पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

यांचे सुरेख व्यक्तिचित्र रेखाटले आहे. भारताच्या नियोजन मंडळाने नेमलेल्या अर्थशास्त्र्यांच्या सल्लागार मंडळात डॉ. मुरंजन यांचाही समावेश होता. प्राचार्यांनी आपल्याला मदत करण्यासाठी एक रिसर्च ग्रुप स्थापन केला होता व त्यात घेतल्या गेलेल्या दोन विद्यार्थ्यांमधले एक जोशी होते. १९५५-५६ सालात 'बेरोजगारांचा अंदाज' (एस्टिमेट ऑफ अनएम्प्लॉयमेंट) ह्या विषयाच्या नियोजन मंडळासाठी केलेल्या अभ्यासासाठी जोशींनी बरेच संख्याशास्त्रीय काम केले होते व त्याचे प्राचार्यांनी कौतुक केले होते.
 सुप्रसिद्ध कवी व कादंबरीकार पु. शि. रेगे त्यांना वाहतुकीचे अर्थशास्त्र शिकवायचे. मुंबईतील साहित्यिक वर्तुळात त्यावेळी रेगे यांना मानाचे स्थान होते. पण तरीही साहित्याची खूप आवड असलेल्या जोशींनी त्यांच्याविषयी काही लिहिलेले नाही. मराठी साहित्यापासून जोशी त्यावेळी बरेच दूर गेले होते, असा याचा अर्थ लावायचा का? रेगे यांचा जोशींनी निदान नामोल्लेखतरी केला आहे, पण गंगाधर गाडगीळ ह्यांच्या बाबतीत तसा नामोल्लेखही झालेला नाही. गाडगीळ त्यांना अर्थशास्त्र शिकवत असत. ते मराठी नवकथेचे प्रवर्तक म्हणून त्यावेळी ऐन भरात होते. विशेष म्हणजे पुढे जोशी यांच्याचप्रमाणे गाडगीळांनीही मुक्त अर्थव्यवस्थेचा जोरदार पुरस्कार केला होता; त्यांच्यात तो समान असा एक वैचारिक दुवाही होता. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे असे असूनही जोशींच्या लेखनात गाडगीळांचा उल्लेख कुठेच आढळत नाही. किंबहना पुढे एकदा मी त्यांच्यापाशी गाडगीळांबद्दल विचारणा केली असताना त्यांची एकही आठवण जोशी सांगू शकले नाहीत. खरेतर नंतरच्या आयुष्यात एक-दोनदा हे दोघे एकाच व्यासपीठावर वक्ते म्हणून हजरही होते, पण त्यातलेही काही जोशींना त्यावेळीतरी आठवत नव्हते.

 इथल्या विद्यार्थ्यांचे अनुभवविश्व जोशींपेक्षा कसे वेगळे होते त्याची ही एक झलक. केंद्रीय अर्थमंत्री टी. टी. कृष्णम्माचारी यांच्यावर आयुर्विमा महामंडळाचे पैसे एका भ्रष्ट उद्योगात गंतवून स्वतः कमिशन मिळवल्याचा एक गंभीर आरोप त्यावेळी केला गेला होता व त्याची चर्चा एकदा कॉलेजात सुरू होती. त्यावेळी जोशी म्हणाले, "सुदैवाने आपली न्याययंत्रणातरी अजून प्रामाणिक राहिली आहे. त्यामुळे गुन्हेगारांना शासन होऊ शकतं." त्यावर एक उद्योगपतिपुत्र फटकन म्हणाला, “घाटी लोकांची भाषा सोडून दे! कोर्टाचा निर्णय आपल्या बाजूने फिरवायचा असेल, तर कोणाला काय काय पुरवावं लागतं ते मला विचार!" आणि हे बोलताना त्याने असे काही डोळे मिचकावले, की हा करावा लागणारा पुरवठा वस्तूंचा नाही हे उघड व्हावे!

 गर्भश्रीमंत विद्यार्थ्यांप्रमाणे इथे काही अतिशय बुद्धिमान विद्यार्थीदेखील होते. त्यांतील एक म्हणजे जगदीश भगवती. भगवती जोशींच्या एक वर्ष पुढे होते. दोघेही संस्कृतप्रेमी व योगायोगाने दोघेही अभ्यंकरांचे विद्यार्थी. तिथेच त्यांचा प्रथम परिचय झाला होता. अर्थात दोघांमधले साम्य बहुधा इथेच संपत होते. भगवतींचे वडील सुप्रीम कोर्टात एक नामांकित वकील होते. रोज सकाळी चिरंजीवांना कॉलेजात सोडायला एक मोटार येई व संध्याकाळी

३०अंगारवाटा... शोध शरद जोशींचा