पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होऊन राहिलंय! आपलं आंदोलन सुरू झालं तेव्हापासून हे राजकारणी आपली कुचेष्टा करत आहेत. आपण त्यांच्या बडबडीकडे लक्ष देत नाही, ह्याचादेखील त्यांना राग येतो! आपले चालू मुख्यमंत्री विचारतात – हा शरद जोशी कोण? आम्ही त्याच्याशी काय म्हणून बोलणी करायची? ह्या सरकारला आम्ही सांगू इच्छितो, की शरद जोशी आम्हा शेतकऱ्यांचा नेता आहे आणि त्याच्याशीच तुम्हाला बोलणी करावी लागतील!... आणि शेवटी माझं भाषण संपवण्याअगोदर मी अत्यंत आनंदानं एक सांगू इच्छितो. ह्या सभेच्या एकच तास अगोदर सरकारची मुंबईहून तार आली आहे – शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी ह्यांच्याशी बोलणी करायला मंत्रिमंडळ तयार आहे!"
 ह्यानंतर 'शरद जोशी झिंदाबाद'च्या घोषणांनी पिंपळगाव बसवंतचं ते मैदान थरारून उठले. टाळ्यांचा प्रचंड गजर सुरू झाला. त्या जयघोषातच जोशी उठले. माइकपाशी गेले. नेहमीप्रमाणे हात जोडून त्यांनी सगळ्यांना नमस्कार केला. क्षणार्धात सभेत गंभीर शांतता पसरली आणि तितक्याच गंभीर आणि शांत आवाजात जोशी बोलू लागले :
 "माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो! शेतकऱ्यांचा हा जो प्रचंड मेळावा भरला आहे, त्या मेळाव्यानं सर्व टीकाकारांना उत्तर दिलं आहे. जे टीकाकार म्हणत होते, की आंदोलन एकदा बंद केलं, की पुन्हा चालू करता येत नाही, त्यांना तुम्ही सर्वांनी आपोआपच उत्तर दिलं आहे."
 आंदोलन ऐन भरात असताना जोशींनी ते ४८ तासांकरिता स्थगित केले, ह्याबद्दल अनेकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. वेळोवेळी जोशींनी त्यांना समर्पक उत्तरही दिले होते - आमच्या आंदोलनाची गाडी अशी नाही, की जी धक्का दिल्याशिवाय सुरूच होत नाही आणि एकदा सुरू झाली की थांबवताच येत नाही! किल्ली फिरवली, की आमचे इंजिन सुरू होते व गाडी पळू लागते, पुन्हा किल्ली फिरवली, की आम्ही इंजिन थांबवूही शकतो व गाडीही थांबवता येते! पण ह्या सभेत त्यांनी ह्या आंदोलनस्थगितीचे आणखीही एक व्यावहारिक स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले,
 "शेतकरी ज्याची आतुरतेने वाट पाहत होते. तो पाऊस १२ नोव्हेंबरच्या सुमारास झाला. पेरणीसाठी शेतकऱ्यांना त्यावेळी आंदोलनातून मोकळं करणं जरुरीचं होतं ह्याची जाणीव किती राजकीय पुढाऱ्यांना होती? एक डिसेंबरपर्यंत गव्हाची पेरणी झाली नाही, तर नाशिक आणि इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची काय स्थिती होते. ह्याची जाणीव किती राजकीय पुढाऱ्यांना आहे? म्हणूनच ही मंडळी जेव्हा तापलेलं आंदोलन आम्ही स्थगित केलं, म्हणून आमच्यावर वेडीवाकडी टीका करतात, तेव्हा त्यांना काय उत्तर द्यावं हेच आम्हाला कळत नाही.

 "हे आंदोलन आता केवळ नाशिक किंवा अहमदनगर-धुळे जिल्ह्यांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. आजच्या ह्या मेळाव्याला महाराष्ट्रातील बहुतेक सर्व जिल्ह्यांमधील शेतकरी प्रतिनिधी हजर आहेत. नाशिक जिल्ह्यात सत्याग्रह करणाऱ्या शेतकऱ्यांना आता इतर जिल्ह्यांतील तुरुंगांत पाठवणं सरकारला शक्य होणार नाही. कारण प्रत्येक जिल्ह्यातील तुरुंग त्या त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीच भरलेले असतील!"

१६२अंगारवाटा... शोध शरद जोशींचा