पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दुसऱ्या एका मोटारीतून ते घरी परतत. सगळा वेळ कॉलेज आणि ग्रंथालय ह्यातच घालवत. सगळीकडे त्यांचा दबदबा असे. एसएससीला ते संपूर्ण बोर्डात काही लाख विद्यार्थ्यांमध्ये पहिले आले होते. भगवती नंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मास्टर्स करायला गेले. तिथले शिक्षण पूर्ण करून अमेरिकेत गेले. आज ते अर्थशास्त्रासाठी जगप्रसिद्ध अशा कोलंबिया विद्यापीठात शिकवतात. बहुतेक सर्व बड्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केले आहे व भारत सरकारनेही २००० साली पद्मविभूषण हा सन्मान देऊन त्यांचा गौरव केला आहे. आज ना उद्या त्यांना नोबेल पुरस्कारही मिळेल असे म्हटले जाते. त्यांचे एक बंधू प्रफुल्लचंद्र ऊर्फ पी. एन. भगवती हेही वडलांप्रमाणेच नामांकित वकील होते व पुढे भारताचे सरन्यायाधीशही बनले. जनहितयाचिका (Public Interest Litigation) हा प्रकार सुरू करण्याचे श्रेय त्यांचेच. त्यांनाही पद्मविभूषण मिळाले आहे. दोन भावांनी पद्मविभूषण मिळवायचे हे बहुधा एकमेव उदाहरण असावे. जगदीश भगवती हा त्या काळात जोशी यांचा आदर्श होता.
 रोज सकाळी शक्य तितक्या लवकर अंधेरीतील आपल्या घरून जोशी निघत व आगगाडीने मरीन लाइन्सला येत. तिथून पुढे चालत बोरीबंदरला कॉलेजात. एकदा कॉलेजात आले की दिवसभर तिथेच. आधी लेक्चर्स आणि ती संपल्यावर मग ग्रंथालय, सगळा अभ्यास, सगळे वाचन तिथेच. घरी रात्री उशिरा, फक्त झोपायला. नाशिकला असताना त्यांना क्रिकेट खेळायची गोडी लागली होती; पण इथे क्रिकेट अगदी पूर्ण बंद. इतर मित्र असेही त्यांना इथे फारसे नव्हते; त्यावेळी तरी ते बऱ्यापैकी एकांतप्रिय होते. इतर मुलांप्रमाणे त्यांच्याकडे चित्रपट बघायला, हॉटेलात उडवायला पैसेही नसत. घरून जो काही चार-पाच रुपये पॉकेटमनी मिळायचा तो आठवड्याहून जास्त टिकायचा नाही. त्यामुळे सगळा वेळ फक्त अभ्यास एक अभ्यास. त्यांची पहिली चार वर्षे, म्हणजे १९५५ साली ते बी.कॉम. होईपर्यंत, सिडनम कॉलेज बोरीबंदरला व्हीटी स्टेशनसमोर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या आवारातच होते, पण त्यानंतर ते स्वतःच्या आधुनिक इमारतीत, चर्चगेट स्टेशनलगतच्या बी रोडवर गेले. ह्या इमारतीतील सर्वच सोयी अधिक प्रशस्त होत्या. विशेषतः ग्रंथालय, अर्थशास्त्राशी संबंधित जगातील बहुतेक सारी महत्त्वाची पुस्तके कॉलेजच्या ग्रंथालयात होती, जगभरची आर्थिक नियतकालिकेदेखील येत. जमेल तेवढे सगळे जोशी बारकाईने वाचून काढत, टिपणे काढत.

 १९५४मध्ये दि न्यूयॉर्क हेरल्ड ट्रिब्युन या जगप्रसिद्ध अमेरिकन वृत्तपत्राने आयोजित केलेल्या एका देशव्यापी निबंधस्पर्धेत जोशींनी भाग घेतला होता. मुंबई विद्यापीठाकडे आलेल्या सर्व निबंधांत तो सर्वोत्कृष्ट ठरल्याने पुढे तो दिल्लीला शिक्षण मंत्रालयाकडे पाठवला गेला. कारण हेच मंत्रालय स्पर्धेचे व्यवस्थापन करत होते. ही स्पर्धा खूप प्रतिष्ठेची होती व विजेत्याला त्याकाळी अप्रूप असलेल्या अमेरिकेलाही पाठवले जाणार होते. देशभरातील वेगवेगळ्या विद्यापीठांकडून सादर केल्या गेलेल्या निबंधांची छाननी झाल्यावर जोशींचा अंतिम फेरीत समावेश केला गेला. त्यासाठी द्यायच्या एका चाचणीसाठी व प्रत्यक्ष मुलाखतीसाठी

शिक्षणयात्रा३१