पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पाटकर मास्तरांना मोठी मदत होणार आहे. अरे, तुझ्या वडलांना महिना चाळीस रुपये पगार आहे आणि तरी त्यात भागवताना आपली किती ओढाताण होते तुला ठाऊकच आहे. पाटकर मास्तरांना तर फक्त महिना आठ रुपये पगार आहे! त्यांची किती ओढाताण होत असेल?"
 त्यानंतर शरद शिकवणीला बसायला तयार झाला. कदाचित मोठ्या भावाबरोबर एकदम चौथीत बसायच्या आमिषाने! शिकवणीचा त्याला किती फायदा झाला असेल कोण जाणे, पण आईने ज्या प्रकारे त्याची समजूत काढली, त्याची मात्र त्याला आयुष्यभर आठवण राहिली. आपली परिस्थिती चांगली नसली, तरी आपण आपल्यापेक्षाही दुर्बळ अशा कोणालातरी मदत करू शकतो ही शिकवण फार महत्त्वाची होती. 'लहानपणी आम्ही गरीब असतानाही आमच्याकडे कायम कोणीतरी विद्यार्थी वारकरी म्हणून रोज जेवायला असायचा, याचा उल्लेख त्यांनी एकदा काहीशा अभिमानाने केला होता. गरजू विद्यार्थ्याला वारावर जेवायला घालून मदत करायची, तर गरजू मास्तरांना शिकवणी देऊन मदत करायची, हा इंदिराबाईंचा मनोदय त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरेच काही सांगणारा आहे.
 बेळगावची जोशींनी सांगितलेली आणखी एक आठवण म्हणजे ते तिथे जिन्यावरून खाली पडले होते ती. ते म्हणाले,
 “मला फ्लॅट फूटचा, सपाट तळपायाचा, थोडा त्रास होता. साहजिकच तोल सांभाळणं इतर सर्वसामान्य मुलांपेक्षा मला किंचित अवघड व्हायचं. अशा मुलांना लष्करात प्रवेश मिळत नसे. साताऱ्याला असताना एकदा मी व बाळ डोंबाऱ्याचा खेळ खेळत होतो व तेव्हाही मी असाच दोरीवरून पडलो होतो आणि पायही मुरगळला होता."
 पुढील आयुष्यात जोशी भरपूर चालत, अगदी गिर्यारोहणही करू लागले. बोबडेपणाप्रमाणे ह्या फ्लॅट फूटवरही त्यांनी मात केली. या सगळ्यामागे, जन्मजात शारीरिक कमतरतेवर मात करण्यामागे, त्यांची जिद्द दिसून येते.
 त्यांची आणखीही एक लहानपणची साताऱ्यातली आठवण ह्या गिर्यारोहणप्रेमाशी असलेला बालपणाचा संबंध सुचवणारी आहे. ते सांगत होते,
 "लहानपणी मला प्लुरसी झाली होती - फुफ्फुसांचा हा एक न्युमोनियासारखा विकार. त्याचा परिणाम म्हणून कदाचित असेल, पण मला बंदिस्त जागेत खूप कोंदटल्यासारखं (claustrophobic) होई. डोंगरावर फिरायला गेलं, की मात्र तिथल्या मोकळ्या हवेमुळे बरं वाटायचं. साताऱ्याला अजिंक्यतारा किल्ल्यामागे खूप डोंगर होते. आमच्या गड्याच्या किंवा कधी वडलांच्या खांद्यावर मी बसलेला असायचो. तिथून लांबवरचं दृश्य दिसायचं. ते बघणं मला खूप आवडायचं. पुढे मला डोंगर चढायची जी आवड लागली, तिचं मूळ कुठेतरी ह्या शारीरिक कमतरतेत असावं."

 १९४२च्या फेब्रुवारीत वडलांची नाशिकला बदली झाली. यावेळी बढतीही मिळाली होती. पोस्टाच्या एका खात्यांतर्गत परीक्षेत पहिला क्रमांक मिळाल्याने त्यांना इन्स्पेक्टर म्हणून नेमले गेले. पगारही थोडा वाढला. गंगापूर रोडवर कुलकर्णी नावाच्या एका गृहस्थांच्या

२२अंगारवाटा... शोध शरद जोशींचा