पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२५१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गुजरातमधूनही जास्त दूध मागवले गेले. शेवटी आपला पराभव मान्य करून संघटनेने चौथ्या दिवशी दूध आंदोलन मागे घेतले. दूध-भात आंदोलनही असेच मागे घ्यावे लागले होते. स्वतःच्या प्रतिष्ठेपोटी शेतकऱ्यांना अडचणीत टाकण्याचा प्रकार जोशींनी कधीही केला नाही.

 शेतकरी संघटना उभी राहिली हा खरे तर एक चमत्कारच होता. कामगारांची संघटना उभारणे तुलनेने सोपे असते. कंपनीच्या मेन गेटवर उभे राहिले की सगळ्यांशीच संपर्क साधता येतो. सगळ्यांच्या यायच्या आणि जायच्या वेळा ठरलेल्या. कामाची जागा एकत्र, परस्परसंपर्क कायमच, कामाचे स्वरूपच असे की एकत्र येणे, संघटित होणे सोपे. सर्वांचा शत्रू समान - तो म्हणजे मालक आणि त्याचे व्यवस्थापन. शिक्षणाचे व समृद्धीचे प्रमाणही अधिक. कामगार संघटनांना इतिहासही मोठा, परंपराही रुळलेल्या.
 यांतला कुठलाच घटक शेतकऱ्यांना लागू पडणारा नव्हता. सगळेच अल्पशिक्षित, गरीब, विखुरलेले, एकमेकांपासून स्वभावतःच दुरावलेले. कुठल्याही गावात जा – हद्दीवरून दोन शेजाऱ्यांमध्ये भांडण नाही असे गाव सापडणे अवघड. जमिनीवरून अगदी सख्खे भाऊही एकमेकांच्या जिवावर उठलेले. सगळ्यांच्याच कोर्टात तारखा पडलेल्या. गावात अनेक गट, तट. जाती-धर्म यांचे भेद पूर्वापार चालत आलेले. कामाचे स्वरूपही एकत्र यायला पूरक नाही. प्रत्येक जण स्वतंत्र काम करणारा, स्वतंत्र शेती करणारा. अशा शेतकऱ्यांची कधी इतकी व्यापक अशी संघटना उभारता येईल हे कोणालाच शक्य कोटीतले वाटले नव्हते. एकवेळ कुत्र्याचे शेपूट सरळ होईल किंवा तळहातावर केस उगवतील, पण शेतकरी एकत्र येणार नाहीत असे अनेक राजकीय नेते व विचारवंत म्हणत. 'शेतकरी म्हणजे बटाट्याचे पोते – कितीही एकत्र आणले तरी जरा भोक पडताच सगळे बटाटे इकडेतिकडे विखरून जाणार,' हे कार्ल मार्क्सचे उद्गार अनुभवसिद्धच होते. अशाही परिस्थितीत एका विचारावर जोशींनी लाखो शेतकरी एकत्र आणले हे यश अभूतपूर्व आहे.
 आपल्या प्रयोगाच्या अनन्यसाधारणत्वाची जोशींनाही जाणीव होती आणि म्हणूनच कदाचित त्यांनी शेतकरी संघटनेला बांधीव असे घटनाबद्ध रूप द्यायचा कधी प्रयत्न केला नाही. संघटनेची पहिली कार्यकारिणीदेखील नाशिक येथे २७ मे १९८४ रोजी तयार झाली - म्हणजे संघटना स्थापन झाल्यावर पाच वर्षांनी. "खिशात हात घालील तो खजिनदार, लाठी खाईल तो कार्यकर्ता' हीच संघटनेची भूमिका होती. संघटनेची अधिवेशनेदेखील दर वर्षी भरत नसत; आंदोलनाच्या गरजेनुसार ती भरत. कुठल्याही प्रकारच्या घटनात्मक औपचारिकतेत जोशींना अडकून पडायचे नव्हते.

 संघटनेचे एकूण स्वरूप हे असे कायमच लवचीक होते. आपला हा विचार कालातीत नाही, उद्या शेतकरी स्वतःच्या पायावर उभे राहिले तर शेतकरी संघटनेची गरजही उरणार नाही असेही जोशी म्हणत. संघटनेची काहीही मालमत्ता कधीही नव्हती – इमारती नव्हत्या, मोटारी नव्हत्या, पगारी कर्मचारी नव्हते. आंबेठाणचा अंगारमळा आणि पुण्यातील जोशींचे राहते घर इथूनच संघटनेचा सगळा कारभार चालायचा. कुठल्याही कार्यक्रमाचा खर्च कमीत कमी कसा

शेतकरी संघटना : तत्त्वज्ञान आणि उभारणी२४३