पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



झाडांवरची फळे गोळा करण्यासाठी रानोमाळ भटकण्याची त्याची गरज संपुष्टात आली. काही जण इतरही उद्योग करू शकतात हे हळूहळू जाणवू लागले. वेगवेगळी साधने निर्माण करण्यासाठी, त्यांचा वापर करून आपले राहणीमान सुधारण्यासाठी त्याला वेळ मिळू लागला. त्यातून अन्नाव्यतिरिक्त असलेल्या घर, वस्त्रे वगैरे गरजा भागतील असे संशोधन सुरू झाले, त्यातही यश येऊ लागले. अग्नीचा, चाकाचा शोध लागला, हत्यारे तयार होऊ लागली, लाकूडकाम व धातूकाम अवगत झाले.
 एका जागी घर बांधून राहणे, जमिनीच्या विशिष्ट तुकड्याविषयी मनात आपलेपणा निर्माण होणे ह्या स्वाभाविक अशा पुढच्या पायऱ्या होत्या. निखळ आनंद मिळवण्यासाठीही अनेक गोष्टी करता येतात याची जाणीव झाली. निसर्गाचे निरीक्षण करणे, जीवनविषयक चिंतन करणे यांसाठीही निवांतपणा मिळू लागला. त्यातूनच पुढे कुटुंबव्यवस्था उदयाला आली. त्यातूनच पुढे साहित्य, संगीत, नृत्य, स्थापत्य, चित्रकला, निसर्गभान, कालगणना, विज्ञान, तंत्रज्ञान यांचा विकास होत गेला. आपल्या मेंदूचा अधिकाधिक उपयोग करून आपले जीवन अधिकाधिक विकसित करण्याचा तो प्रयास करू लागला.
 आपले एकमेकांशी असलेले नाते, परस्परप्रेमाची भावना, सहकार्याचे लाभ वगैरेंचे त्याचे भान अधिकाधिक सजग होत गेले. त्याचा मानसिक विकासही होत गेला. हा विकास फक्त ऐहिक वा भावनिक बाबतीत घडला असे नव्हते. हे जग कसे बनले असेल, त्यामागे ईश्वरासारखी कोणी शक्ती असेल का, ह्या ईश्वराचे स्वरूप काय असेल, मृत्यू म्हणजे काय, माणूस मेल्यानंतर काय होते वगैरे असंख्य आध्यात्मिक विषयांचे चिंतनही करणे त्याला शेतीतून मिळालेल्या तुलनात्मक स्वास्थ्यानंतरच शक्य झाले. थोडक्यात म्हणजे, तो सुसंस्कृत बनायला सुरुवात झाली. विकासाचे एक स्वयंप्रेरित चक्र फिरू लागले. हा निसर्गक्रम असाच सुरू राहिला असता, तर सगळीकडे आबादीआबाद झाली असती.
 दुर्दैवाने मनुष्यस्वभाव विचित्र आहे. स्वतः कष्ट करून शेती करण्यापेक्षा, दुसऱ्या कोणी कष्ट करून पिकवलेले धान्य दांडगाई करून पळवून नेणे अधिक सोपे आहे असा विचार काही जण करू लागले. शेतीतली लूट सुरू झाली. सुरुवातीला ही लूट करणारे म्हणजे भुरटे चोर होते. हळूहळू तेही आपल्या चोरीच्या कामात पारंगत होत गेले; भुरट्या चोरीपासून सशस्त्र दरोड्यापर्यंत त्यांनी प्रगती केली. धान्य पिकवणारे बैल वापरत होते, तर धान्य लुटणाऱ्यानी अधिक सक्षम असा घोडा वापरायला सुरुवात केली. मग तर काय, लुटारूंची चंगळच झाली. लांब लांब जाऊन लूट करणे शक्य झाले.

 ही लूट करणाऱ्यांनी कधी धनुष्यबाण वापरले तर कधी तलवार, कधी बंदुका तर कधी तोफा. कधी ते घोड्यावरून आले तर कधी रणगाड्यातून. कधी जिरेटोप घालून आले, कधी मुकुट वा हॅट घालून तर कधी गांधी टोपी घालून. पण आले ते शेतकऱ्याला लुटण्याकरिताच.
 काळाच्या ओघात या लुटणाऱ्यांच्या टोळ्या बनत गेल्या, त्या अधिकाधिक मोठ्या व ताकदवान होत गेल्या. त्यांतूनच काही टोळ्यांचे नायक सरदार बनले, काही त्याहून मोठे होत राजे बनले, काही त्याहूनही मोठे होत सम्राट बनले.

शेतकरी संघटना : तत्त्वज्ञान आणि उभारणी ◼ २२३