पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मान यांच्याशी मैत्री व्हायच्या पूर्वीच जोशी मनानेतरी पंजाबशी जोडले गेले होते. नाशिक येथील १९८० सालच्या ऊस आंदोलनाच्या वेळीच. 'एक दिवस तुम्ही पंजाबातदेखील या, कारण असाच अन्याय आमच्यावरही होतोय' असे अनेक शीख ड्रायव्हर्स त्यावेळी म्हणाले होते. तो भाग पूर्वी आलेलाच आहे. साधारण दोन वर्षांनी तोही योग आला.
 २३ एप्रिल १९८२ रोजी धुळे येथे शेतकरी संघटनेने दूध उत्पादक मेळावा घेतला. त्याला इतरही राज्यांतले काही शेतकरी नेते आवर्जून उपस्थित होते. त्यांच्यापैकीच एक होते बलबीरसिंग राजेवाल. मेळाव्यात त्यांनी जोशींना सांगितले,
 "पंजाबमधील खन्ना ह्या गावी आम्ही २८, २९ व ३० मे १९८२ रोजी एक बैठक आयोजित केली आहे. अखिल भारतीय किसान युनियनची लिखित घटना निश्चित करण्यासाठी. त्या बैठकीला तुम्ही व तुमच्या काही निकटच्या सहकाऱ्यांनी अवश्य यायला हवं. बैठकीनंतर पंजाबात इतर चार ठिकाणी शेतकरी मेळावेही आयोजित केले आहेत. ३१ मेला मानसा (जिल्हा भटिंडा), १ जूनला नवा शहर (जिल्हा जालंदर), २ जूनला फिरोजपूर व ३ जूनला गोविंदबालसाहिबा (जिल्हा लुधियाना) इथे. ह्या सर्व मेळाव्यांनाही तुम्ही आमचे पाहुणे म्हणून हजर राहावं."
 जोशींना ती कल्पना खूप आवडली. एकतर निपाणीनंतर इतरही राज्यांत प्रवेश करण्याची ही एक सुवर्णसंधी होती. सर्व आयोजन पंजाबचे शेतकरीनेते करणार होते व तो काहीच त्रास नव्हता. शिवाय सर्व मेळावे ग्रामीण भागात भरणार असल्याने आपोआपच पंजाबातील शेतकऱ्यांशी अगदी थेट असा परिचय होणार होता. लगेचच त्यांनी आमंत्रणाचा स्वीकार केला. त्यानुसार २६ मे रोजी झेलम एक्स्प्रेसने जोशींनी पुण्याहून प्रस्थान केले. भास्करराव बोरावके हे सहकारी पुढे मनमाडला त्यांच्याच डब्यात चढले. विजय जावंधिया आणि श्रीकांत तराळ हे दोन सहकारी आदल्याच दिवशी नागपूरहून दिल्लीला जाऊन पोचले होते.

 अलिबागचे प्रा. अरविंद वामन कुळकर्णी हे मात्र पुण्यापासूनच जोशींबरोबर होते. नाशिक आंदोलनावर त्यांनी 'सोबत'मध्ये लिहिलेला लेख जोशींना आवडला होता व त्यानंतर त्यांनी आपणहूनच कुळकर्णीशी तारेने संपर्क साधला होता. पुढे निपाणीला दोघांची पहिली भेट झाली होती व त्यानंतर निपाणी आंदोलनावर त्यांनी 'सोबत'मध्ये लिहिलेले चार लेखही जोशींनी वाचले होते. शेतकरी संघटनेने प्रकाशन विभाग सुरू करावा असे कुळकर्णीचे मत होते व त्याबद्दल जोशींशी चर्चा करण्यासाठी ते व त्यांचे प्राध्यापक सहकारी सुरेशचंद्र म्हात्रे पुण्याला २१ मे रोजी आले होते. जोशींना त्यांची योजना पटली व आंदोलनाच्या धामधुमीत जमेल तसे काम यथावकाश सुरूही झाले. 'आता आलाच आहात तर माझ्याबरोबर पंजाबातही चला,' असा जोशींचा खूप आग्रह होता. कुळकर्णी तयार नव्हते, कारण तसा हा दहा दिवसांचा लांबचा प्रवास होता आणि त्यांनी ना घरी काही त्याबद्दल कळवले होते ना त्यांच्याकडे पुरेसे सामान होते. 'सामानाची वगैरे काही काळजी करू नका, अगदी नेसत्या कपड्यांनिशी चला,' जोशी सांगत होते. शेवटी जोशींच्या या अगदी अनपेक्षित आग्रहापुढे त्यांनी मान तुकवली.

२५६अंगारवाटा... शोध शरद जोशींचा