पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तंबाखू कामगार स्त्रियांना संघटित करायला सुरुवात केली. सुरुवातीला ते मदतीसाठी मुंबईपुण्याहून काही लेखकांना, पत्रकारांना, पुढाऱ्यांना आवर्जून आमंत्रित करत असत. त्यांना या महिलांची केविलवाणी परिस्थिती दाखवत. त्यांच्या भेटीगाठी, आसपासच्या खेड्यांतील दौरे वगैरे आयोजित करत. काहींनी तिथल्या प्रश्नांबद्दल लेखन वगैरे केले, भाषणे दिली. त्यामुळे बड्या शहरांतील सुशिक्षितांच्या वर्तुळात निपाणीतील महिला तंबाखू कामगारांचे शोषण हा काही दिवस चर्चेचा विषय झालाही; पण त्यामुळे प्रत्यक्षात निपाणीतील शोषणावर काहीही परिणाम झाला नाही.
 पुण्याच्या एक समाजकार्यकर्त्या बाई निपाणीत आल्या होत्या. त्यांना देवदासींची एक सभा तिथे घ्यायची होती. त्यांच्या विनंतीवरून सुभाष जोशींनी सभा आयोजित केली; पण 'मला सभेत बोलायचा आग्रह करू नका' असे त्यांनी ह्या विदषीना वारंवार बजावले होते. बाईंना मात्र ते भाषण करत आहेत आणि अध्यक्षस्थानी त्या स्वतः आहेत असा फोटो काढून घ्यायची फार हौस होती. त्यासाठी त्यांनी एक फोटोग्राफरदेखील मुक्रर केला होता. जोशी तसे स्पष्टवक्ते होते. आपल्या भाषणात ते म्हणाले,
 "वर्षाकाठी एक-दोनदा इथे येऊन आणि मग मुंबई-पुण्यात भाषणं देऊन देवदासींची मुक्ती होणार नाही, देवदासींचा कुठलाच प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी इथे येऊन दीर्घकाळासाठी काम करावं लागेल. यल्लम्माच्या यात्रेला एकदातरी स्वतः जावं लागेल, पाच घरी जोगवा मागत फिरावं लागेल, स्वतः जोगतीण बनून त्यांच्या वाट्याला काय येतं ते अनुभवावं लागेल. तरच त्यांना हा प्रश्न किमान समजेल तरी."
 पण ह्या सगळ्या स्पष्टवक्तेपणाचा त्या बाईंवर काहीही परिणाम झाला नाही! आपल्या अध्यक्षीय भाषणात त्या म्हणाल्या, “मी आता पुण्याला जाऊन एक पत्रकार परिषद घेते, मुंबईला जाऊनहीं एक पत्रकार परिषद घेते, बंगलोरलाही मी जाणार आहे," वगैरे वगैरे. अशा बोलघेवड्या आणि प्रत्यक्ष कामापेक्षा स्वतःच्या प्रसिद्धीतच रस असलेल्या विद्वानांचाही सुभाष जोशींना राजकारण्यांइतकाच तिटकारा होता. हे त्यांचे शरद जोशींबरोबर असलेले एक साम्य म्हणता येईल.

 सुभाष जोशी व त्यांचे तरुण सहकारी सायकलवरून सर्व खेड्यांमधून हिंडत, शेतकऱ्यांना मार्गदर्शक अशी पत्रके वाटत, लहान लहान सभा घेऊन शेतकऱ्यांना एकत्र आणायचा प्रयत्न करत; पण त्या साऱ्या प्रयत्नांना म्हणावे तसे यश येत नव्हते. तंबाखू शेतकऱ्यांच्या मनातील व्यापाऱ्यांची दहशत कमी होत नव्हती. तशातच राजकारणी मंडळी वरचेवर कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न उपस्थित करून व कानडी-मराठी वाद निर्माण करून आपापले नेतृत्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करत व त्यामुळे तंबाखूचा प्रश्न मात्र प्रत्येक वेळी मागे पडत असे. या साऱ्या परिस्थितीवर मात करून चालू असलेल्या सुभाष जोशी यांच्या अविरत प्रयत्नांमुळे निपाणीत एका अर्थाने जमीन नांगरून तयार होती, पण लढ्याचे बीज मात्र अजून पडले नव्हते.

१७०अंगारवाटा... शोध शरद जोशींचा