पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कोर्टात उभे केले गेले, पण तिथे पोलिसांच्या आग्रहामुळे त्यांची कस्टडी २४ नोव्हेंबरपर्यंत वाढवली गेली व त्यांना पुन्हा नाशिक कारागृहात पाठवले गेले.
 शांततामय शेतकरी आंदोलन जबरदस्तीने दडपण्याच्या सरकारी प्रयत्नांचा निषेध म्हणून त्याच दिवसापासून कारागृहात जोशींनी बेमुदत उपोषण सुरू केले व शेतकऱ्यांना आपले आंदोलन शांततेने पण नेटाने पुढे चालू ठेवण्याचा आदेश दिला. उपोषण करताना ते फक्त लिंबूपाणी पीत असत हेही नमूद करायला हवे. मागे चाकणच्या कांदा आंदोलनात जोशींनी तीन वेळा उपोषण केले होते व त्याचा परिणाम होऊन त्यांची एक किडनी खराब झाली होती. 'आणखी तीन वर्षे तरी तुम्ही अशा कुठल्या उपोषणाच्या फंदात पडू नका' असा स्पष्ट सल्ला डॉक्टरांनी दिला होता. पण त्याकडे दुर्लक्ष करून जोशींनी आपले हे नाशिकचे उपोषण सुरू केले होते. साहजिकच त्यांची तब्येत १७ नोव्हेंबरनंतर झपाट्याने खालावू लागली. पण जोशी मरणाला घाबरत नव्हते. 'बाहेर माझे सारे शेतकरी बांधव पोलिसी अत्याचार सहन करत आहेत, त्यांच्या दुःखात मलाही थोडेफार सहभागी व्हायला पाहिजे, हाच विचार त्यांच्या मनात होता. 'या उपोषणात माझे प्राण गेले. तर मरणोत्तर नेत्रदान करायची माझी इच्छा आहे' असेही त्यांनी बोलन दाखवले होते.
 २२ नोव्हेंबरला, उपोषणाच्या सातव्या दिवशी, त्यांचे वजन चार किलोंनी घटले, नाडीचे ठोके ६४वर आले, पण कठलेही औषध घ्यायला त्यांनी स्पष्ट नकार दिला: ठरल्याप्रमाणे ह्या वेळच्या कस्टडीची मुदत संपल्यामुळे २४ नोव्हेंबरला तिघा नेत्यांना पुन्हा कोर्टात हजर केले गेले. त्यावेळी पोलिसांच्या मागणीनुसार पुन्हा त्यांचा रिमांड एकदम २७ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आला. त्याचवेळी बाहेर राहून आंदोलनाला मार्गदर्शन करणारे प्रल्हाद कराड पाटील यांनाही मंगरूळपीर फाट्यावर अटक केली गेली होती व त्यांनाही नाशिक कोर्टात उभे केले गेले होते. त्यांनाही इतर नेत्यांप्रमाणे २७ डिसेंबरपर्यंतचा रिमांड दिला गेला.
 जोशी व मोरे यांची रवानगी ठाणे येथील तुरुंगात व बोरास्ते व कराड पाटील यांची रवानगी येरवडा येथील तुरुंगात करण्याचा आदेश दिला गेला. त्याचवेळी त्यांना नाशिकहून हलवण्यापूर्वी सक्तीने आहार दिला जावा, असाही आदेश न्यायालयाने काढला. तुरुंगाधिकाऱ्यांनी ताबडतोब त्यांना सलाइन लावायची आणि तिच्यातून ग्लुकोज द्यायची व्यवस्था केली. अशा परिस्थितीत उपोषण करण्यात अर्थ नाही, हे प्रामाणिकपणे मान्य करून जोशींनी उपोषण सोडायचा निर्णय घेतला आणि २४ नोव्हेंबर १९८० रोजी मुरलीधर ढिकले या वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या हस्ते मोसंब्याचा रस घेतला. नऊ दिवस चाललेल्या ह्या उपोषणाची अशी सांगता झाली. त्यानंतर त्यांची ठाणे तरुंगात रवानगी झाली.

 राजकीय पुढाऱ्यांचा ह्या आंदोलनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता? त्यांच्या अस्तित्वालाच आव्हान देणारा हा विचार मूलतःच त्यांना पेलणारा नव्हता. सुरुवातीला कांदा आंदोलनाप्रमाणेच ऊस आंदोलनाकडेही त्यांनी दुर्लक्षच केले. कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी जोशींच्या मागे उभे राहतील याची त्यांनी कधी कल्पनाच केली नव्हती. पण जेव्हा

उसाचे रणकंदन १५७