पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मोर्चा सुरू झाला. भूपिंदरसिंग मान, विजय जावंधिया, शरद जोशी हे मोर्च्याच्या अग्रभागी होते. पण राजभवनपर्यंत पोचायच्या आतच पोलिसांनी त्यांना पकडले व सरळ कोर्टात हजर केले. न्यायाधीशांनी एकदम १६ दिवसांचा रिमांड दिला.
 जोशींबरोबर महाराष्ट्रातून गेलेल्या दहा जणांमध्ये परभणीचे एक प्रसिद्ध वकील अनंत उमरीकर हेही होते. शेतकरी संघटनेचे ते हितचिंतक होते, शिवाय सामाजिक व सांस्कृतिक कार्यात रमणारे होते. अशा एखाद्या आंदोलनात सामील व्हायचा त्यांचा हा पहिलाच अनुभव होता. पंजाबभेटीतील आपल्या या अनुभवांवर त्यांनी 'आंदोलन' नावाचे एक ८८ पानांचे पुस्तकच लिहिले आहे. परभणीच्या रेणुका प्रकाशनाने ऑगस्ट १९९२ मध्ये ते प्रकाशित केले आहे. 'वेडेपीर' या आपल्या २२३ पानांच्या पुस्तकात त्यांनी शेतकरी संघटनेच्या चौदा कार्यकर्त्यांची रसाळ अशी व्यक्तिचित्रेही रेखाटली आहेत. इतरही बरीच पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.
 दुर्दैवाने त्या कारावासात असतानाच एक ऑगस्ट रोजी शरद जोशी यांच्या छातीत एकाएकी जोरात दुखायला लागले. तुरुंगात एकच धावपळ सुरू झाली. त्यांना रुग्णालयात हलवावे लागले. तो अंजायनाचा त्रास होता असे निदान झाले. सुदैवाने वेळीच चांगली वैद्यकसेवा मिळाली म्हणून बरे झाले; नाहीतर गंभीर प्रसंग ओढवू शकला असता. हृदयविकाराचा जोशींना झालेला तो आयुष्यातील पहिलाच त्रास. उर्वरित आयुष्यात ह्या दुखण्याने त्यांचा बराच पाठपुरावा केला.


 एक व्यक्तिगत आठवण इथे नमूद करायला हवी. बटाला इथे मान यांच्या घरी गेलो असताना त्यांच्या पत्नी, भाभीजी, यांनी ती सांगितली. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी शीख सुरक्षारक्षकांकडून इंदिराहत्या झाली त्यावेळी त्यांचे यजमान व इतरही काही शीख शेतकरीनेते महाराष्ट्रात होते; टेहेरे येथे त्याचवेळी चालू असलेल्या शेतकरी संघटनेच्या विशाल सभेत हजर होते. देशभर शीखविरोधी भयानक दंगली सुरू झाल्या होत्या; तशा बातम्या कानावर येत होत्या. त्या दिवसांचे वर्णन करताना भाभीजी गहिवरलेल्या आवाजात म्हणाल्या,

 "बद्रीनाथ देवकर आणि भास्करराव बोरावके अशा वेळी मोठ्या धाडसाने पुढे झाले व शीख बांधवांच्या सुरक्षिततेची सगळी जबाबदारी त्यांनी घेतली. माझे पती त्यांच्यातच होते. सर्व शिखांना तीन-चार मोटारींमध्ये बसवून ते कोपरगावला स्वतःच्या घरी घेऊन गेले. तिथे त्यांनी शिखांना लपवून ठेवलं. आजूबाजूच्या काही विघ्नसंतोषी लोकांना ह्याची कुणकुण लागली असावी. ते सारखे दाराशी येऊन 'इथे कोणी शीख लपलेले आहेत का, ते बघत होते. पण बद्रींनी व भाऊंनी कोणाला दाद लागू दिली नाही. देशभर शिखांची हत्या सुरू होती व अशा वातावरणात ट्रेनने पंजाबात परत जाणं अशक्यच होतं. दहाबारा दिवस सगळ्यांनी तिथेच लपून काढले. मग वातावरण जरा निवळलं असं बघून त्यांनी शिख बांधवांना परत पंजाबात पाठवलं. सगळे आपापल्या घरी सुरक्षित पोचले, तेव्हाच त्यांनी व आम्हीही सुटकेचा नि:श्वास

अटकेपार२७३