पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कृष्ण गांधी व मध्यप्रदेशचे विनयचंद्र मुनीमजी यांची भाषणे झाली. महाराष्ट्रातर्फे विजय जावंधिया बोलले. नागपूरचे असल्याने त्यांचे हिंदी उत्तम होते. स्वतः जोशी मात्र ह्या पहिल्या सत्रात काहीच बोलले नाहीत. बैठकीतील इतरांच्या मनात, बैठकीचा मुख्य विषय असलेल्या घटनानिश्चितीविषयी जोशींची भूमिका काय असेल ह्याविषयी बरीच शंका होती. जोशींचे नाव जरी सर्वांनी ऐकले असले, तरी उपस्थितांपैकी एक राजेवाल सोडले तर इतर कोणीही जोशींना पूर्वी कधीच भेटलेलेही नव्हते. स्वतः जोशींनाही ह्या बैठकीत इतरांपेक्षा आपण वेगळे पडत चाललो आहोत ह्याची पहिल्याच सत्रात कल्पना आली होती. कदाचित त्यामुळेच तेही तसे गप्पगप्पच होते.
 हैदराबाद येथे १९८० मध्ये अखिल भारतीय किसान युनियनची स्थापना झाली, त्याच वेळी 'पुढच्या बैठकीत घटना निश्चित करायची' असे ठरले होते. पण अनेक कारणांनी ही पुढली बैठक मधली दीड-दोन वर्षे होऊ शकली नव्हती. शेवटी खन्ना येथे त्या बैठकीचा योग आला होता व घटनानिश्चिती हा तिचा अजेंडा पूर्वीच ठरला होता. दुसऱ्या सत्रात सर्वांनी घटनेची मुख्य कलमे काय असावी ह्यावर मते मांडली. त्याचबरोबर शासनाकडे सादर करण्यासाठी आपापल्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा मागण्या मांडल्या गेल्या. मेडिकल व इंजिनिअरिंग कॉलेजांत शेतकऱ्यांच्या मुलांसाठी राखीव जागा ठेवाव्यात इथपासून ते सरकारने कीटकनाशकांचा पुरवठा स्वस्त दरात करावा इथपर्यंत अनेक मागण्या पुढे आल्या. सगळ्यांचे बोलणे बराच वेळ शांतपणे ऐकून घेतल्यानंतर जोशी बोलण्यासाठी उभे राहिले. अतिशय नम्रपणे त्यांनी भाषणाला सुरुवात केली.
 "घटनेचा मसुदा निश्चित करण्यासाठी बोलावलेली ही बैठक आहे व तिला आम्ही आपले अतिथी म्हणून हजर राहिलो आहोत. अशावेळी आम्ही काही मूलभूत मुद्दे उपस्थित करणं गैर वाटेल. लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी वधूवर बदलायची सूचना करावी असंच काहीसं ते वाटेल! पण अशा अखिल भारतीय युनियनची उद्दिष्टं नक्की करताना अधिक मूलगामी विचार व्हायला हवा व तो झाल्यावर मगच घटनेचा मुद्दा विचारात घेता येईल. आधी उद्दिष्टं स्पष्ट असावीत व मग ती साध्य करण्यासाठी कुठली घटना उपयुक्त ठरेल, ते बघता येईल. त्या दृष्टीने माझे विचार मांडण्यासाठी मला जरा अधिक वेळ लागेल व तो अध्यक्षांनी द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो."

 तसा वेळ सुदैवाने अध्यक्षांनी दिला व त्यानंतर स्वतःची पार्श्वभूमी, शेतकरी प्रश्नाची ऐतिहासिक मीमांसा, शेतीमालाच्या जाणीवपूर्वक कमी राखलेल्या किंमती, गोऱ्या इंग्रजाचेच धोरण चालू ठेवणारे काळे इंग्रज, स्वतःचे आंबेठाणमधील शेतीचे अनुभव हे सारे जोशींनी विस्ताराने मांडले. “शेतीमालाला रास्त भाव हाच एक-कलमी कार्यक्रम आपण समोर ठेवावा व तसा भाव मिळाला, तर अन्य कुठल्याही अनुदानाची वा सवलतीची आपल्याला गरजच राहणार नाही; त्या एका मागणीमागे देशभरातील शेतकरी उभा करता येईल, त्यासाठी लिखित घटना वगैरे बाबींची गरज नाही; अगदी अत्यावश्यक असेल तेवढेच बांधीव रूप आपण

२५८अंगारवाटा... शोध शरद जोशींचा