पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्राचार्यांच्या २८ नोव्हेंबर १९५५च्या इंग्रजी पत्रातले शेवटचे वाक्य आहे, “सोन्याचा भाव अतिशय वाढलेला असल्याने ह्या पदकाच्या मूल्याइतकी रक्कम जोशी यांना रोख दिली जाईल." त्याप्रमाणे त्यांना सुवर्णपदकाऐवजी रुपये १०५ रोख दिले गेले!
 १९५७ साली जोशी एमकॉम झाले. पुन्हा द्वितीय वर्गात; ८०० पैकी ४१३ गुण मिळवून. इंटरनॅशनल बँकिंग व स्टॅटिस्टिक्स हे विषय घेऊन. सहा वर्षांपूर्वी अनपेक्षितरीत्या सुरू केलेली व त्यावेळी खूप अवघड वाटलेली कॉमर्स कॉलेजची यात्रा सुफळ संपूर्ण झाली.

 जडणघडणीच्या ह्या कालखंडाकडे आज मागे वळून बघताना जोशी यांच्या व्यक्तिमत्त्वातील दोन वैशिष्ट्ये त्या काळातही प्रकर्षाने जाणवतात.
 एक म्हणजे त्यांची प्रखर बुद्धिनिष्ठा - प्रत्येक गोष्ट आपल्या बुद्धीच्या निकषावर पडताळून पाहायची आणि पटली तरच स्वीकारायची वृत्ती. दुसऱ्याने सांगितले म्हणून त्यांनी ऐकले, मानले असे सहसा कधी होत नसे.
 ते बारा-तेरा वर्षांचे असतानाचा एक प्रसंग. बसल्याबसल्या त्यांच्या मनात एक विचार आला. 'आपण किती नशीबवान आहोत! भारतासारख्या श्रेष्ठ देशात जन्मलो, त्यात पुन्हा शिवरायांच्या आणि ज्ञानेश्वरांच्या महाराष्ट्रात जन्मलो, त्यातही सर्वश्रेष्ठ अशा हिंदू धर्मात आणि त्याहून विशेष म्हणजे ब्राह्मण कुलात जन्मलो! जन्मतःच ह्या साऱ्या दुर्लभ गोष्टी आपल्याला लाभल्या; किती आपण भाग्यवान!'
 पण मग लगेच त्यांनी त्या विचाराचे स्वतःच्याच मनाशी विश्लेषण करायला सुरुवात केली. अनेक प्रश्न मग त्यांच्या मनात निर्माण झाले. 'भारत देश सर्वश्रेष्ठ कसा? जगातील अत्यंत गरीब, दुष्काळाने गांजलेल्या देशांत भारत मोडतो. मग असे राष्ट्र सर्वश्रेष्ठ कसे असेल? महाराष्ट्रात शिवराय आणि ज्ञानेश्वर जन्मले, पण इतर प्रांतांतही अशी नररत्ने जन्मलीच आहेत व त्या-त्या प्रदेशातील लोकांना त्यांच्या-त्यांच्या प्रदेशात जन्मलेल्या नररत्नांचा अभिमान असतोच. आपणही त्या प्रदेशात जन्मलो असतो तर आपल्यालाही त्यांच्याविषयी तेवढाच अभिमान वाटला असता. हिंदू धर्मातही सर्वश्रेष्ठ असे काय आहे? जगात जास्तीत जास्त उपासक असलेले धर्म बुद्ध आणि ख्रिस्त यांचे आहेत. इस्लामही अनेक देशांत पसरला आहे. मग एकाच भूखंडात मर्यादित असलेल्या या हिंदू धर्माला सर्वोत्तम म्हणणे म्हणजे खोट्या अभिमानाचे लक्षण नाही का? आणि ब्राह्मण श्रेष्ठ मानणे तर किती मुर्खपणाचे! ब्राह्मणांत काय सगळे महापुरुषच जन्मले? अपकृत्य करणारे कुणी झालेच नाहीत? आणि इतर जातींत जन्मूनही अलौकिक कृत्ये करणारेही अनेक असतातच!'

 या कठोर उलटतपासणीने ते अगदी हादरून गेले. जन्माच्या अपघाताने मिळालेल्या गोष्टींचा वृथा अभिमान बाळगण्याची आपल्यात प्रवृत्ती आहे आणि ती मोडून काढली पाहिजे, याची त्यांना मोठ्या प्रकर्षाने जाणीव झाली. त्या दिवसापासून त्यांनी एक निश्चय केला. जन्माच्या अपघाताने आपल्याला जे जे मिळाले असेल, ते अती कनिष्ठ आहे, असे समजून विचाराची सुरुवात करायची आणि जेथे सज्जड पुरावा मिळेल, तेथेच आणि त्या पुराव्याने सिद्ध होईल तेवढेच, जन्मसिद्ध

३६अंगारवाटा... शोध शरद जोशींचा