पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करण्यासारखं काय आहे? कोणताही शिक्षणक्रम घेतला तरी फरक काहीच पडत नाही.' चिंतामणराव देशमुख, त्यावेळचे आमचे दुसरे चरित्रनायक म्हणत, आवडणारी गोष्ट कोणीही करेल; पण करावी लागणारी गोष्ट आवडीने करणे यात पुरुषार्थ आहे. आपल्या लोकोत्तरतेच्या धुंदीत, आपल्या हातानेच आपले आयुष्य कडू करून घेण्यात गोडी मानणारे कितीतरी खांडेकरी नायक डोक्यात बिळे करून बसले होते.
(अंगारमळा, पृष्ठ ५१)

 जोशींना त्यांचा एक जवळचा मित्र म्हणाला, "तुझ्या बाबतीत काही प्रश्नच नाही रे. तू संस्कृत घेणार हे आम्हाला ठाऊकच आहे."
 खरे तर ह्यात जोशींनी नाराज व्हावे असे काहीच नव्हते, कारण शेवटी तो त्यांचा एक जवळचा मित्रच होता; पण कुठल्यातरी एका सर्वसामान्य विद्यार्थ्याने आपण भविष्यात काय करणार हे ठामपणे सांगावे हे त्यांना अजिबात आवडले नाही. काहीशा रागाने व त्याचे म्हणणे खोडून काढत “मी कॉमर्सला जाऊन अर्थशास्त्राचा अभ्यास करणार," असे जोशींनी जाहीर केले.
 घरी आल्यावर जोशींनी आपला निर्णय घरच्यांनाही सांगितला. सगळ्यांना आश्चर्य वाटले. शरदने प्राध्यापक बनावे आणि ते करायचे नसेल, तर इतर सगळ्या भावांप्रमाणे सायन्सला तरी जावे व इंजिनिअर बनावे असे घरच्यांचे म्हणणे पडले. कॉमर्सला जाऊन हा मुलगा पुढे करणार काय, हाच घरच्यांना प्रश्न पडला होता. स्वतः जोशींनाही आपण असे करणे कदाचित चुकीचे ठरेल हे विचारांती जाणवलेदेखील; पण एकदा सगळ्यांसमोर आपला निर्णय जाहीर केल्यानंतर आता तो फिरवणे त्यांना कमीपणाचे वाटले. जिद्दीने त्यांनी कॉमर्सला प्रवेश घेतला. तोही पुन्हा सिडनम कॉलेजात.
 त्याकाळी महाराष्ट्रात अगदी थोडी वाणिज्य महाविद्यालये होती. मुंबईत बोरीबंदरचे सिडनम व माटुंग्याचे पोद्दार होते. बहुतेक मराठी विद्यार्थी पोदार कॉलेजात जात. तिथले एकूण वातावरणही मध्यमवर्गीय होते. ह्याउलट सिडनममध्ये उच्चभ्रू विद्यार्थ्यांचा भरणा होता. पारशी, गुजराती, मारवाडी मुले तिथे बहुसंख्य होती. साहजिकच जोशी पोद्दारमध्ये अधिक सहजगत्या सामावून जाऊ शकले असते. घरापासून ते तुलनेने जवळही होते. मोठे बंधू बाळासाहेबही पोद्दारलगतच असलेल्या रुइयामध्ये सायन्सला होते. पण का कोण जाणे, नेहमी इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करायचे, त्यांना अवघड वाटणारी वाटच आपण स्वीकारायची असा जणू त्यांनी निश्चयच केला होता!

 १९१३ साली स्थापन झालेले सिडनम हे केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण भारतात, किंबहुना परदेशातही नामांकित होते. आशिया खंडातील हे सर्वांत पहिले वाणिज्य महाविद्यालय. त्यावर्षी, म्हणजे १९५१ साली, महाविद्यालयाच्या वार्षिकदिनी प्रमुख पाहुणे म्हणून रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर (व नंतरचे केंद्रीय अर्थमंत्री) चिंतामणराव ऊर्फ

२८अंगारवाटा... शोध शरद जोशींचा