पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 जोशींच्या ह्या विधानाचे सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट करून स्वागत केले.
 नाशिक, धुळे, पुणे व नगर ह्या जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांमधील शेतकरीही ह्या मेळाव्यात आपणहून सहभागी झाले होते. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा तसेच पार कर्नाटकाहूनही शेतकरी आवर्जून आले होते. आंदोलनाची माहिती किती झपाट्याने पसरत होती ह्याचे हे द्योतक होते.

 आंदोलनाबाबतचा जोशींचा एक अनुभव इथे नमूद करायला हवा.
 या ऊस आंदोलनाला मिळालेला एकूण प्रतिसाद कोणाच्याही अपेक्षेपेक्षा खूपच अधिक होता यात शंकाच नाही; परंतु प्रत्यक्ष तो दिवस उजाडेपर्यंत जोशी यांनाही प्रतिसादाविषयी मनातन शंका होती. बऱ्याचनंतर, म्हणजे १० डिसेंबर २००५ रोजी. परभणी येथे भरलेल्या शेतकरी संघटनेच्या रौप्यमहोत्सव मेळाव्यातील भाषणात आपल्या त्या वेळच्या मनःस्थितीचे वर्णन जोशींनी केले आहे. ते म्हणाले होते,

१० नोव्हेंबर १९८०ला नाशिकचं उसाचं आंदोलन बांधावरून रस्त्यावर आणि रेल्वे रुळांवर आणायचं ठरलं. त्याआधी जवळजवळ पंधरा दिवस संपूर्ण नाशिक जिल्हा आम्ही पिंजून काढला होता. पण तरीही, ९ नोव्हेंबरला दुसऱ्या दिवसापासूनच्या रेल रोको'ची घोषणा केल्या केल्या मनात धाकधूक सुरू झाली. आपण इतकं सर्वस्व पणाला लावून हा जुगार खेळलो आहोत; पण ही माणसं आपलं ऐकतील की नाही कुणास ठाऊक. माझ्या पोटात मोठा गोळा आला, की घरातल्या सगळ्या लोकांना - बायकोला, मुलींना - दुखवून मी घराबाहेर पडलो आहे; अशा परिस्थितीत उद्या शेतकऱ्यांनी खरंच साथ दिली नाही, तर आयुष्याला काय अर्थ राहणार आहे? रेल्वेच्या गाड्या थांबवण्याकरिता जर शेतकरी आले नाहीत, तर त्याच गाडीच्या पुढे पडून मला आयुष्य संपवावं लागेल. या विचाराने झोप येईना. शेवटी रात्री तीन वाजता एक फोन आला. आमच्या एका मोठ्या सहकाऱ्यांचा फोन होता. ते म्हणाले, 'आम्ही पंचवीस बैलगाड्या घेऊन रेल्वे रुळांच्या बाजूला येऊन थांबलेलो आहोत; आत्ताच बसायची परवानगी दिलीत तर आम्ही आताही रुळांवर बसायला तयार आहोत.' हा फोन आला आणि मी निश्चित झोपी गेलो.
(माझ्या शेतकरी भावांनो, मायबहिणींनो..., पृष्ठ २१४)

 ऊस आंदोलनाची तीव्रता बागलाण परिसरात सर्वाधिक होती व त्यामुळे रामचंद्रबापू पाटील यांचा उल्लेख इथे करायला हवा. या तालुक्यातील मुळाणे हे बापूंचे गाव. तेथून पाच किलोमीटरवर सटाणा. तसे बापू दिसायला सौम्य, समंजस; घरचे खाऊन-पिऊन सुखी. पण लढण्याचा क्षण आला की तेवढेच खंबीर. बापू नावाचे वादळ हे त्यांच्यावरती शरद जोशीनी लिहिलेल्या लेखाचे शीर्षक होते. लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड. लौकरच ते काँग्रेसवासी झाले; पण सक्रिय राजकारणापासून दूरच राहिले. १९७२ सालीच त्यांनी

उसाचे रणकंदन १६३