पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 कुळकर्णीसारखे विचारवंत आपल्यात असावेत असे जोशींना वाटत असावे. २६ मे ते ५ जून १९८२ या कालावधीतील ह्या दौऱ्यात आलेल्या अनुभवांवर कुलकर्णी यांनी पुढे लौकरच 'शरद जोशींबरोबर... पंजाबात' ह्या शीर्षकाखाली माणूस साप्ताहिकात एक लेखमालाही लिहिली व पुढे एप्रिल १९८३मध्ये शेतकरी प्रकाशन', अलिबाग, यांच्यातर्फे ती पुस्तकरूपाने प्रकाशितही झाली. एक गमतीचा भाग म्हणजे पंजाबात पोचल्यावर प्रत्येक प्रसंगी जोशी त्यांची ओळख 'प्राध्यापक म्हणून करून देत व तेव्हा सर्वच उपस्थित पंजाबी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मोठे आश्चर्य उमटायचे. नंतर केव्हातरी त्याचा खुलासा झाला - पंजाबीत 'प्राध्यापक' हा शब्द 'कुंभार' ह्या अर्थाने वापरला जातो!
 'माणूस'चे संपादक श्री. ग. माजगावकर यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिले होते,

एक महाराष्ट्रीय नेता परप्रांतात जाऊन, आपल्या विचारांचा, चळवळीचा तेथे प्रसार करतो, ही घटनाच नवीन होती. आज सगळी क्षितिजे लहान होत आहेत, संकुचितपणा वाढतो आहे. जो तो आपल्या प्रांतापुरता, पक्षापुरता होतो आहे. शरद जोशींची कृती नेमकी ह्याविरुद्ध होती. क्षितिजे विस्तारण्यासाठी ते पंजाबला चालले होते.

 खन्ना गावाला पंजाबातील शेतीजीवनात महत्त्वाचे स्थान आहे व खरेदी-विक्री संघाच्या आवारात पाऊल टाकताच त्याचे कारणही स्पष्ट होत होते. पंजाबातील हा सर्वांत मोठा खरेदीविक्री संघ. प्रत्यक्ष बाजारपेठ एका मोठ्या एक मजली इमारतीत आहे व तिच्या चारी बाजूंना मोकळे मैदान आहे. मैदानाच्या त्या प्रचंड आवारात नजर पोचेल तिथपर्यंत शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या गव्हाच्या पोत्यांचे अवाढव्य ढीगच्या ढीग पसरले होते. सगळीकडे असंख्य ट्रॅक्टर्स उभे होते व तेही गव्हाच्या पोत्यांनी शिगोशीग भरलेले होते. पंजाबात खरेदी होणाऱ्या एकूण गव्हापैकी एक तृतीयांश गहू ह्या एकाच मंडीत खरेदी केला जातो. ह्याच जागी अखिल भारतीय किसान युनियनची बैठक बोलावण्यात मोठेच औचित्य होते.
 बैठकीत सर्वांत जास्त उपस्थिती साहजिकच पंजाबमधील शेतकरीनेत्यांची होती. त्याशिवाय हरयाणा, दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार येथून प्रतिनिधी आले होते. युनियनच्या घटनेचा लिखित मसुदा तयार करणे हा बैठकीचा मुख्य अजेंडा होता. त्यानंतरचा वेळ युनियनचे नाव, झेंडा, वर्गणी, निधिसंचय, पदाधिकारी, अंतर्गत निवडणुका वगैरे संघटनात्मक बाबींवरील चर्चेत आणि शासनाकडे कुठल्या मागण्या मागायच्या ते निश्चित करण्यात जाणार होता, हे पहिल्याच सत्रात स्पष्ट झाले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी युनियनच्या हरयाणा शाखेचे अध्यक्ष मांगीराम मलिक हे होते. युनियनचे अखिल भारतीय सरचिटणीस राजेवाल यांनी सर्वांचे स्वागत केले, तर पंजाब शाखेचे अध्यक्ष भूपिंदरसिंग मान यांनी युनियनची जन्मकथा सांगणारे प्रास्ताविक केले.

 पहिल्या सत्रात हरयाणाचे अॅडव्होकेट करमसिंग, पंजाबचे अजमेरसिंग लोखोवाल, उत्तरप्रदेशातील मीरतचे सुखबीरसिंग आर्य, झाशीचे गांधीवादी प्राध्यापक डॉक्टर रामनाथन

अटकेपार२५७