पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांना दिल्लीला यायचे आमंत्रण दिले गेले. जायचे-यायचे इंटर क्लासचे भाडेही मिळणार होते. येताना अमेरिकेला जाण्यासाठी त्याकाळी आवश्यक असलेले वैद्यकीयदृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्रही घेऊन यावे असे आमंत्रणपत्रात लिहिले होते. देशभरातील अगदी मूठभर विद्यार्थ्यांनाच ही संधी मिळाली होती. जोशींना खूप आनंद झाला, कारण ह्या निबंधासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली होती. सगळी पूर्वतयारी करून ते उत्साहाने दिल्लीला गेले त्या काळी दिल्लीही खूप दूरची समजली जाई व दिल्लीला जाणारे घरातले ते पहिलेच होते. सगळ्यांनी कौतुकाने त्यांना निरोप दिला. पण दुर्दैवाने तेथील चाचणीत व मुलाखतीत त्यांची पुरेशी छाप पडली नाही. दिल्लीतील सेंट स्टीफन कॉलेजातील एका विद्यार्थ्याची अंतिम फेरीत निवड झाली. जोशी अगदी निराश झाले. आपल्या हातातोंडाशी आलेला यशाचा घास शेवटच्या क्षणी गेला असे त्यांना वाटले; शिवाय, घरच्यांच्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकलो नाही याचा अपमानही वाटलाच.
 पुढे १९५६ मध्ये मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या एका महत्त्वाच्या शोधनिबंधस्पर्धेत त्यांनी भाग घेतला. त्यासाठी कसून मेहनत केली व एक बराच मोठा शोधनिबंध लिहिला. शीर्षक होते, River Valley Projects and their Role in the Agricultural Development of India (नदी खोरे प्रकल्प आणि भारतीय शेतीच्या विकासातील त्यांचे योगदान). त्याला मात्र यश मिळाले. होमजी कुरसेटजी डॅडी यांच्या नावे असलेला प्रथम पुरस्कार मिळाला. ह्या पुरस्काराची रक्कम ३०० रुपये होती; त्या काळाच्या मानाने बरीच जास्त. जोशींना खूप आनंद झाला. निबंधलेखनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या खोरे प्रकल्पांचा देशातील शेतकऱ्यांना प्रत्यक्षात किती आर्थिक लाभ झाला याचा त्यांनी संख्याशास्त्रीय अभ्यास केला. या अभ्यासात खडकवासला वॉटर अँड पॉवर रीसर्च सेंटरचे अच्युतराव आपटे, त्यावेळी पुण्यात असलेले सुपरिटेंडिंग इंजिनिअर एन. एस. जोशी आणि साखरवाडीत इस्टेट मॅनेजर असलेले त्यांच्या मोठ्या बहिणीचे सासरे श्रीधर गोपाळ देशपांडे यांची खूप मदत झाली होती. मोठी धरणे उभारताना धरणक्षेत्रातील पावसाचे जास्तीत जास्त प्रमाण नियोजनासाठी पकडले जाते, दरवर्षी तसा पाऊस पडेल व धरण पूर्ण भरेल असे गृहीत धरून प्रस्तावित बागायती क्षेत्राचे अतिशयोक्त आकडे कागदोपत्री दाखवले जातात; प्रत्यक्षात मात्र ते चुकीचेच ठरतात; ह्या मोठ्या प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांचा फारसा आर्थिक लाभ झालेला नाही; उलट जे शेतकरी त्या पाण्यावर शेती करत राहिले त्यांच्यापेक्षा जे विस्थापित होऊन मुंबईसारख्या मोठ्या शहरात येऊन स्थायिक झाले व अन्य काही व्यवसाय करू लागले त्यांची आर्थिक स्थिती अधिक सुधारली असा त्यांचा निष्कर्ष होता.

 पुढे ज्या शेतीक्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले त्या क्षेत्रातील त्यांचे हे पहिले वैचारिक पदार्पण होते. इतर कुठल्याही शेतीविषयक सुधारणेपेक्षा, शेतीमालाला चांगला भाव मिळणे हे शेतकऱ्यांसाठी अधिक गरजेचे आहे, ह्या त्यांनी भविष्यात केलेल्या मांडणीची सुरुवातही कुठेतरी ह्या अभ्यासात होती असेही म्हणता येईल. व्यक्तिशः जोशींना हा अभ्यास महत्त्वाचा वाटला होता. १ मार्च १९७६ रोजी स्वित्झर्लंडला असताना जोशींनी आपला एक बायोडेटा

३२अंगारवाटा... शोध शरद जोशींचा