पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जाईल, आणि पर्यायाने हातातोंडाशी आलेला स्वातंत्र्योत्तर सत्तेचा आपला घासही हिरावला जाईल ही काँग्रेसनेत्यांची भीती हे एक कारण होते, हे मात्र कधी वाचनात आले नव्हते. एखाद्या घटनेचे इतरांपेक्षा अगदी वेगळे असे विश्लेषण जोशी कसे करू शकायचे याचे हे एक चांगले उदाहरण आहे.

 अनंतरावांचे नाशिकनंतरचे पोस्टिंग मुंबई इथे होते. राहायला त्यांनी भाड्याने घर घेतले होते. (६०, लक्ष्मी निवास, अंधेरी पूर्व) त्यावेळी वाजवी भाड्याने मुंबईत सर्वत्र जागा उपलब्ध होत्या. त्यावेळचा पार्ले-अंधेरी परिसर आतासारखा गजबजलेला नव्हता. खूप मोकळी जागा असायची, झाडे मुबलक होती, लोकवस्ती अगदी तुरळक व बरीचशी माणसे एकमेकांना ओळखतही असत. पुढे अनंतरावांची बदली प्रमोशनवर बडोद्याला झाली, पण कुटुंब मात्र त्यांनी याच घरात ठेवले.
 इथे जोशींच्या अन्य भावंडांविषयी लिहायला हवे. एकूण ती सहा भावंडे. सगळ्यात मोठ्या निर्मला ऊर्फ नमाताई. यांचा जन्म १९३०चा. म्हणजे शरदहन पाच वर्षांनी मोठ्या. त्यांचे यजमान चंद्रकांत देशपांडे जबलपूरला सरकारच्या दारूगोळा कारखान्यात होते व आयुष्याची पन्नास वर्षे त्या तिथेच राहिल्या. नंतर सिंधूताई वसंतराव जोशी. मुंबईत गोवंडीला राहायच्या. त्या रसायनशास्त्र विषय घेऊन एम्.एस्सी. झाल्या होत्या व टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये नोकरी करत. त्यांचे यजमान वसंतराव टेक्स्टाइल इंजिनिअर होते. आता दोघेही हयात नाहीत. त्यांचे जवळचे वर्गमित्र गोपाळराव परांजपे यांनी दिलेल्या माहितीनुसार वसंतराव मुंबईच्या व्हीजेटीआयमधून पदवी मिळवणाऱ्या पहिल्याच बॅचचे विद्यार्थी; तत्पूर्वी तिथून फक्त डिप्लोमा मिळायची सोय होती. पुढे ते एका कापडगिरणीत मॅनेजिंग डायरेक्टरही बनले. त्यांच्या व सिंधूताईंच्या लग्नात परांजपेंचा बराच पुढाकार होता. तिसरा क्रमांक मनोहर ऊर्फ बाळासाहेब जोशी यांचा. त्यांनी आधी बी.एस्सी. केले व नंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा घेतला. पुढे त्यांनी दिल्लीजवळ फरीदाबाद येथे इलेक्ट्रिक स्विचेस बनवायचा कारखाना सुरू केला. २०१३ मध्ये ते वारले. चौथे भावंड म्हणजे शरद. पाचवे प्रभाकर ऊर्फ येशू. ते मेकॅनिकल इंजिनिअर होते व पुढे जर्मनीत जाऊन त्यांनी उच्चशिक्षणही घेतले होते. हुबळी, अहमदाबाद, मुंबई, पुणे वगैरे ठिकाणी नोकरी करून शेवटी त्यांनी कर्नाटकात स्वतःचा कारखानाही काढला होता. पुढे वृद्धापकाळी सेवानिवृत्ती घेऊन शेवटची दोन वर्षे ते सपत्नीक नाशिकला राहत होते. १ नोव्हेंबर २०१६ मध्ये ते निवर्तले. सहावे व सर्वांत धाकटे भावंड म्हणजे मधुकर जोशी. त्यांनीही टेक्स्टाइल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा घेतला होता. ते नोकरीसाठी अमेरिकेत गेले व नंतर तिथेच स्थायिक झाले; आता हयात नाहीत. आता फक्त निर्मला ऊर्फ नमाताई हयात आहेत.

 वडलांची नोकरी बदलीची असल्याने या सर्वच सहा भावंडांना मुख्यतः माईंनी वाढवले. आईचे संगीतप्रेम पुढे सर्व सहा मुलांमधेही आले. त्यांच्यातला तो एक समान धागा. शाळेत असतानाच नमा व सिंधू गाणे शिकल्या, तर बाळ तबला शिकला. सर्वांत मोठ्या नमाताई

’’’शिक्षणयात्रा’’’ ◼ ‘’’२५’’’