पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जोशी त्यांचेच एक विद्यार्थी होते. केवळ हे नवे कॉलेज सुरू करण्यासाठी म्हणून प्रा. भणगे यांनी सिडनममधील मानाची नोकरी सोडली होती. आपल्या ह्या गुरूंबद्दल, त्यांच्या ज्ञानाबद्दल जोशींना बराच आदर होता. आता ह्या नव्या कॉलेजच्या उपक्रमात त्यांना जोशींसारख्या त्यांच्या हुशार विद्यार्थ्यांचा सहभाग हवा होता. त्यांना नकार देणे जोशींना जड झाले. शिवाय, प्रत्यक्ष भेटीत चर्चा करताना भणगे यांनी अगदी गळच घातली. त्यांचा मुद्दा असा होता, की नाहीतरी जोशी काही व्याख्याता म्हणून कायम नोकरी करणार नाहीएत, स्पर्धापरीक्षा व नंतरच्या मुलाखती पार पडेस्तोवरच त्यांना अध्यापन करायचे आहे; तेव्हा ते मुंबईत केले काय किंवा कोल्हापुरात केले काय, काहीच फरक पडणार नाही. याशिवाय, अतिरिक्त आकर्षण म्हणून तीन वर्षांनंतर मिळू शकणारे वेतन भणगे यांनी जोशींना पहिल्या महिन्यापासूनच द्यायचे कबूल केले. त्या दिवसापर्यंत मुंबई विद्यापीठाकडून काहीच उत्तर आलेले नसल्याने व कॉलेज सुरू व्हायची वेळ अगदी जवळ येऊन ठेपल्यामुळे जोशींनाही नोकरीची घाई होती. शेवटी जोशींनी भणगे यांना होकार दिला व लगेचच ते कामावर हजर झाले.

 कोल्हापूर येथील एक प्रसिद्ध काँग्रेसनेते रत्नाप्पाअण्णा कुंभार यांच्या आधिपत्याखालील लीगल एज्युकेशन सोसायटीने हे महाविद्यालय सुरू केले होते. रत्नाप्पा कुंभार यांनी कॉलेज सुरू करण्याची सर्व व्यावहारिक जबाबदारी प्राचार्य या नात्याने भणगे यांच्यावर सोपवली होती. जो कोणी येईल त्या विद्यार्थ्याला प्रवेश दिला गेला. कारण कॉमर्स कॉलेज हा प्रकारच कोल्हापुरात प्रथम सुरू होत होता. साधारण शे-सव्वाशे विद्यार्थी दाखल झाले होते. त्यातले काही वयाने बरेच मोठे व बारीकसारीक नोकऱ्या करणारे होते. त्या सगळ्यांना सोयीचे व्हावे म्हणून कॉलेजची वेळ सकाळी साडेसात ते साडेदहा अशी ठेवली गेली. कॉलेज प्रत्यक्ष सुरू होईस्तोवर ऑगस्ट महिना उजाडला. कोल्हापुरातील बिंदू चौकात तोफखाना बिल्डिंग नावाची एक जुनाट लांबलचक कौलारू इमारत होती. तिथेच हे कॉलेज भरू लागले. इमारतीच्या आवारातच एक भले मोठे, डेरेदार वडाचे झाड होते व त्याची सावली सगळे कॉलेज कवेत घेणारी होती. त्या भव्य वृक्षामुळे एखाद्या प्राचीन आश्रमाप्रमाणे तेथील वातावरण वाटायचे.

 अशा नव्या कॉलेजसाठी कोल्हापुरात प्राध्यापक मिळणे अवघड होते. कशीबशी भणगे यांनी सगळी जुळवाजुळव केली. एन. व्ही. शिवांगी नावाचे एक बेळगावला व्यवसाय करणारे चार्टर्ड अकौंटंट त्याच कॉलेजात लागले होते. विद्यापीठाच्या नियमानुसार अकाउंटिंग व ऑडिटिंग हा विषय शिकवणारी व्यक्ती स्वतः चार्टर्ड अकौंटंट असणे आवश्यक होते; पण तशी कोणी व्यक्ती कोल्हापुरात उपलब्ध होईना. त्यामुळे मग खास सवलत म्हणून शिवांगी यांना बेळगावहून कोल्हापूरला यायचे-जायचे टॅक्सीभाडे द्यायचे कॉलेजने कबूल केले व त्यानंतरच शिवांगी प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेही स्वतः पूर्वी सिडनमचेच विद्यार्थी होते. त्यांनी लिहिलेल्या In the making of a personality या आत्मचरित्रानुसार पहिल्या वर्षी ते स्वतः, प्राचार्य भणगे, शरद जोशी व एम. व्ही. कुलकर्णी असे चारच जण ह्या कॉलेजात शिकवत. शेवटचे दोघे भणगे यांचेच माजी विद्यार्थी होते. त्यातले कुलकर्णी पुढे अलाहाबाद

व्यावसायिक जगात४१