पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 अंघोळी उरकून, ठेवणीतले कपडे घालून इकडेतिकडे वावरत होते. आंदोलनाचा उन्माद आणि सणासुदीचा उल्हास ह्यांचे हे मिश्रण अगदी वेधक दिसत होते. तो सगळा दिवस आंदोलन नगरीत चैतन्य अगदी ओसंडून वाहत होते.
 त्या दिवशी सकाळी शरद जोशी यांनी कृश शरीराचे पण लढवय्ये म्हणून प्रख्यात असलेले दत्ता पांगम व इतर शेतकरीनेते यांच्यासमवेत पर्यायी रस्ता जिथून जायचा त्या परिसराची पाहणी केली. विजय आणि सरोजा परुळकर हेही त्यांच्यासोबत होते. त्यांना असे दिसले, की ह्या रास्ता रोकोला तेथील स्थानिक मंडळी फारशी तयार नाहीत. तेथील कार्यकर्त्यांमध्ये ह्या प्रश्नावर बरेच मतभेद होते व एक प्रकारची भीतीही होती. अशा परिस्थितीत पर्यायी रस्ता बंद करणे अशक्य होते. आपला निर्णय स्थानिक लोकांवर बळजबरीने लादायची शरद जोशींची मुळीच इच्छा नव्हती. दुपारी तीनच्या सुमारास ही मंडळी आंदोलन नगरीत परतली. त्यानंतर संध्याकाळच्या सभेत त्यांनी उद्यापासून पर्यायी रस्ता बंद करायचा बेत स्थगित केल्याचे जाहीर केले. आंदोलकांचा काहीसा अपेक्षाभंग झाला, पण आपले नेते आपल्या हिताचाच निर्णय घेतील ह्यावर सगळ्यांची श्रद्धा होती. त्यामुळे सगळे पुन्हा आपापल्या जागी बसायला गेले. महामार्गावरचा हा सत्याग्रह चालूच राहणार होता. पुन्हा एकदा घोषणा सुरू झाल्या. दुसऱ्याच दिवशी काय भयानक प्रकार घडणार आहे याची कुठल्याच आंदोलकाला त्यावेळी काही कल्पना नव्हती.
 पुढला दिवस उजाडला. सोमवार, सहा एप्रिल.
 भल्या सकाळी साधारण सहाच्या सुमारास, अगदी अनपेक्षितपणे पोलिसांच्या धडाकेबंद कारवाईला सुरुवात झाली. मोठ्या संख्येने पोलीस आंदोलन नगरीत घुसले. रस्त्यावर उभारलेल्या राहुट्या त्यांनी धडाधड पाडून टाकायला सुरुवात केली. सुरुवातीला आंदोलकांना धक्काच बसला. त्यांची स्वाभाविक भावना पोलिसांना प्रतिकार करायची होती; पण शरद जोशींनी त्यांना तत्काळ थोपवले. त्यांच्या आदेशानुसार मग आंदोलकांनी पोलिसांना विरोध केला नाही. कसलाही वावगा प्रकार होऊ देऊ नका, असे जोशींचे निक्षून सांगणे होते. "आधी बाकी साऱ्यांना अटक करा व नंतर अर्थात मलाही अटक करा, पण मी बाहेर असलो तर आंदोलकांना नक्की शांत ठेवेन," असे त्यांनी पोलिसांना सांगितले.
 पण त्यांचा कुठलाही सल्ला ऐकायच्या मनःस्थितीत पोलीस नव्हते. त्यांनी सर्वप्रथम शरद जोशी, सुभाष जोशी, रमेश शिपुरकर व शुभा शिपुरकर ह्या चौघांना अटक केली आणि त्यांना तत्काळ जीपमध्ये बसवून आंदोलनस्थळापासून दूर नेले. आधी खडकलाट येथील पाऊणशे वर्षांच्या मामी दिवाण, शिर्ष्याची वाडी येथील मालतीबाई शिंदे, निपाणीच्या अक्काताई कांबळे वगैरे महिलानेत्यांनी व त्यांच्यापाठोपाठ लगेचच सुमारे दोन-अडीचशे स्त्रियांनी स्वतःला अटक करवून घेतली. साडेसातपर्यंत सत्तरएक बसगाड्या भरून आंदोलक तेथून दूरवर कुठेतरी रवाना झाले होते. पण त्याच्या अनेक पट आंदोलक अटकेची वाट पाहत शांतपणे रस्त्यावर बसून होते.


१८४ = अंगारवाटा... शोध शरद जोशींचा