पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बागलाण तालुका शेतकरी संघटना स्थापन केली होती. सटाणा, कळवण, मालेगाव, साक्री, टेहेरे हे यांचे कार्यक्षेत्र आणि हाच पुढे ऊस आंदोलनाचा बालेकिल्ला ठरला. इथे त्यांच्यात आणि अंबाजोगाईजवळच्या मोरेवाडीचे श्रीरंगनाना मोरे यांच्यात बरेच साम्य आढळते. दोघेही शरद जोशीच्या पूर्वीपासूनच शेतकऱ्यांसाठी स्वतंत्ररीत्या काम करत होते आणि दोघांनाही पुढे अत्यंत निरलस भावनेने आपापले काम शरद जोशी यांनी सुरू केलेल्या शेतकरी संघटनेच्या कामात विसर्जित केले. हा त्याग फार मोठा होता. ६ नोव्हेंबर १९८० रोजी बापूंची जोशींबरोबर प्रथम भेट झाली आणि त्या दिवसापासून त्यांनी स्वतःला ह्या कामासाठी वाहूनच घेतले. सटाणा येथे भरलेल्या शेतकरी संघटनेच्या पहिल्या अधिवेशनाचे ते स्वागताध्यक्ष होते, तर १९८४ सालच्या परभणी येथील दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते.

 अनेकदृष्ट्या उसाचे हे आंदोलन खूप महत्त्वाचे ठरले.
 मुंबई-आग्रा हा देशातील एक प्रमुख महामार्ग आहे व तो निदान चार दिवस पूर्ण बंद पडल्यामळे साहजिकच ह्या आंदोलनाची बातमी वाऱ्यासारखी देशभर पसरली. महाराष्ट्र विधानसभेप्रमाणे लोकसभेतही ऊस आंदोलनावर चर्चा झाली.
 या आंदोलनाची सर्वच राजकीय पक्षांना दखल घ्यावी लागली. शेतकरी आंदोलनामुळे नाशिकमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आपल्या पॉलिट ब्युरोचे एक सदस्य कॉग्रेड झेड. ए. अहमद यांना पाठवले होते. घुमरे यांनी त्यांची व शरद जोशींची भेटही घालून दिली होती. अर्थात अहमद यांनी शेवटी पक्षाकडे काय अहवाल पाठवला हे मात्र ज्ञात नाही.
शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर करण्यासाठी जॉर्ज फर्नाडिस नाशिकला आले होते. काही समाजवादी तरुणांना बरोबर घेऊन त्यांनी कलेक्टर कचेरीवर मोर्चा काढला होता. तिथे त्यांना अटक होऊन त्यांच्यावर खटलाही भरला गेला होता. त्यावेळी जामीन नाकारून त्यांनी कोठडीत जाणे पसंत केले होते. पण त्यांना ह्या खेपेला जनतेकडून फारसा पाठिंबा मिळाला नाही. आपल्या आंदोलनाचा स्वतःची राजकीय प्रतिमा अधिक उजळ करण्यासाठी ते वापर करून घेत आहेत ह्या भावनेने आणि राजकीय नेत्यांपासून आपण दूरच राहायचे ह्या आपल्या धोरणामुळे शेतकरी संघटनेनेदेखील त्यांची फारशी दखल घेतली नाही.
 विशेष म्हणजे जगातील अनेक देशांत ह्या आंदोलनाची बातमी पोचली. कारण अशा प्रकारचे व ह्या प्रमाणावरचे एखादे अर्थवादी शेतकरी आंदोलन भारतात प्रथमच होत होते. अॅड. दौलतराव घुमरे यांनी आपल्या उपरोक्त आत्मचरित्रात (पृष्ठ १५१) लिहिले आहे,
 "नाशिकचे कॉम्रेड एल. एम. पाटील त्यावेळी रशियात होते. मॉस्कोत ही बातमी धडकल्यावर तिथल्या पुढाऱ्यांत त्याविषयी चर्चा झाल्याचे त्यांनी मला नंतर सांगितले."

 चाकणच्या कांदा आंदोलनापेक्षा हे ऊस आंदोलन अधिक व्यापक होते. कांदा आंदोलनात तुरुंगात गेलेल्यांची संख्या तीनशे-साडेतीनशे होती, ऊस आंदोलनात तुरुंगात गेलेल्यांची संख्या ३१,०००हन अधिक, म्हणजे कांदा आंदोलनापेक्षा सुमारे शंभरपट अधिक

१६४अंगारवाटा... शोध शरद जोशींचा