यालाही सहज समजेल अशा भाषेत कशी मांडतात, अगदी निरक्षर ग्रामीण बायकांनाही त्यांचे क्रांतिकारक विचार कसे समजतात, डंकेल प्रस्तावासारख्या विषयावरही संघटनेचा सामान्य कार्यकर्ता मोठ्या मोठ्या अर्थशास्त्र्यांना व पत्रकारांना निरुत्तर कसा करू शकतो, याचे एक रहस्य कोल्हापुरातील अनुभवात दडलेले असावे.

 इथल्या वास्तव्यात वेळात वेळ काढून प्राचार्य भणगे यांच्याबरोबर जोशींनी एका प्रकल्पासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रवास करून एक सर्वेक्षण करायचे कामही केले. 'ग्रामीण विद्युतीकरणाचा कोल्हापूर जिल्ह्यात झालेला परिणाम ह्या विषयावरचा हा अभ्यासप्रकल्प होता. विजेसारख्या वैज्ञानिक शोधांमळे समाजात फार मोठे बदल कसे घडन येतात. हे मनावर ठसवणारा हा अभ्यास होता. विदेशात असताना तयार केलेल्या आपल्या बायोडेटात जोशींनी या प्रकल्पाचा उल्लेख केला आहे.

 ह्या सगळ्या घडामोडींत स्वतःच्या स्पर्धापरीक्षेच्या अभ्यासासाठी मात्र जोशींना अजिबात वेळ मिळेना. त्यातच लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या. लेखी परीक्षेसाठी एकूण पाच पेपर्स होते. सगळ्या परीक्षा मुंबईतच द्यायच्या होत्या. परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी सलग पंधरा-वीस दिवस रजा सोडाच, प्रत्यक्ष परीक्षेसाठीसुद्धा एका दिवसाहून जास्त रजा घेणे शक्य झाले नाही. प्रत्येक पेपराच्या वेळी अतोनात धावपळ झाली. कोल्हापूरला कॉलेज संपल्यावर संध्याकाळची एसटी पकडायची, पुण्याला यायचे, त्याच रात्रीची पुण्याहून मुंबईला जाणारी पॅसेंजर पकडायची, पहाटे कुर्ल्याला उतरायचे, सकाळी सहापर्यंत अंधेरीला त्या काळी मोठा भाऊ राहत असलेल्या घरी जायचे, तिथे अंघोळ वगैरे उरकून दहा वाजेपर्यंत फोर्टमध्ये असलेल्या परीक्षा केंद्रावर जायचे, परीक्षा झाली, की तसेच बोरीबंदर स्टेशनवर जाऊन रात्रीची कोल्हापूरला जाणारी ट्रेन पकडायची, कोल्हापूरला भल्या सकाळी पोचायचे आणि अंघोळ उरकून पुन्हा नेहमीसारखे साडेसातपर्यंत कॉलेजवर शिकवण्यासाठी हजर राहायचे, असा सगळा द्राविडी प्राणायाम करावा लागला. पाचही पेपरांच्या बाबतीत अगदी हाच प्रकार घडला.

 परिणामतः सगळे पेपर्स अगदी भिकार गेले. जोशी खचून गेले. आपले उच्च सनदी नोकर बनण्याचे स्वप्न इथे कोल्हापुरात आल्याने धुळीला मिळाले, ह्या विचाराने खूप घालमेल होऊ लागली. मुंबईतच मिळालेली नोकरी स्वीकारली असती, तर दोन-तीन लेक्चर्स घेतल्यानंतर

४८अंगारवाटा... शोध शरद जोशींचा