पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बंगल्यात ते राहू लागले. तिसरी व चौथी यत्ता शरदने इथल्या प्राथमिक विद्यामंदिर ह्या शाळेत काढल्या व नंतर पाचवी ते नववी त्याच शाळेशी संबधित असलेल्या रुंगठा हायस्कूलमध्ये. तेच सध्याचे न्यू हायस्कूल. इथे असताना शरदला वाचनाचे जे वेड लागले ते पुढे आयुष्यभरासाठी. त्या दिवसांविषयी बोलताना जोशी म्हणत होते,
 "मला वाचनाकडे वळवण्यात मोठा सहभाग होता तो तेथील एक शिक्षक अकोलकर ह्यांचा. त्याच सुमारास मी शेजारपाजारच्या इतर मुलांबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतही जाऊ लागलो. संघात जाण्यामागे फारसं काही वैचारिक कारण होतं असं नाही, पण संध्याकाळचे शाखेतले मैदानी खेळ मला आवडायचे. त्यावेळी टीव्ही वगैरे नव्हते. आमच्या घरासमोरच्या रस्त्यावरून कधी कधी संघाची संचलनं होत. गणवेषातले ते सगळे शिस्तीत चालणारे तरुण बघायला मजा यायची. आम्ही मुलंही मग घरातल्या घरात जमिनीवर चिंचोके मांडून संचलनाचा असा एक खेळ खेळायचो. संघाप्रमाणेच राष्ट्रसेवादलातही आम्ही जायचो. तेही मला आवडायचं. सानेगुरुजी त्यावेळी सेवादलात येत. सुंदर, भावुक गाणी तालासुरात म्हणत व त्यांच्यामागे आम्हालाही मोठ्याने म्हणायला लावत. त्यावेळचे सानेगुरुजी खूप ओजस्वी अशी भाषणंही करत. आमचा ते अगदी आदर्श होते."

 १९४२चा ऑगस्ट महिना. गांधीजींच्या आदेशानुसार चले जाव आंदोलन सुरू झाले. प्रभातफेऱ्या वगैरे सुरू झाल्या होत्या. शरद तेव्हा सात-आठ वर्षांचाच होता, त्यामुळे प्रत्यक्ष आंदोलनात तो सहभागी व्हायचा प्रश्नच नव्हता. पण विशेष म्हणजे सेवादलातील अन्य मुलांना होती त्याप्रमाणे त्याला किंवा घरच्यांना एकूण त्या आंदोलनाबद्दल फारशी सहानुभूतीदेखील नव्हती. ह्याचे कारण सांगताना जोशी म्हणाले,

 “सरकारी नोकरीत असल्याने वडलांना चळवळीत कुठल्याही प्रकारे सहभागी होणं शक्य नव्हतं. दुसरं म्हणजे, गांधीजी जरी अहिंसेचे पाठीराखे होते, तरी प्रत्यक्षातलं आंदोलन अहिंसक नव्हतं. आंदोलक खूपदा जाळपोळदेखील करत. माझे वडील तेव्हा देवळाली पोस्ट ऑफिसात होते. पत्राची एक पेटी आंदोलकांनी जाळली होती. वडलांनी ती कशीबशी उघडली व आतली अर्धवट जळलेली पत्रं ते घरी घेऊन आले. घरीच मग आम्ही सगळ्यांनी त्यांचं सॉर्टिंग केलं व ती योग्य त्या ठिकाणी रवाना केली. त्यातली अनेक पत्रं महत्त्वाची असू शकतील. अहिंसात्मक मानल्या गेलेल्या चळवळीची ही दुसरीही बाजू होती हे त्या लहान वयातही माझ्या लक्षात आलं त्या विशिष्ट दिवशी एक अमेरिकन लष्करी अधिकारी आमच्या घरी आला होता. असे अनेक अमेरिकन तेव्हा इतर इंग्रज अधिकाऱ्यांबरोबर भारतात होते. दुसरं महायुद्ध चालू असल्याने. सॉर्टिंगच्या वेळी आम्हाला सापडलेली काही महत्त्वाची पत्रं ताब्यात घेण्यासाठी तो आला होता. तो गेला तेव्हा आईने सगळं घर पाण्याने धुऊन काढलं होतं. तसं आमच्याकडे कोणीच कसली अस्पृश्यता पाळत नव्हतं, पण ह्या गोऱ्या सोजिरामुळे मात्र आपलं घर बाटलं असं तिला वाटलं असावं; किंवा कदाचित त्याच्या बुटाला माती लागलेली असेल व बुटांबरोबर तीही घरात आली असेल."

शिक्षणयात्रा२३