पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 स्वतःच्या लूटमारीचे समर्थन करणारे तत्त्वज्ञान तयार होऊ लागले. सत्ताधाऱ्यांची सोय होईल अशी तात्त्विक मांडणी करणारे काही बुद्धिमान त्याकाळीही होतेच. त्यातूनच मग लूट केल्याने पाप लागत नाही, उलट देव खूष होतो, अशी मांडणी करणारी दर्शनेही तयार होत गेली. इतिहासात आपण वेगवेगळ्या मोहिमांविषयी वाचतो, सीमोल्लंघन करणे वगैरे शब्दप्रयोग करतो; पण प्रत्यक्षात त्या साऱ्याचा अर्थ लुटीसाठी बाहेर पडणे हाच असायचा.
 पुढे मग सगळाच्या सगळा शेतीमाल लुटून नेण्याऐवजी खंडणी म्हणून काही रक्कम वसूल करायला सुरुवात झाली; आज जसे काही गुंड आपापल्या विभागातून हप्ते गोळा करतात त्याप्रमाणे!
 पुढे लोकसंख्या वाढत गेली; इतक्या मोठ्या समुदायाकडून खंडणी गोळा करणे अवघड होत गेले. म्हणून मग शेतकऱ्यांनी स्वतःहून सत्ताधाऱ्यांकडे शेतसारा भरणे हा प्रकार सुरू झाला. सगळी वसुली स्वतः करणे अशक्य होते, म्हणून मग सम्राटांनी आपल्या मांडलिक राजांना आणि त्यांनी छोट्या-मोठ्या सरदारांना आपापल्या छोट्या-मोठ्या इलाख्यात सारावसुलीची मक्तेदारी दिली. 'लुटीचा आमचा ठरावीक हिस्सा आम्हांला पोचता करा; बाकी तुमच्याकडे ठेवा. त्या बदल्यात इतर कोणी तुमच्यावर आक्रमण केले, तर आम्ही तुमचे रक्षण करू,' हा प्रकार सुरू झाला! हाही एक प्रकारचा 'प्रोटेक्शन मनी' होता! त्या शेतसाऱ्यालाच मग सार्वत्रिक करआकारणीचे स्वरूप आले. अधिकाधिक खिशांतून अधिकाधिक पैसा सत्ताधाऱ्यांकडे जमा होऊ लागला.
 लुटीचे मार्गही हळूहळू बदलत गेले. पूर्वीप्रमाणे रक्तपात करून लूट करायची आता गरज राहिली नाही: रक्तपातात स्वतःचेही नुकसान होतच असे; त्याऐवजी व्यापारातून लूट करायचे तंत्र निर्माण झाले – मान पिरगळून कोंबडी मारून टाकण्यापेक्षा रोजचे अंडे मिळवायचे. या तंत्रात कमीत कमी श्रमांत जास्तीत जास्त लूट करण्याची सोय होती. सत्ताधारी वर्गाला सर्वांत जास्त लूट करायची संधी होती. सत्तेवर आल्यामुळे त्यांच्या लुटीला सातत्य मिळाले. त्यातूनच राज्यसंस्था अधिकाधिक बळकट होत गेली.
 अशाप्रकारे जोशींच्या मते आजपर्यंतच्या इतिहासाची खरी प्रेरणा ही शेतीमध्ये होणारा गुणाकार लुटण्याची आहे. वेगवेगळ्या कालखंडांत लुटण्याची वेगवेगळी साधने वापरली केली - दरोडेखोरी, सैन्याने केलेली लूट, राजेरजवाडे वसूल करत असलेला महसूल, गुलामगिरी, वेठबिगारी, वसाहतवाद, उद्योगक्षेत्र करत असलेले कच्च्या मालाचे शोषण इत्यादी; पण मुळात ती लूटच होती. सर्व समाजाचा इतिहास हा शेतीला लुटण्याच्या अशा साधनांचा इतिहास आहे.
 भारतीय इतिहासाचीही एक अभिनव अशी, आपल्या उपरोक्त आकलनाला पुष्टी देणारी अशी, मांडणी जोशींनी केली. जनमानसात स्थिरावलेल्या अनेक कल्पनांना हादरवून सोडेल, अशीच ही मांडणी आहे. जोशी लिहितात :


२२४ ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा