पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
शिक्षणयात्रा


 'शेतकऱ्यांचे पंचप्राण' म्हणून ज्यांची पुढे ख्याती झाली त्या शरद अनंत जोशी यांचा जन्म ३ सप्टेंबर १९३५ रोजी झाला. शनिवार पेठ, सातारा येथे. पण एक आश्चर्य म्हणजे त्यांच्या, किंवा त्यांच्याविषयीच्या, प्रकाशित लेखनात ते सातारा येथे जन्मले ह्याची कुठेच नोंद नाही. खूप वर्षांनंतर, ९ जानेवारी २०१० रोजी, त्यांना तेथील रा. ना. गोडबोले चॅरिटेबल ट्रस्टतर्फे साताऱ्यात जन्मलेल्या व लोकोत्तर कार्य केलेल्या एखाद्या व्यक्तीला दिला जाणारा साताराभूषण पुरस्कार मिळाला, तेव्हाच बहुतेकांना कळले, की साताऱ्याशी त्यांचे असे काही जवळचे नाते आहे. याचे एक कारण कदाचित हे असावे, की त्यांचे वडील अनंत नारायण जोशी हे पोस्टात नोकरीला होते व त्यामुळे त्यांच्या बऱ्याच बदल्या होत असत. विशेषतः सुरुवातीच्या काळात. पुढे ह्या बदल्यांची वारंवारिता कमी झाली.
 अनंतरावांचा जन्म १९०५ सालचा. ते चार-पाच वर्षांचे असतानाच त्यांचे आईवडील वारले. घरची आत्यंतिक गरिबी होतीच, त्यात आता आणखी अनाथाचे जिणे नशिबी आले. आधार कोणाचाच नव्हता. माधुकरी मागून आणि घरोघर वारावर जेवूनच त्यांचे शिक्षण झाले. कोल्हापूर येथील एका ख्रिश्चन मिशनरी शाळेत. त्यामुळे त्यांच्या मनावर ख्रिस्ती शिकवणुकीचा बराच प्रभाव पडला होता. पुढे शरद जोशी यांच्या एका कथेवर त्यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली होती, तिच्यावरून त्यांच्या स्वभावावर थोडासा प्रकाश पडतो.

 कॉलेजात शिकत असताना शरद जोशींनी ती कथा लिहिली होती व त्यावेळच्या एका चांगल्या मासिकात ती प्रसिद्धही झाली होती. त्या कथेत मुंबईतला एक तरुण लोकल गाडीखाली सापडून मरतो व त्याचे प्रेत त्याच्या घरी आणले जाते. चाळीतली सर्व मंडळी अवतीभवती गोळा होतात. त्यांच्यात एक विधवा असते. त्या तरुणाच्या शेजारीच राहणारी. प्रेत बघितल्यावर लोकांच्या चेहऱ्यावर काय काय प्रतिक्रिया उमटल्या व विशेषतः त्या विधवेच्या चेहऱ्यावर काय भाव उमटला याचे वर्णन करताना त्यांनी लिहिले होते, की एखाद्या विधवा बाईला दुसऱ्या बाईचा नवरा मेल्यावर जे समाधान वाटेल, तसे समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसत होते! हे मी माझ्या खवचट स्वभावाने लिहिले होते' असेही त्यांनी नंतर नमूद केले आहे. सॉमरसेट मॉम हा त्यांचा त्यावेळचा आणि नंतरचाही आवडता लेखक. त्यावेळी जोशींनी नुकतीच कथा लिहायला सुरुवात केली होती व मॉमच्या काही कथांचा त्यांनी अनुवादही केला होता. मॉम त्याच्या इतर वैशिष्ट्यांबरोबरच मनुष्यस्वभावातील विसंगतीच्या

शिक्षणयात्रा१७