पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केला आहे, नंबरदेखील मिळाला आहे. टेलिफोन मात्र अजून मिळालेला नाही. सरकारी कामांना किती उशीर लागतो हे माहिती आहे ना तुम्हाला!'
 सत्याग्रहींमध्ये सहभागी असलेले कोपरगावचे भास्करराव बोरावके म्हणतात,
 "त्या काळात खलिस्तानचा प्रश्न अगदी पेटून उठलेला. पण या आंदोलनात तथाकथित हिंदू-शीख वैर किती फसवं आहे, धर्मभेद हा खोटा वाद कसा आहे, हे कोणालाही दिसेल इतकं स्पष्ट झालं. आणखी एक गोष्ट – जोशीसाहेबांनी कधीही शिखांचं लांगूलचालन केलं नाही. तिथल्या शिखांमध्ये दारू प्यायचं प्रमाण प्रचंड. पहिल्याच दिवशी बरेच शीख बांधव दारू पिऊन आले होते. साहेबांनी त्यांना अगदी स्पष्ट शब्दांत त्याच दिवशी व्यासपीठावरून जाहीर तंबी दिली. म्हणाले, 'ज्यांना दारू प्यायची असेल, त्यांनी इथून ताबडतोब चालतं व्हावं.' आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवसापासून एकही शीख बांधव घेराओत दारू पिऊन आला नाही! इतका स्पष्टवक्तेपणा दाखवूनही लोकांवर इतका जबरदस्त होल्ड असलेला दुसरा कोणीही नेता आम्ही आजपर्यंत कधी पाहिलेला नाही."
 कोपरगावचेच दुसरे एक शेतकरी बद्रीनाथ देवकर जोशींच्या खास विश्वासातले, त्यांचा भरपूर व्यक्तिगत सहवास लाभलेले. तरुणपणापासूनच संघटनेचे पूर्णवेळ काम करू लागलेले. ते म्हणतात,
 "किसाननगरातून फेरफटका मारताना मला जाणवत होतं, की पंजाबी शेतकरी किती हरहुन्नरी आहे. त्याने तीन दगड गोळा करून त्यांची चूल बनवली. शेजारच्या झाडाझुडपांतून वाळलेला लाकूडफाटा गोळा केला. काही पन्हाळी पत्र्यांचे तुकडे मिळवले, ते दगडांनी ठेचून सरळ केले आणि त्यांचे तवे आणि पोळपाट बनवले. मोठ्या बाटल्यांचं केलं लाटणं! कुठेही हा शेतकरी अडला नाही. शिवाय आल्यागेल्याला अगदी आग्रहाने बोलावून जेवायला द्यायचे. तिसऱ्या दिवसापासून जवळच्या खेड्यांमधून इतके ट्रॅक्टर यायला लागले की मोजणं मुश्किल! प्रत्येक ट्रॅक्टरवर एक चालक पुरुष व बाकी सर्व स्त्रिया. त्यांनी वेढ्यात बसलेल्या सर्व पुरुषांना सांगितलं, 'तुम्ही घराची चिंता करू नका. आंदोलनात राहा. आम्ही सर्व पुरवठ्याची जबाबदारी घेतो.' दुधाचे कॅन, भाजीपाला, पीठ, फळफळावळ, खाण्याचे तयार पदार्थ ट्रॅक्टर भरभरून आले व दररोज येतच राहिले. खाण्याची अगदी रेलचेल झाली. आंदोलन संपल्यावर हे आलेलं धान्य.पीठ,शिधा वगैरे मोठ्या प्रमाणावर उरलं होतं. ते सगळं मंडईत नेऊन त्याचा लिलाव केला गेला व त्याचे लाख, दीड लाख रुपये जमा झाले!"

 चंडीगढच्या प्रशासनाचेही शेतकरीनेत्यांनी जाहीर कौतुक केले. खरेतर शेतकऱ्यांचे भांडण हे पंजाब सरकारशी होते, चंडीगढ़ प्रशासनाशी नव्हे. चंडीगढ़ प्रशासनाच्या दृष्टीने तो केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा होता. आवश्यकता भासल्यास पोलिसांचे बळ वापरून वेढा उधळून टाकायची प्रशासनाची तयारी होती; पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे आंदोलन अगदी शांततापूर्ण चालले आहे हे लक्षात आल्यावर प्रशासनानेही बळाचा वापर टाळला. शेतकरीनेत्यांबरोबर चर्चा करून शेतकरी कुठल्या कुठल्या रस्त्यांवर धरणे धरतील हे निश्चित

२६६अंगारवाटा... शोध शरद जोशींचा