पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 'बेचाळीसचे गौडबंगाल' या त्यांनी बऱ्याच वर्षांनी लिहिलेल्या लेखाला (शेतकरी संघटक, २१ नोव्हेंबर १९९३) नाशिकमधील त्यावेळच्या अनुभवाची पार्श्वभूमी आहे. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस पक्षाने बेचाळीसच्या आंदोलनाचे सर्व श्रेय आवर्जून स्वतःकडे घेतले आहे; पण प्रत्यक्षात जोशीच्या मते त्या आंदोलनात गांधी-नेहरूंचा विरोध असलेला हिंसाचारही खूप झाला होता. टपाल कचेऱ्या जाळणे, विजेच्या व संदेश वाहतुकीच्या तारा तोडणे, रेल्वेचे रूळ उखडणे, सरकारच्या साऱ्या नाड्याच आखडल्या जातील व सेनेच्या हालचालींमध्ये अडचणी येतील असे संप जागोजाग घडवून आणणे; हे सारे झाले होते. 'बेचाळीसच्या चळवळीतील काँग्रेसची जबाबदारी' या विषयावर लंडन येथे एक श्वेतपत्रिका प्रकाशित करण्यात आली होती व या हिंसाचारातील काँग्रेसच्या सहभागाचे अनेक पुरावे त्यात देण्यात आले होते.
 तशी इंग्रज सरकारला बेचाळीसच्या आंदोलनाची फारशी फिकीर नव्हती; त्यांनी ते पोलिसांचे बळ वापरून महिन्याभरातच दाबूनही टाकले होते. त्याचप्रमाणे महायुद्ध चालू असताना व स्वतःचे सगळे सैन्य तिथे गुंतलेले असतानाच भारतात झालेल्या या आंदोलनामुळे ते दबले व म्हणून त्यांनी भारताला स्वातंत्र्य दिले, या म्हणण्यातही जोशींच्या मते काही तथ्य नव्हते; कारण अमेरिका युद्धात उतरल्यावर दुसरे महायुद्ध आपण जिंकणार ह्याविषयी इंग्रजांना कधीच शंका नव्हती; पण जर्मनीवर आपण निर्णायक प्रतिहल्ला करण्यापूर्वी रशियावर स्वारी करून गेलेल्या जर्मन फौजांनी साम्यवादी रशियाचे जास्तीत जास्त नुकसान केले, तर ते त्यांना हवेच होते. म्हणूनच केवळ ते जर्मनीवर घणाघाती हल्ला करणे शक्य तितके लांबणीवर टाकत होते. पण रशियाने हिटलरला अनपेक्षितपणे जबरदस्त प्रतिकार केला व शेवटी जर्मनीला रशियातून काढता पाय घ्यावा लागला; उलट्या रशियन फौजा जर्मनीच्या रोखाने पुढे सरकू लागल्या. आता हिटलरच्या पाडावाचे सारे श्रेय रशियालाच मिळेल अशी धास्ती वाटून, शेवटी इंग्रजांनी ६ जून १९४४ रोजी फ्रान्समधल्या नॉर्मंडी इथे सर्वशक्तीनिशी दोस्तांची मोठी फौज अंतिम हल्ल्यासाठी उतरवली. लेखाच्या शेवटी जोशी या साऱ्या निवेदनाला एक अगदी आगळे असे वळण देतात. ते लिहितात,

१९४४-४५च्या सुमारास भारतातील तरुणांवर जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन यांचा मोठा प्रभाव होता. युद्ध संपले, स्वातंत्र्यदानाची प्रक्रिया सुरू झाली. स्वातंत्र्य जर लवकर आले नाही, तर अहिंसावादी स्वराज्य आंदोलन संपून बेचाळीसच्या जहालांच्या हाती आंदोलनाचे नेतृत्व जाईल, अशी धास्ती नेहरूपटेल यांनासुद्धा पडली होती. घाईत त्यांनी फाळणीदेखील कबूल करून टाकली. त्याचे एक कारण बेचाळीसच्या क्रांतिकारकांबद्दलची काँग्रेसनेतृत्वाची धास्ती, हे उघड आहे.

 काँग्रेसनेत्यांनी फाळणीला शेवटी पाठिंबा का दिला, याची अनेक संभाव्य कारणे पूर्वी वाचनात आली होती; पण चळवळीचे नेतृत्व आपल्या हातून निसटेल व ते जहालांच्या हाती

२४ ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा