पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सोळा मार्च. वेढ्याचा पाचवा दिवस. आता रोज आसपासच्या गावांतून नवे नवे शेतकरी मोर्च्याने येऊन वेढ्यात सामील होऊ लागले. स्त्रियाही मोठ्या संख्येने येऊ लागल्या. शेजारच्या हरयाणातील पंधरा-वीस हजार शेतकरी लवकरच तिथे येऊन दाखल होत आहेत अशीही बातमी होता. सरकारचे हेलिकॉप्टर रोज सकाळी किसाननगराची हवाई पाहणी करायचे. त्यांनीही शेतकऱ्यांचा उत्साह वाढता आहे हे सरकारपर्यंत पोचवले असणार. वृत्तपत्रे तर रोजच पानभर बातम्या छापत होती.

 ही सारी परिस्थिती विचारात घेऊन शेवटी पंजाब सरकारने सतरा तारखेला, म्हणजे सहाव्या दिवशी, शेतकरीनेत्यांशी बोलणी सुरू केली. उभय बाजूंच्या संमतीने लुधियाना येथील सुप्रसिद्ध पंजाब कृषी विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. एस. एस. जोल ह्यांच्या अध्यक्षतेखाली पुढील पंधरा दिवसांत एक तज्ज्ञ समिती नेमायचा निर्णय सरकारने घेतला. डॉ. जोल हे आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले एक कृषिशास्त्रज्ञ होते. पुढे त्यांना पद्मभूषण पुरस्कारही दिला गेला. त्यांना मदत करण्यासाठी म्हणन समितीचे इतरही तीन सदस्य असणार होते; ते तिघे वरिष्ठ सरकारी अधिकारी होते. समितीने आपला अहवाल तीन महिन्यांत द्यायचा असेही ठरले. या तज्ज्ञ समितीने वीजदर ठरवताना वीज उत्पादनाचा खर्च विचारात घ्यायचा, पण त्याचबरोबर शेतीमालाची किंमत ठरवतानाही तोच वाढीव वीजदर विचारात घ्यायचा व त्या आधारावर शेतीमालाची किंमत ठरवायची असे ठरले. शेतीमालाची किंमत ठरवण्याची ही पद्धत अधिक शास्त्रशुद्ध होती व तीच देशभर सर्वत्र लागू झाली तर शेतकऱ्यांचा फार मोठा फायदा त्यात होणार होता. किंबहुना, शेतीमालाची रास्त किंमत ठरवण्याची योग्य यंत्रणा उभारणे ह्या मागणीवर जोशींचा प्रथमपासूनच खूप भर होता व त्या दिशेनेच टाकलेले हे पाऊल होते. आधी आंदोलनाकडे पूर्ण दुर्लक्ष करणाऱ्या सरकारने एवढी तयारी दर्शवली हाही मोठा विजय होता.
 त्यानंतर शेतकऱ्यांनी वेढा उठवायचे ठरवले. ज्या परेड ग्राउंडवरून आंदोलनाला सुरुवात झाली त्याच परेड ग्राउंडवर १८ मार्चला प्रचंड जल्लोषात विजयोत्सव साजरा झाला.

 ह्या सहा दिवसांत जे कार्यकर्ते तिथे प्रत्यक्ष हजर होते, त्यांच्या दृष्टीने हा आयुष्यातील एक अविस्मरणीय असा अनुभव होता. त्यांच्या निरीक्षणांतुन व आठवणींतुन आंदोलनाच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश पडतो. किसाननगरमध्ये पहिल्या दोन दिवसांतच शेतकऱ्यांनी आपापल्या कामचलाऊ झोपड्या उभारल्या याचा उल्लेख मागे झालाच आहे. त्या घटनेला चंद्रकांत वानखडे यांनी आपल्या उपरोक्त लेखात लिहिल्याप्रमाणे विनोदाची झालरही होती. प्रत्येक झोपडीसमोर एक पुठ्याचा बोर्ड लटकत होता. त्यावर त्या झोपडीचे नाव, घर क्रमांक व टेलिफोन क्रमांक गुरुमुखीत लिहिलेले असायचे. वर एक शोभेचा टीव्ही अँटेनादेखील लटकत होता! चंडीगढमधील इतर उच्चभ्रू बंगल्यांची ही नक्कल होती! 'हा टेलिफोन नंबर कुठला? इथे तर टेलीफोनच नाहीये,' असे विचारले, तर उत्तर यायचे, 'टेलिफोनसाठी अर्ज

अटकेपार२६५