पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लाखोंच्या संख्येने शेतकरी ह्या माणसाच्या मागे उभे राहत आहेत हे त्यांच्या लक्षात आले, तेव्हा मात्र त्यांचे धाबे दणाणले. जोशी आपल्या प्रत्येक भाषणात राजकारण्यांनी शेतकऱ्यांना इतकी वर्षे कसे फसवले, स्वार्थासाठी शेतकऱ्यांचा कसा वापर केला व प्रत्यक्षात त्यांची लूटच कशी केली आणि मुख्य म्हणजे पक्ष कोणताही असो, सगळ्या पक्षांचे धोरण हेच असते असे सांगत असत.
 राष्ट्रीय नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष (अध्यक्ष हे पंतप्रधान स्वतःच होते) व्ही. टी. कृष्णमाचारी यांनी २८ एप्रिल १९५६ साली तयार केलेल्या एका मसुद्यात 'शेतीमालाचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढवावे व शेतीमालाची किंमत २० टक्क्यांनी कमी करावी' असे एक मार्गदर्शक तत्त्व नमूद केले आहे. चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या मसुद्यातच 'सारा उत्पादनखर्च लक्षात घेऊन शेतीमालाचा भाव ठरवला जाऊ नये असे एक मार्गदर्शक तत्त्व असल्याचेही जोशी प्रत्येक सभेत सांगत. १९६५ साली पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी स्थापन केलेला कृषिमूल्य आयोग (Agriculture Prices Commission) शेतीमालाचे भाव ठरवतो; त्याच्या १९७१ सालच्या एका अहवालात नमूद केलेले पुढील धोरण जोशी नेहमी उदधृत करत -

शेतकऱ्यांना त्यांचा संपूर्ण उत्पादनखर्च भरून निघेल अशा किमती देणे अव्यवहार्य होईल. घरच्या माणसांनी केलेल्या कामाच्या मजुरीचा किमान वेतन दराप्रमाणे हिशेब केल्यास शेतीमालाच्या किमती अवास्तव वाढतील. त्यामुळे कारखान्यांना लागणारा कच्चा माल महाग होईल आणि त्याशिवाय कामगारांनाही त्यामुळे त्यांचा रोजगार वाढवून द्यावा लागेल.

 यातून शेतकऱ्याला त्याचा सर्व उत्पादनखर्च भरून निघेल असा भाव द्यायचा नाही हे सरकारचे धोरणच आहे, हा मुद्दा उघड होई. विशेष म्हणजे त्यांचे हे म्हणणे सरकारच्या कुठल्याही अधिकाऱ्याने तेव्हा किंवा त्यानंतरही कधी खोडून काढलेले नाही.
 जोशींना टाळणे आता सत्तारूढ व विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही अशक्य झाले. लोकदलचे जॉर्ज फर्नाडिस, जनता पार्टीचे हरिभाऊ महाले, अर्स काँग्रेसचे सूर्यभान गडाख, शेतकरी कामकरी पक्षाचे विठ्ठलराव हांडे ह्यांसारखे विरोधी पक्षांचे नेते आणि सत्तारूढ पक्षाचे तत्कालीन शिक्षणमंत्री बळीराम हिरे ह्यांसारखे नेते आपणहून जोशींशी संपर्क साधू लागले. जोशींचा प्रभाव असाच वाढू दिला तर लवकरच एक दिवस ते आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटतील अशी भीती सर्वच राजकीय नेत्यांना वाटत होती; विशेषतः काँग्रेस नेत्यांना. म्हणूनच एकीकडे जोशींना फार महत्त्व द्यायला ते तयार नव्हते, पण त्याचबरोबर शेतकरी विलक्षण भक्तिभावाने जोशींच्या मागे आहेत हेही त्यांना उघड दिसत होते. त्यामुळे संघटनेबरोबर कसे धोरण ठेवावे हेच त्यांना कळेनासे झाले होते.

 उसासाठी टनाला तीनशे रुपये भाव मागणे हास्यास्पद आहे' असे कालपरवापर्यंत म्हणणाऱ्या आणि तसा भाव मागणाऱ्या जोशींची कुचेष्टा करणाऱ्या महसूलमंत्री शालिनीताई

१५८अंगारवाटा... शोध शरद जोशींचा