पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२९

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सी. डी. देशमुख आले होते. आपल्या भाषणात ते म्हणाले होते, “देशात जमा होणाऱ्या एकूण आयकरापैकी २५% आयकर हा सिडनममधील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून जमा होतो." आपण ज्या कॉलेजात प्रवेश घेतला आहे, ते किती प्रतिष्ठित आहे ह्याची त्या क्षणी जोशींना कल्पना आली. अनेक बड्या उद्योगपतींची मुले इथेच शिकायला येत. कांतीकुमार पोद्दार तर जोशींच्या वर्गातच होते. बिर्ला उद्योग चे कुमारमंगलम बिर्ला, एच.डी.एफ.सी.चे दीपक पारेख, लंडनमधील ऐतिहासिक इस्ट इंडिया कंपनी ज्यांनी मध्यंतरी विकत घेतली ते संजीव मेहता वगैरे उद्योगक्षेत्रातील आजची अनेक बडी मंडळी एकेकाळी ह्याच कॉलेजात शिकलेली आहेत. अनेक मुले स्वतःच्या मोटारीतून कॉलेजात येत. पदवीनंतर पुढे काय हा त्यांच्यापुढे प्रश्नच नसायचा. आजवर ज्या मराठमोळ्या वातावरणात जोशी वाढले होते त्यापेक्षा इथले वातावरण अगदी वेगळे होते. इथे मराठी विद्यार्थ्याला 'घाटी' म्हणून हिणवले जाई. कपडे, बोलणे, वागणे ह्या सर्वच बाबतींत मराठी विद्यार्थी मागासलेला दिसायचा. वर्गात मराठी मुले जेमतेम दहाबारा होती. सुरुवातीला हे सगळे जोशींना जडच गेले, पण हळूहळू या अवघडलेपणावर त्यांनी मात केली.
 इथले प्राध्यापक कॉलेजच्या लौकिकाला शोभेल असेच नावाजलेले होते. त्यातील ग. र. ऊर्फ जी. आर. दीक्षित यांच्याशी जोशींचा पुढेही बराच संबंध आला. पण जोशींवर सर्वाधिक प्रभाव पडला तो कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुमंत ऊर्फ एस. के. मुरंजन यांचा. एक नाणेतज्ज्ञ म्हणून ते विख्यात होते. नुकतेच अमेरिकेहून परतले होते. त्यांनी नाणेव्यवस्थेवर दोन उत्तम पुस्तके लिहिली होती व विशेष म्हणजे दोन्ही मराठीत लिहिली होती. ती इंग्रजीत लिहायला हवी होती असे म्हणणाऱ्या टीकाकारांना उद्देशून ते म्हणत, "ज्याला या विषयाचा खोलात जाऊन अभ्यास करायचा आहे आणि ह्या विषयावर मला काय म्हणायचे आहे हे जाणून घ्यायचे आहे, त्याला त्यासाठी मराठी शिकायला काय हरकत आहे?" ह्यापूर्वी बरीच वर्षे सुप्रसिद्ध इतिहासकार राजवाडे यांनी असेच फक्त मराठीतच लेखन केले होते व त्याच्या समर्थनार्थ असेच काहीसे उत्तर दिले होते. स्वतः जोशींना पुढे एका-दोघांनी 'मराठीत लिहिण्याऐवजी तुम्ही इंग्रजीत लिहा, म्हणजे सगळीकडे पोचाल' अशी सूचना केली होती, तेव्हा त्यांनीही असेच उत्तर दिले होते.
 प्राचार्यांबद्दल जोशी लिहितात,

बस्स! या एकाच उत्तरावर आम्ही लट्टू होतो. त्या एकाच वाक्याने पदोपदी जाणवणारे, टोचणारे मराठी माणसाचे दैन्य धुतले गेल्यासारखे वाटत होते. मुरंजन यांनी आम्हाला बँकिंगमधले काही शिकवल्याचे मला आठवत नाही. पण त्यांनी कान्टशी ओळख करून दिली. “I think, therefore, I am.' या कान्टच्या उक्तीतील सगळा उल्हास आणि आवेग आम्ही मुरंजनांच्या चेहऱ्यावर अनुभवला.

(अंगारमळा, पृष्ठ ५९)

 गंगाधर गाडगीळ यांनी आपल्या एका मुंगीचे महाभारत ह्या आत्मकथनात डॉ. मुरंजन

’’’शिक्षणयात्रा’’’ ◼ ‘’’२९’’’