पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चित्रणासाठी, चर्च व मिशनऱ्यांच्या थट्टेसाठी आणि एकूणच तुच्छतावादासाठी (सिनिसिझमसाठी) प्रसिद्ध. त्याच्याच प्रभावाखाली लिहिलेले हे वाक्य असावे. वडलांच्या वाचनात ती कथा आली व ते वाक्य त्यांना अजिबात आवडले नाही. त्यांच्या त्या वेळच्या प्रतिक्रियेविषयी जोशींनी बऱ्याच वर्षांनी (अंगारमळा, पृष्ठ ११४) लिहिले आहे,

माझे वडील अगदीच वेगळ्या पठडीतले. राग आला तर दुष्ट, कपटी, अभद्रेश्वर व राक्षस यापलीकडे पाचवी शिवी त्यांना माहीत नव्हती. माझी गोष्ट वाचून ते रागाने म्हणाले, 'मनुष्य जितका दुष्ट आहे, तितकं सगळं कागदावर लिहिण्याची काही आवश्यकता नाही.' मी मोठ्या पंचायतीत सापडलो. जे आहे, जे मला दिसतंय ते लिहायचं नाही, म्हणजे मग काय लिहायचं? मग मी हळूहळू साहित्यापासून दूर जायला लागलो.

 अनंतराव पोस्टात साधे कारकून म्हणूनच लागले होते. 'एकदा माणूस पोस्टात लागला की निवृत्त होईपर्यंत तिथेच चिकटतो' असे गमतीने म्हटले जाई. अनंतरावांच्या बाबतीतही ते खरेच ठरले. ह्या नोकरीत पगार तसा बेताचाच असायचा; शिवाय पदरी चार मुलगे व दोन मुली. त्यामुळे तसा ओढाताणीचाच संसार. वडलांना खास आवडीनिवडी अशा फारशा नव्हत्या. सामाजिक जीवनातही त्यांचा काही सहभाग नसे. त्या काळातील बहुसंख्य सरकारी नोकरांप्रमाणे आपण बरे की आपली नोकरी बरी अशीच एकूण त्यांची वृत्ती असावी.

 जोशींच्या आईचे नाव इंदिरा. त्यांचा जन्म १ जुलै १९११ रोजी झाला. त्या मूळच्या पंढरपूरच्या. माहेरच्या आपटे. वर देशस्थ-वधू कोकणस्थ असा, आज काहीच विशेष नसलेला पण पाऊणशे वर्षांपूर्वीच्या ग्रामीण महाराष्ट्रात पुरोगामी मानला जाणारा त्यांचा विवाह. वडलांना मुले 'काका' म्हणत, तर आईला 'माई'.
 आपल्या वडलांबद्दल जोशींनी फारसे कुठे लिहिलेले नाही, ते वारलेही तसे लौकर; पण आईबद्दल मात्र त्यांनी काही ठिकाणी उत्कटतेने लिहिले आहे. त्या पंढरपूरच्या असूनही त्यांच्या घरची मंडळी वागण्यात फारशी धार्मिक वा कर्मकांड पाळणारी नव्हती. शिवाय, इंदिराबाई कायम तेथील बडव्यांच्या विरोधात असत. ते बडवे अनीतीने वागतात, भाविकांना लुटतात, आणि विशेष म्हणजे गावात येणाऱ्या परित्यक्तांशी गैरवर्तन करतात असे बोलले जाई व त्याचा इंदिराबाईंना खूप राग असायचा. त्यांचे वडील विष्णुपंत विठ्ठल आपटे समाजसुधारक होते. १९१४ साली त्यांनी पंढरपुरात आपटे प्रशाला सुरू केली होती. पुढे उपलब हे पंढरपुरातील प्रसिद्ध उद्योजक कुटुंबही तिच्यात सहभागी झाले व आपटे-उपलब प्रशाला ह्या नावाने आजही ती शाळा चालू आहे.

 आश्चर्य म्हणजे घरची शाळा असूनही इंदिराबाईंचे औपचारिक असे शालेय शिक्षण झाले नव्हते. दोन बालविधवा बहिणी घरात; त्यामुळे घरकाम खूप. घरच्या सुसंस्कृत वातावरणामुळे इंदिराबाईंना लहानपणापासूनच वाचनाचे वेड मात्र होते. अनेक कविता त्यांना पाठ होत्या.

१८ ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा