पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 दहा वाजेपर्यंत अटक झालेल्यांच्या दीडशे गाड्या तिथून रवाना झाल्या होत्या. डॉक्टर ध्रुव मंकड स्टेथोस्कोप व पांढरा अ‍ॅप्रन बाजूला ठेवून टेलिफोन सांभाळत होते, ठिकठिकाणचे निरोप घेत होते. आंदोलन नगरीत सतत घोषणा चालूच होत्या व त्याचवेळी एकेक बस येत होती, आंदोलकांना घेऊन दूर कुठेतरी रवाना होत होती. मॅजिस्ट्रेट सर्वांना सरसकट १४ दिवसांची कस्टडी देत होते, पण त्यामुळे आंदोलकांचे मनोधैर्य कणभरही कमी झाले नव्हते. पुरुषांना बेल्लारी व गुलबर्गा येथील तुरुंगात व स्त्रियांना विजापूर येथील तुरुंगात रवाना केले जात असल्याची बातमीही नंतर आली.
 दहा-साडेदहाच्या सुमारास रोजच्याप्रमाणे आजूबाजूच्या खेड्यांतून पिठले-भाकऱ्याआंबील भरलेल्या बैलगाड्या घेऊन आसपासचे शेतकरी आंदोलन नगरीत येऊ लागले. एकूण परिस्थिती पाहून तेही लगोलग ह्या सत्याग्रहात सामील होऊ लागले.
  आंदोलक दबत नाही आहेत हे बघून मग शेवटी पोलिसांनी पूर्वीच ठरवलेले आपले अस्त्र बाहेर काढले. अनुचित असे एकही कृत्य शेतकऱ्यांनी केले नसताना व साधी बोलाचालीही कुठे झाली नसताना पोलिसांनी एकदम आक्रमक भूमिका घेतली. सर्व शेतकरी अटक करण्यासाठी येणाऱ्या बसेसची वाट पाहत रांगेत उभे असताना काही पोलीस पुढे झाले आणि त्यांनी त्या शेतकऱ्यांना लाठ्यांनी मारायला सुरुवात केली. 'बस खाली, बस खाली, असे ते मारताना कानडीत म्हणत होते. त्यामुळे बावरलेले शेतकरी खाली बसू लागले. पण खाली बसलेल्या शेतकऱ्यांनाही पुन्हा मारायला पोलिसांनी सुरुवात केली. मारताना 'गप बस, गप बस' असे पोलीस म्हणत होते. काही शेतकऱ्यांनी उभे राहून पोलिसांना 'आम्ही तुमच्याच आदेशांचे पालन करत आहोत' असे सांगायचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्या तोंडावरच पोलिसी लाठ्यांचे तडाखे बसू लागले. हा लाठीमार इतका जोरदार होता, की अनेक शेतकरी अक्षरशः रक्तबंबाळ झाले. त्यातलेच एक होते मालतीबाई शिंदे ह्यांचे वृद्ध पती. तिथेच हजर असलेल्या एका सेवाभावी डॉक्टरांनी तातडीचे उपचार करून रक्तस्त्राव तात्पुरता थांबवला, पण कवटीला टाके घालणे अत्यावश्यक होते व त्यासाठी निपाणीतल्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यासाठी धावपळ सुरू झाली.
 हे सगळे काय चालले आहे, एकाएकी पोलीस आपल्यावर असे तुटून का पडले आहेत आणि आपला गुन्हा तरी काय आहे हेच शेतकऱ्यांना कळेना. इतका वेळ पोलिसांचा बराच मार निमुटपणे खाल्लेले काही तरुण शेतकरी आता मात्र खुपच चिडले व काहीतरी प्रतिकार करण्याची स्वाभाविक प्रेरणा म्हणून त्यांच्यातील काही जणांनी रस्त्याकडेला पडलेले काही दगड पोलिसांवर फेकून मारले.
 नेमक्या ह्याच क्षणाची जणू पोलीस वाट पाहत होते. 'जमाव हाताबाहेर चालला आहे' असे जाहीर करत त्यांनी अश्रुधुराची नळकांडी फोडायला सुरुवात केली. पण वारा जोराचा असल्याने शेतकरी तो अश्रुधूर सहन करू शकले. आजूबाजूच्या शेतात पडणाऱ्या नळकांड्यांवर खेड्यांतल्या बायकांनी ओंजळीने माती टाकायला सुरुवात केली व ती नळकांडी त्यांनी निष्प्रभ करून टाकली. हे तंत्रही त्यांचे त्यांनीच, कोणीही न शिकवता,


धुमसता तंबाखू - १८५