पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संगीताचीही आवड होती व पाठ केलेल्या कविता त्या नेहमी सुरेल आवाजात मोठ्याने म्हणत असत. पेटीही छान वाजवायच्या. त्यांची दृष्टी लहानपणापासून अधू होती; एका डोळ्याने काहीच दिसत नसे व पुढे पुढे तर दुसऱ्या डोळ्यानेही खूप पुसट दिसायला लागले. त्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करावी व त्यामुळे कदाचित अधिक चांगले दिसू लागेल, असे अनेकांनी सुचवूनही त्या तयार झाल्या नाहीत. “शस्त्रक्रिया करायचीच तर लहानपणीच आंधळ्या झालेल्या डोळ्यावर करा. सुधारला तर तो सुधारेल. नाहीतर मी दोन्ही डोळ्यांनी आंधळी होईन," त्या म्हणत.
 हो-नाही करता करता अनेक वर्षे गेली. पुढे वय झाल्यावर मग शेवटी डॉक्टरांचेही मत 'ह्या वयात आता ऑपरेशनचा धोका नकोच' असे झाले. त्यामुळे मग ऑपरेशन टळले, पण जवळजवळ काहीच दिसेनासेही झाले. तशाही परिस्थितीत त्यांची वाचनाची आवड कायम होती. रोजचे वर्तमानपत्र अगदी डोळ्याशी नेऊन वाचायला लागले तरीही त्या वाचत. त्यांनी दोन नाटके आणि काही कथाही लिहिल्या होत्या; वृत्तपत्रांकडे त्या पत्रेही पाठवत.
 अधूनमधून त्यांना कविता स्फुरायच्या व जे कोणी मूल जवळपास असेल त्याला ती कविता सुवाच्य अक्षरात लिहून द्यायचा त्या आग्रह करायच्या. बालसुलभ वृत्तीनुसार मुले ती लिहून घेण्यात टंगळमंगळ करत असत. तरीही त्या मुलांना पुनःपुन्हा विनंती करत, मुलांच्या मागे लागत. त्यांच्या काही कविता कुठे कुठे छापूनही आल्या होत्या. आपल्या कवितांचे पुस्तक निघावे अशी त्यांची इच्छा होती. 'माझं एखादं पुस्तक प्रसिद्ध कर, असा लकडा त्यांनी नंतर जोशींचे एक निकटचे सहकारी प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे यांच्यामागे लावला होता. आपल्या अखेरच्या दुखण्याच्या वेळी इस्पितळात असतानासुद्धा त्यांनी म्हात्रेंना त्याची आठवण करून दिली होती. पण काही ना काही कारणांनी योग येत नव्हता. त्यांच्या निधनानंतर अनेक वर्षांनी म्हात्रे यांच्या पुढाकारातून ती इच्छा पूर्ण झाली; त्यांच्या कवितांचा एक संग्रह ३ सप्टेंबर २०१५ रोजी, शरद जोशी यांच्या ऐंशीव्या वाढदिवशी, श्रीकांत उमरीकर यांच्या औरंगाबाद येथील जनशक्ती वाचक चळवळीने माईंच्या कविता या नावाने प्रसिद्ध केला. एक वेगळेपण म्हणजे त्या वृत्तबद्ध आहेत व त्यांतील अनेकांना इंदिराबाईंनी त्यावेळच्या प्रसिद्ध गीतांनुसार चालीही लावल्या होत्या.

 १९८२ ते १९९२ या कालावधीत म्हात्रेनी इंदिराबाईंशी शक्य तेवढा संपर्क ठेवला. त्या काळात चळवळीमुळे जोशी बहुतांशी प्रवासात असत, पुण्यात येणे कारणपरत्वेच होई. म्हात्रे अधिक वरचेवर येत. आई, कशाला ग पुनः दुष्ट पावसाळा आला? या शीर्षकाची इंदिराबाईंची एक कविता कित्येक वर्षांपूर्वी साधना साप्ताहिकात प्रकाशित झाली होती. जोराच्या पावसामुळे गरिबाच्या घरात पाणी कसे शिरते, सगळ्यांचे किती हाल होतात, तो प्रश्न विचारणाऱ्या मुलाचे वडीलही अशाच पावसाळ्यात कसे वारलेले असतात वगैरे अनेक आठवणींचे चित्रण करणारी. म्हात्रेनी ती त्याचवेळी वाचली होती व प्रत्यक्ष भेट झाल्यावर त्यांनी एकदा इंदिराबाईंना तिची आठवण करून दिली. इंदिराबाईंना त्याचे फार कौतुक वाटले होते. म्हात्रे पेटीही चांगली वाजवत. दोघांना जोडणारा तो आणखी एक दुवा. म्हात्रेंना त्या

शिक्षणयात्रा१९