पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केले. त्या ठिकाणी स्वच्छता, दिवे, पाणीपुरवठा यांचीही चांगली व्यवस्था केली. सरकारशी बोलणी सुरू व्हावी म्हणूनही पुढाकार घेतला. शेतकऱ्यांनी शांतता पाळली आणि प्रशासनानेही संयम राखला. आंदोलन कसे हाताळावे ह्याचा हा एक आदर्शच होता.


 चंडीगढमधून प्रसिद्ध होणाऱ्या सर्वच इंग्रजी, हिंदी व पंजाबी वृत्तपत्रांनी ह्या आंदोलनाला भरपूर प्रसिद्धी दिली. जवळजवळ रोजच पहिल्या पानावर सचित्र बातमी येत होती. शरद जोशींचा सभेत भाषण करतानाचा तीन कॉलमी फोटो पहिल्याच दिवशी सगळ्या वृत्तपत्रांनी छापला होता. सगळ्यांनी संपादकीय लिहूनही आंदोलनाची दखल घेतली. ह्या पत्रकारांकडून त्यावेळी अनेक महत्त्वाचे मुद्दे पुढे आले; त्यांतले काहीतर असे होते, की जे स्वतः शेतकरीनेत्यांनीही नोंदवलेले नव्हते किंवा 'शेतकरी संघटक'सारख्या संघटनेच्या मुखपत्रातही कुठे लिहिले गेलेले नाहीत.
 उदाहरणार्थ, १३ मार्च १९८४च्या 'दि ट्रिब्यून'मधील एक बातमी. राजभवनसमोरचा गोल्फ क्लब हा पंजाबातील सर्वांत उच्चभ्रू क्लब. एरव्ही तिथे पाय ठेवायला मिळणेही सर्वसामान्यांना अवघड. पण ह्या आंदोलनात असंख्य शेतकऱ्यांनी रात्री झोपताना आपापल्या पथारी खुशाल तिथल्या खास राखलेल्या विस्तीर्ण हिरवळीवर पसरून दिल्या होत्या. सुखना लेकमध्ये बोटिंग करणे किंवा सेक्टर १७मधील श्रीमंती शॉपिंग सेंटरमध्ये भटकणे हाही अप्राप्य असा आनंद शेतकऱ्यांनी घेतला. चंडीगढमधील राजेशाही हवेल्याही अनेक शेतकरी बाहेरून न्याहाळत असत. ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांना शहरी चंडीगढमध्ये आल्यावर काय काय वाटत असेल ह्याची ह्यावरून काहीशी कल्पना येते. 'दि ट्रिब्यून'ने याची आवर्जून नोंद केली आहे.
 ह्याच पेपराचे १५ मार्चचे 'The March on Chandigarh' हे संपादकीय या आंदोलनाचा 'unprecedented in numbers and also qualitatively different from other demonstrations' ('संख्येचा विचार करता अभूतपूर्व आणि शिवाय इतर निदर्शनांपेक्षा वेगळ्याच गुणवत्तेचे') म्हणून गौरव करते व शेवटी म्हटते,

Half a century ago Sir Chhotu Ram aroused the farmers of the Punjab of that time to a sense of wrong at the hands of the moneylender and the consumer of agricultural products. This resulted in a major revolution in thought and a re-evaluation of roles. Mr. Sharad Joshi is using a much bigger platform to propagate his philosophy of social equality and economic justice. His campaign could well become an important well become an important determining factor in shaping the country's political scenario, especially on the eve of the general elections for Parliament and several State Assemblies.

अटकेपार२६७