पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मोठमोठे दवाखाने बांधले जातात आणि तिथे सरकारतर्फे प्रचंड खर्च करून अशी यंत्रसामग्री आणली जाते, जिचा उपयोग फारतर लाखात एखाद्याला होणारा आजार बरा करण्यासाठी होऊ शकेल. गावातील लोकांकरिता मात्र काहीच रक्कम उपलब्ध होत नाही.
 या सगळ्या परिस्थितीतच जोशींच्या 'इंडिया विरुद्ध भारत' या मांडणीचा उगम आहे. या चरित्रात तो भाग पूर्वी आलेलाच आहे.
 ह्या समाजात 'इंडिया विरुद्ध भारत' ही एकमेव विभाजन रेषा नव्हती ह्याचे भान जोशी यांना अर्थातच होते. एका इंडियात अनेक परस्परविरोधी घटक असतात व एका 'भारतातही अनेक परस्परविरोधी घटक असतात – जात, धर्म, भाषा, प्रांत, वेगवेगळे राजकीय पक्ष, सुशिक्षित-अशिक्षित, कामगार-मालक, वेगवेगळे आर्थिक स्तर ह्या सर्व भेदांनुसार समाजाचे विभाजन करता येईल ह्याची त्यांना कल्पना होती. ही रेषा भौगोलिक नव्हती; विषमता शहरात आहे व गावातही आहे हेही त्यांना ठाऊक होते. 'इंडिया'मधेही 'भारत' आहे, आणि 'भारता'मधेही 'इंडिया' आहे, असे ते म्हणतच. पण कुठेतरी सुरुवात करायची म्हणून त्यांनी इंडिया विरुद्ध भारत' ही विभाजन-रेषा पकडली. 'शोषित समाजाला ते 'भारत' म्हणतात तर 'शोषक समाजाला ते 'इंडिया' म्हणतात, एवढे लक्षात घेतले, तर या संकल्पनेबद्दल काहीच वाद उरत नाही.
 'इंडिया विरुद्ध भारत' ही संकल्पना मांडताना आपला लढा शहरातील गोरगरिबांविरुद्ध नाही ही गोष्टही जोशी आपल्या अनुयायांपुढे वरचेवर स्पष्ट करतात. ते म्हणतात,
  "ह्या पिढीत किंवा मागच्या पिढीत ही सर्व शहरातली गरीब माणसं कोरडवाहू शेतकरीच होती. त्या कोरडवाहू शेतीत पोट भरता येईना म्हणून त्यांनी एक दिवस जी काय किंमत येईल त्या किमतीला जमीन फुंकून टाकलेली असते, बैल विकून टाकलेले असतात आणि जी काय गाडगी-मडकी उरतील ती घेऊन शहरात ती पोटाकरिता येऊन राहिलेली असतात."
 त्यामुळेच शहरातील दारिद्र्यावरचा खरा उपाय गावातील दारिद्र्य दूर करणे, म्हणजेच कोरडवाहू शेतीत चांगला पैसा मिळेल अशी व्यवस्था करणे हा आहे, असे त्यांचे प्रतिपादन आहे.
 शासन व एकूणच अभिजनवर्ग कशा प्रकारे शेतकऱ्यांचे शोषण करत आहे हे सारांशरूपात मांडताना जोशींनी ह्या शिबिरांत 'शोषणाचे पंचशील' असा शब्दप्रयोग केला आहे. त्या पंचशीलातील पाच तत्त्वे पुढीलप्रमाणे :

१. शेतकऱ्याचा खरा उत्पादनखर्च भरून निघेल असा भाव त्याच्या शेतीमालाला द्यायचा नाही.

२. भाव न मिळाल्याने अधिकाधिक दरिद्री होत जाणाऱ्या शेतकऱ्याने चिडून उठू नये म्हणून त्याला काहीतरी खोट्या आशेची गाजरे दाखवायची किंवा त्याचे 'मन रमवण्यासाठी किंवा दुसरीकडे वळवण्यासाठी वापरायचा खुळखुळा' असे ज्याचे वर्णन करता येईल

शेतकरी संघटना : तत्त्वज्ञान आणि उभारणी ◼ २३१