पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

डिसेंबरपर्यंत तुरुंगात राहायची तयारी केलेल्या जोशींचीही २८ नोव्हेंबरला मुक्तता झाली. अर्थात त्यांच्यावरील व इतर सर्वांवरील खटले मात्र पुढे प्रदीर्घ काळ चालूच राहिले.
 हे न्याय्य भाव आधीच दिले असते तर शेतकऱ्यांना ना तुरुंगात जावे लागले असते. ना लाठ्या-गोळ्या झेलाव्या लागल्या असत्या. मग अंतुलेंनी हा निर्णय पूर्वीच का नाही घेतला? खरे तर ह्याचे कारण एकच होते – शेतकरी आंदोलनापुढे आपण झुकलो असे चित्र त्यांना निर्माण होऊ द्यायचे नव्हते. हा केवळ त्यांचा अहंकार होता. शिवाय शेतकऱ्यांचे एकमेव नेते म्हणून जोशींनी समाजात उभे राहावे हे त्यांना किंवा अन्य कुठल्याच राजकीय नेत्याला कधीच परवडणारे नव्हते!

 नाशिकचे प्रसिद्ध वकील अॅडव्होकेट दौलतराव घुमरे ह्यांच्याविषयी इथे आवर्जून लिहायला हवे. एकेकाळचे हे साम्यवादी. अडीच वर्षे तुरुंगवास भोगलेले. इगतपुरी भागात भात पिकवणाऱ्या गोरगरीब शेतकऱ्यांची संघटना उभारण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. कॉम्रेड गोदावरी आणि कॉम्रेड श्यामराव परुळेकर ह्यांच्याबरोबर आदिवासींसाठी त्यांनी लढा दिला होता. पुढे त्यांनी मराठा विद्या प्रसारक संघात अनेक वर्षे काम केले. अशी पार्श्वभूमी असलेली व्यक्ती शेतकरी आंदोलनाकडे आकर्षित झाली नसती तरच नवल.
 अर्थात जोशींना त्यांच्या पार्श्वभूमीची काहीच पूर्वकल्पना नव्हती; दोघांचा संबंध आला तो केवळ एक वकील आणि एक अशील म्हणून, नाशिक कोर्टात जोशींना त्यांच्या सहकाऱ्यांसह हजर केले गेले तेव्हा. पुढे त्यांची चांगली मैत्री झाली. स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांनी १९९६ साली नाशिक मतदारसंघातून लोकसभेची निवडणूकही लढवली. आपल्या Lawyer ह्या इंग्रजी आत्मचरित्रात त्यांनी जोशी ह्यांच्याविषयी व संघटनेविषयी बरेच लिहिले आहे. त्या आत्मचरित्राला शरद जोशी यांची प्रस्तावना आहे व त्याचे प्रकाशन ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी ह्यांच्या हस्ते झाले होते. आत्मचरित्राचा मराठी अनुवादही मे २००६ मध्ये प्रसिद्ध झाला आहे.

 १० नोव्हेंबर रोजी जोशी यांना अटक झाल्यानंतर ती रात्र त्यांनी पोलीस कोठडीतच काढली होती. त्यानंतर ११ तारखेला त्यांना नाशिक कोर्टात हजर केले गेले. आदल्या दिवशी नाशिक जिल्ह्यातल्या सुमारे ३१,००० शेतकऱ्यांना अटक झाली होती. त्याशिवाय, रोज नवे नवे शेतकरी पकडून कोर्टात हजर केले जात होते. ह्या सर्वांची बाजू कोर्टापुढे मांडणे हे एक अशक्यप्राय काम समोर उभे ठाकले होते. अटक झालेल्या काही पुढाऱ्यांकडे थोडेफार पैसे होते, पण शेतकरी संघटनेकडे काहीच पैसे नव्हते; स्वतः जोशींकडे जेमतेम शंभर रुपये होते. फाटक्या तुटक्या कपड्यात असलेल्या बहुसंख्य शेतकऱ्यांकडे पाच-दहा रुपयेदेखील नव्हते. नुसत्या कोर्ट फीची रक्कमच प्रचंड होत होती. अशा प्रसंगी घुमरे यांनी सगळी जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली. ते अतिशय उत्साहाने कामाला लागले. त्यांच्याच प्रयत्नांमुळे कुठल्याही वकिलाने ह्या केसेस लढवायचा एक पैसाही घेतला नाही. उलट, कोर्ट फीदेखील त्यांनीच भरली व इतर सर्व खर्चही स्वतःच केला. आपल्या उपरोक्त आत्मचरित्रात अॅड.

१६०अंगारवाटा... शोध शरद जोशींचा