पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शांत चेहरा, विचारी वृत्ती आणि तरीही कृतिशील असलेले जोशी व्यवसायाने प्राध्यापक होते, पण अध्यापनाच्या जोडीनेच सामाजिक कार्यात त्यांचा खूप सहभाग असे. आपल्या समाजकार्यामुळे एकदा त्यांना नोकरीही गमवावी लागली होती, पण संघर्ष करून त्यांनी ती परत मिळवला. १९७३-७४च्या सुमारास त्यांना अकोळ युवक संघ नावाची स्थानिक तरुणांची एक संघटना उभी केली व तिच्यामार्फत वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवायला सुरुवात केली. पत्नी सुनीताअक्का याही सर्व कामात पतीला पुरेपूर साथ देणाऱ्या होत्या. 'सहते चरामि' हे व्रत खऱ्या अर्थाने जपणाऱ्या. घर हेच जोशींचे कार्यालयदेखील असल्याने माणसांचा राबता सतत असे. कधी कधी वीस-वीस लोकांचे जेवणखाणही सुनीताअक्कांना करावे लागे; पण त्यांची कधीही तक्रार नसे. त्यांच्याप्रमाणेच संध्या व शमा या त्यांच्या दोन धाकट्या बहिणीदेखील सुभाष जोशींना त्यांच्या कामात जास्तीत जास्त मदत करत.
 २४ ऑक्टोबर २०१२ रोजी निपाणीतील त्यांच्या घरी प्रस्तुत लेखकाची व त्यांची प्रथम भेट झाली. सोबत बद्रीनाथ देवकर हेही होते. आमच्या भेटीपूर्वी काही वर्षे त्यांचा शरद जोशींशी व शेतकरी संघटनेशी फारसा संबंध राहिला नव्हता; पण तरीही संयत शब्दांत, जराही आवाज चढू न देता, त्यांनी सर्व कहाणी ऐकवली.
 पूर्वी सुभाष जोशी समाजवादी पक्षात होते. पण त्या पक्षाच्या अनेक मोठ्या नेत्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्यानंतर नाव मोठे आणि लक्षण खोटे असाच अनुभव त्यांना आला. 'एक गाव, एक पाणवठा' आंदोलनाच्या वेळी कोकणात मालवण येथे भरलेल्या एका अधिवेशनाला ते मुद्दाम रजा काढून हजर राहिले होते. त्या अधिवेशनातील भाषणात एका वरिष्ठ नेत्यांनी जाहीर केले की, 'एक गाव, एक पाणवठा कार्यक्रमाला आपण संपूर्ण एक वर्ष वाहून घेणार.' पण प्रत्यक्षात त्यानंतर ते ह्या आंदोलनात कुठेच दिसेनात, म्हणून जोशींनी त्यांना पत्र लिहिले की, 'अधिवेशन संपून सहा महिने झाले, पण तुम्ही आश्वासन पूर्ण केलेले दिसत नाही. तुम्ही एकाही पाणवठ्यावर गेल्याचं ऐकिवात नाही.' अपेक्षेप्रमाणे पत्राला काहीच उत्तर आले नाही!
 इतरही अनेक मोठ्या समाजवादी नेत्यांच्या बाबतीत हाच अनुभव आला. भाषणे मोठी मोठी करायची, पण प्रत्यक्ष कृती शून्य. इतर लोहियावादी, मार्क्सवादी नेत्यांचाही असाच अनुभव त्यांना आला. मोहन धारियांचे बंधू गोपीनाथ धारिया ऊर्फ भाई हेही सुभाष जोशींच्या नियमित संपर्कात होते. त्यांची स्वतःची निपाणीजवळ मोठी वडिलोपार्जित शेती होती. १९७७ साली केंद्रातील जनता पक्षाच्या राजवटीत मोहन धारिया व्यापारमंत्री बनले. पण इथल्या तंबाखू कामगारांचे प्रश्न सोडवण्यात त्यांची काहीच मदत झाली नाही. ज्यांना आपण 'आपले' समजतो तेही सत्तेवर आल्यावर मात्र 'आपले' राहत नाहीत हा पुन्हा पुन्हा येणारा अनुभव कुठल्याही ध्येयवादी कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास होईल असाच होता. मग त्यांनी ठरवले, कुठल्याच मोठ्या नावाला भुलायचे नाही; आंधळेपणे कोणाच्या पाठीमागे जायचे नाही.

 निपाणीतील तंबाखू कामगार स्त्रिया कुठल्या नरकयातना भोगत असतात, कशा परिस्थितीत काम करत असतात ह्याची पूर्ण कल्पना असल्याने सुभाष जोशींनी लौकरच या

धुमसता तंबाखू १६९