पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
व्यावसायिक जगात


 संस्कृतकडे पाठ फिरवून शरद जोशी कॉमर्सला गेले व जिद्दीने अभ्यास करून जून १९५७मध्ये चांगल्या प्रकारे एमकॉम झाले. अर्थशास्त्राची त्यांना खूप गोडीही वाटू लागली हे खरे, पण ते शिक्षण चालू असतानाच 'एमकॉमनंतर पुढे काय' हा प्रश्न समोर उभा राहिला होता. कॉलेजात त्यांना दोन वर्षांसाठी मिळालेली महिना तीस रुपयांची स्कॉलरशिप सोडली तर बाकी काहीच कमाई नव्हती. आजवर वडलांनीच राहण्याचा, प्रवासाचा, पुस्तकांचा व शिक्षणाचा सारा खर्च केला होता, त्यासाठी त्यांनी मुलाला अर्धवेळ नोकरी वा शिकवणी करून वा अन्य कुठल्याही प्रकारे घरखर्चाचा भार उचलायला लावले नव्हते हे खरे; पण त्याचबरोबर वडलांच्या व नुकत्याच नोकरीला लागलेल्या मोठ्या भावाच्या पगारात आपले आठ जणांचे कुटुंब कसेबसे गुजराण करत आहे ह्याची जाणीव जोशींना होती. त्यामुळे शिकत असतानाच एकीकडे त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची पूर्वतयारी सुरू केली होती. ज्यांचा तत्कालीन आर्थिक विश्वात खूप दबदबा होता ते डॉ. सी. डी. देशमुखदेखील मूळचे आयसीएस होते. जोशींचे वडील सरकारी नोकरीत असल्याने तशा पदाचे त्यांना, नाही म्हटले तरी, लहानपणापासून थोडेफार आकर्षण होतेच. त्याकाळी ही स्पर्धापरीक्षा देणे, तिचा निकाल जाहीर होणे, त्यानंतर मुलाखत, तिचा निकाल आणि हे सगळे सोपस्कार यशस्वीरीत्या पार पाडल्यानंतर प्रत्यक्ष नेमणूक होणे ह्यात वर्षभराहून अधिक काळ सहज जात असे. दरम्यानच्या या कालावधीत अर्थार्जन करणे आणि निदान स्वतःचा खर्चतरी भागवणे बावीस वर्षांच्या जोशींच्या दृष्टीने अपरिहार्यच होते.
 त्या दृष्टीने त्यांनी मुंबई विद्यापीठाकडे व्याख्यातेपदासाठी अर्ज केला तत्कालीन नियमांनुसार हे अर्ज त्या-त्या विषयासाठी स्वतंत्ररीत्या करावे लागत असत; म्हणून अर्थशास्त्र, संख्याशास्त्र व व्यापार अशा तीन विषयांसाठी तीन स्वतंत्र अर्ज त्यांनी केले होते. पण बरेच दिवस थांबूनही विद्यापीठाकडून काहीच उत्तर आले नाही. दरम्यान त्यांना एक आमंत्रण आले; कोल्हापूरला एका नव्या कॉमर्स कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून दाखल व्हायचे.

 त्याकाळी मुंबई आणि पुण्यापलीकडच्या ग्रामीण महाराष्ट्रात उच्चशिक्षणाचे प्रमाण कमीच होते; वाणिज्य शाखेला तसाही वाव कमीच असायचा. त्यामुळे कोल्हापूरसारख्या ठिकाणी एखादे कॉमर्स कॉलेज सुरू करणे ही कल्पनाच जोशींना हास्यास्पद वाटली. पण ज्यांनी हे आमंत्रण दिले होते ते प्रा. भालचंद्र शंकर भणगे स्वतःच पूर्वी सिडनममध्ये शिकवत होते व

४०अंगारवाटा... शोध शरद जोशींचा