पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तिथे जायची जोशींची खूप जुनी इच्छा ह्या दौऱ्यात पूर्ण झाली. योगायोग म्हणजे, ते ह्या ग्रंथालयात असतानाच त्या दिवशीचा 'इंडियन एक्स्प्रेस'चा अंक (चंडीगढ आवृत्ती) कोणीतरी त्यांना आणून दाखवला व त्यात पहिल्याच पानावर त्यांचा मोठा फोटो व खन्ना येथील भाषणाची बातमी छापली होती. महाराष्ट्रातील त्यांच्या कुठल्याच भाषणाला अशी प्रसिद्धी पूर्वी मिळाली नव्हती.
 दुसऱ्या दिवशी इंडियन एक्स्प्रेसचे चंडीगढ येथील प्रमुख वार्ताहर विनोद मिश्रा यांनी जोशींची विस्तृत मुलाखत घेतली व ती पुढल्या दिवशी पेपरात छापूनही आली. मिश्रा हे जेमतेम तिशीतले, परदेशात शिकून आलेले, खूप हुशार असे पत्रकार होते व त्यांचे प्रश्न मोठे मार्मिक होते. “शहरातील दारिद्र्य हाही नुकसानीतील शेतीचाच एक परिणाम आहे व ग्रामीण भागातील भांडवलसंचय हाच देशातील दारिद्र्यावरचा एकमेव उपाय आहे," असे जोशी यांनी मुलाखतीत म्हणताच, "पण उद्या हाच शेतकरी इतरांचे शोषण करू लागला तर?" असा प्रतिप्रश्न मिश्रांनी विचारला. उत्तरादाखल जोशी म्हणाले, “तर मग शेतकऱ्यांशीही लढावं लागेल आणि संघटना तशी मोर्चेबंदी करायला कचरणार नाही. कारण मुळात हा लढा शेतकऱ्यांसाठी नसून दारिद्र्याविरुद्ध व शोषणाविरुद्ध आहे."
 उपरोक्त पुस्तकातील कुळकर्णी यांची अनेक निरीक्षणे वेधक आहेत. अगदी सुरुवातीला पुणे स्टेशनात गाडी लागली, तेव्हा दोन हातांत दोन बॅगा घेऊन, धक्काबुक्की करत, कसेबसे डब्यात शिरणारे शरद जोशी पाहूनच कुळकर्णी काहीसे चमकले. नेता म्हटल्यावर तो नेहमी झोकातच राहतो, आपल्या व्यक्तिगत सुखसोयींकडे कधीच दुर्लक्ष होऊ देत नाही, ह्या रूढ अनुभवाला छेद देणारे ते दृश्य होते. कुळकर्णी म्हणतात, "ज्याची प्रतिमा महाराष्ट्रात 'श्रीमंत शेतकऱ्यांचा कैवारी' म्हणून जाणीवपूर्वक मलिन केली जात होती, असा हा शरद जोशी दोन्ही हात सामानात गुंतवून, रेल्वे स्टेशनचे दादर चढून-उतरून, दुसऱ्या वर्गाच्या डब्यात शिरत होता!"
 शेतकरीनेता म्हणून जोशींनी केलेला हा पंजाबचा पहिलाच दौरा. पंजाबबरोबर तेव्हा जडलेले नाते पुढे काळाच्या ओघात अधिकाधिक दृढ होत गेले.

 १९८२ मधील ह्या दौऱ्यानंतर १७,१८ व १९ फेब्रुवारी १९८४ रोजी मराठवाड्यात परभणी येथे भरलेल्या शेतकरी संघटनेच्या दुसऱ्या अधिवेशनात पुन्हा एकदा पंजाबचा विषय निघाला. तिथे पंजाबातून आलेले प्रतिनिधीही होते. त्यांनी चंडीगढ येथे पुढील महिन्यात ते वीजमंडळाविरुद्ध करणार असलेल्या आंदोलनाविषयी माहिती दिली. जोशींनी त्यांना लगेचच जोरदार पाठिंबा दिला. 'शेतकरी तितुका एक एक' ही घोषणा मूर्त स्वरूपात आणण्यासाठी 'पंजाबमधील शेतकऱ्यांच्या ह्या आंदोलनात महाराष्ट्रातील शेतकरी बांधवदेखील त्यांना साथ देतील व त्यासाठी महाराष्ट्रातील निदान १००० शेतकरी चंडीगढला जातील' असे जोशींनी जाहीर केले.

२६०अंगारवाटा... शोध शरद जोशींचा