पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कितपत उलगडत होता, हा भाग वेगळा; पण बरीचशी भगवद्गीता त्यांना तोंडपाठ होती हे नक्की. गीताधर्म मंडळ, पुणे, या संस्थेने घेतलेली गीतासार परीक्षा ते डिसेंबर १९४८मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले होते. सुदैवाने संस्कृतसाठी त्यांना सतत चांगले शिक्षकदेखील लाभले. नाशिकच्या शाळेतील गुरुजी विषय सोपा करून शिकवत. पाठांतराऐवजी प्रत्यक्ष बोलण्यावर त्यांचा भर होता. वर्गात ते सर्वांना संस्कृतातच बोलायला लावत. ही आवड मुंबईला आल्यावर अधिकच वाढली. स्वतः मुख्याध्यापक पेंढारकर संस्कृतच शिकवायचे.
 आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे नारायण अभ्यंकर नावाचे शिक्षक, अभ्यंकर हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. संस्कृत, गणित, संगीत व कुंडली ज्योतिष ह्या चारही विभिन्न क्षेत्रांत त्यांनी असामान्य प्रावीण्य मिळवले होते. लोकमान्य टिळकांच्या प्रभावामुळे इतर उत्तम नोकऱ्या मिळत असूनही त्यांनी शिक्षकाचा पेशा पत्करला होता. गिरगावच्या विल्सन स्कूलमध्ये ते संस्कृत व गणित शिकवत. राहायचे शिवाजी पार्कला. दिसायला ते काहीसे जे. कृष्णमूर्तीसारखे दिसत. मूळचे ते कोल्हापूरचे व म्हणून अनंतरावांच्या लहानपणापासून ओळखीचे. ते भविष्य सांगत व ते बहुतेकदा खरे ठरते, असा त्यांचा लौकिक होता. अनंतराव अनेकदा त्यांच्याकडे पत्रिका दाखवायला, मुहूर्त काढायला वगैरे जात असत. वडलांच्या सांगण्यानुसार जोशी अभ्यंकरांकडे संस्कृतच्या शिकवणीसाठी जाऊ लागले. मोठे बंधू बाळासाहेबदेखील त्यांच्याकडे यायचे; पण ते गणिताच्या शिकवणीसाठी. त्यांच्या घरी जेव्हा जोशी प्रथम गेले. तेव्हा त्यांची जणू परीक्षा घेण्यासाठी अभ्यंकरांनी त्यांना एका इंग्लिश परिच्छेदाचे संस्कृतात भाषांतर करायला सांगितले व ते जरावेळासाठी म्हणून घराबाहेर गेले.ते परत आले तेव्हा जोशींचे भाषांतर पूर्ण झाले होते. विशेष म्हणजे गद्यापेक्षा पद्यातले संस्कृत अधिक गोड वाटते, म्हणून जोशींनी त्या उताऱ्याचा चक्क पद्यात अनुवाद केला होता. अभ्यंकर खूष झाले व जोशींना त्यांनी आपला शिष्य म्हणून स्वीकारले.
 आपल्या शिष्यांच्या जीवनात अभ्यंकर अगदी समरस होऊन जात. एकदा त्यांनी बाळासाहेबांना भूमितीच्या एका पुस्तकातील एक अवघड प्रमेय घातले होते व आश्चर्य म्हणजे ते दोघांनाही तासभर खटपट करूनही सोडवता येईना. दिवसभर अभ्यंकर अगदी बैचेन होते. संध्याकाळी अचानक त्यांना उत्तर सापडले. त्यांना इतका आनंद झाला, की लगेच त्यांनी आपल्या घरून लांब अंधेरीला जोशींच्या घरी धाव घेतली व बाळासाहेबांना ते प्रमेय कसे सोडवायचे ते सांगितले! जोशींना अभ्यंकरांविषयी फार आदर वाटायचा. अभ्यंकरांच्या शिकवणीचा शालेय अभ्यासातही फायदा होतच होता. त्यामुळे जेव्हा 'अकरावीनंतर पुढे काय करायचं?' ह्याची चर्चा मुलांमध्ये सुरू झाली तेव्हा जोशी संस्कृतच घेणार व पुढे संस्कृतचे प्राध्यापक होणार हे साऱ्यांनी गृहीतच धरले होते.
 मित्रांमधल्या त्या चर्चेच्या संदर्भात पुढे जोशींनी लिहिले आहे,

आकंठ जेवून तृप्त झालेल्याला रस्त्याकाठी बसलेल्या माणसाच्या पोटातील भुकेची जाणीव नसावी तसा, काहीशा आढ्यतेने मी मित्रांना म्हणालो, 'यात एवढा विचार

’’’शिक्षणयात्रा’’’ ◼ ‘’’२७’’’