पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ठोकून होते; जे राजकीय नेते कधीच करत नाहीत. ग्रामीण जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी ही एक कृतीदेखील पुरेशी आहे. चंडीगढ आंदोलनात भाग घेणारे बहुसंख्य हे तरुण शेतकरी होते; अकालींच्या मोर्च्यात सामील झालेल्या शेतकऱ्यांप्रमाणे वृद्ध नव्हते. एका तरुण शेतकऱ्याने मार्मिक शब्दांत म्हटल्याप्रमाणे, "अकाली हे धर्मयुद्ध लढत आहेत, तर आम्ही कर्मयुद्ध लढत आहोत.' अकाली दल व शेतकरीनेते यांच्या भूमिकांतील फरक यातून स्पष्ट होतो.)

हे आंदोलन किती शांतिपूर्ण होते, हिंसेचा एकही प्रकार कसा घडला नाही याचेही याच लेखात शेवटी शर्मा यांनी खूप कौतुक केले आहे. ते म्हणतात,

नेत्यांची इच्छा असेल तर लोक शांतता पाळतात हे यातून सिद्ध होते. अनेकांनी चिथावणी देऊनही शेतकऱ्यांनी कायम संयम पाळला. किंबहुना शेतकरी संघटनेच्या स्वयंसेवकांनी – जे स्वतःला किसान रिझर्व्ह पोलीस (KRP) म्हणवतात त्यांनी - स्वतःच जवळजवळ शंभरएक गुंडांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

 इथे एक मुद्दा नमूद करायला हवा. इतर शेतकरीनेत्यांचे मत कदाचित वेगळे असू शकेल, पण व्यक्तिशः जोशींचा वीजदर वाढवायला काहीच विरोध नव्हता; सरकारने तोट्यात वीज विकावी हे त्यांना अमान्यच होते. त्यांचे म्हणणे एवढेच होते, की विजेचा जो काही खर्च प्रत्यक्षात येतो तेवढा सगळा खर्च तुम्ही शेतीमालाची किंमत काढतानाही हिशेबात धरा; म्हणजे मग तो वाढीव वीजदर शेतकरी आनंदाने देईल. कुठल्याही प्रकारची सवलत (सबसिडी) त्यांना तत्त्वशः अमान्य होती. पण प्रत्यक्षात विजेचा खर्च हेक्टरी १५३ रुपये येत असताना सरकार मात्र धान्याची किंमत ठरवताना तो वीजखर्च फक्त हेक्टरी ७८ रुपये पकडत असे. इतरही सर्व इनपुट्स असेच खुप कमी खर्चाचे दाखवले जात व त्यामुळे शेतीमालाचा उत्पादनखर्च आपोआपच कमी धरला जाई व पर्यायाने शेतीमालाची किंमतही कमीच पकडली जाई. नेमका हाच अन्याय जोशी दूर करू पाहत होते.


 सोमवार, १६ एप्रिल, १९८४च्या 'इंडियन एक्स्प्रेस'मध्ये स्वामिनाथन एस. अय्यर यांचा “Harvesting Hindu-Sikh amity' ह्या शीर्षकाचा एक विस्तृत लेख संपादकीयालगतच प्रसिद्ध झाला आहे. तोही काही वेगळे विचार मांडणारा आहे. साररूपाने त्यांचे विचार असे आहेत :

 पंजाबमधील शीख असंतोषाचा विचार करताना शिखांनीही काही तथ्ये विचारात घ्यायला हवीत. पंजाबमधील दोन तृतीयांश शेतकरी हे शीख आहेत व ते भरपूर पिके काढतात हे खरे असले, तरी त्यामागे बिहारसारख्या राज्यातून येणाऱ्या लक्षावधी हिंदू शेतमजुरांचाही मोठा वाटा आहे. किंबहुना ह्या शेतमजुरांशिवाय पंजाबातील शेती होऊच शकणार नाही. इतरही

अटकेपार२६९